
पृथ्वी,आप,वायू, तेज,जल यापंच महाभूताची बालचमुना पूजा करायला शिकवणारा अनिसा शेख यांचा ‘बालतरंग हा काव्य संग्रह’ बालमनाला आकार देत बालकाप्रमाणे निरागस जीवन जगत बालकवीतात त्याच्या बाललिला हर्षभरित *लेखनीने शब्दपटलावर मनातील काव्यतरंगाचे भांडार रिते करणारी कवयित्री म्हणजे अनिसा सिकंदर शेख होय”
आई ,बाबा ,आजा, आजोबा हे घरपण जपणारे चार स्तंभ. या दीपस्तंभावरील हसरी नक्षी म्हणजे दादा, ताई ,छकुली,छोटीपरी आणि फुगेवाला,बाहुली अंगणातील आनंदी झुला रानपाखरं फुगडी झिम्मा खेळे,प्राण्याच्या शाळेत वेड वाचनाचे हो चाले, सूर्य ढगोबा सोबत इंद्रधनु दाखवत म्हणे रानात जाताच उदंड आयुष्या हो लाभे,हत्ती, घोडा,उंट,वाघोबा, सिंह, लांडगा कोणी झुल्यात बसे कोणी पतंग उडवी,चिऊताईच्या लग्नात नाकतोडा,फुलपाखरु भुंगा,मुंगी, मैना, पोपट, बदक, उंदीरमामा,मनीमाऊ गोगलगाय, नाकतोडा यांची लगबल चाले, अशा वातावरणात कवयित्री अनिसा मस्तमौला होत आनंदकंद चाखत मुलातले बालमन संदर्भीत करीत शब्दलालित्याच्या कुंचल्याने मनामनात विलोभनीय चित्र रेखाटत आयुष्याचा मकरंद चाखतात व थोडं बालकवितेच्या नाजूक उंगलीने आनंदाचे चाटन रसिकांनाही चाटावायची किमया त्या सहज सुंदर कल्पनेच्या साह्याने तुम्हा आम्हास देतात. हाच आनंदाचा मेवा खात जीवनातले दु:ख,क्लेश, वादविवाद, मीपणा,द्वेषाची लक्तरे फेकून देऊन आनंदी जीवनाचा आस्वाद घेत जगण्यात खरे शहाणपण आहे .हाच बालतरंग कविता संग्रहाचा गाभा घटक आहे.हेच शाश्वत मुल्य देत सहज आणि शैल हातांनी देतात मग घेण्यात कशाला कुचराई आपण करायची?मग तर चला हा आनंदमेवा चाखू या.
चैत्र शुध्द पौर्णिमेच्या शुभदिनी हनुमान जयंतीच्या शुभ मुहुतावर बालतरंगाचा कवितांचा मेवा हाती आला.एकूण ६१ कवितांचा हा बालसंग्रह अतिशय सुंदर सजावटीने व नवकल्पनाने सजला आहे .प्रत्येक कवितेत चैतना भरली असून अबोलांना कवितेच्या लेखनीने बोलते केले आहे.
बालकवीता संग्रहाविषयी कवयित्री अनिसा शेख म्हणतात, “मी आजपर्यंत बालविश्वात जास्त रममान झालेली आहे.बाल चमुंबरोबर वेळ घालवणे, त्यांना शिकवणे, बालमनास आकार देणे,बालमनात रमून त्यांना शिकवता शिकवता मीही शिकत जाते,त्यांचे अनुभव,उत्साहावर्धक प्रश्न, नविन शिकण्याची तळमळ, अनुभव यांनी माझी लेखनी प्रेरित करुन गेली त्याचमुळे मी बालकवितांचे लेखन केले.यातूनच’बालतरंग ‘ या काव्यसंग्रहाची निर्मिती झाली.
या बालविश्वात लहान मुलांच्या मनातील काव्य भाडांर त्यांच्या सानिध्यातले सर्व विषय पशु , पक्षी ,फळे ,भाज्या, विविध खेळ, सूर्य, चंद्र,ढग,इंद्रधनु, पतंग …..यातील बोधपर संदेशाचा नजराना म्हणजे माझा “बालतरंग ” हा कवितासंग्रह होय.”,अशी काव्यसंग्रह निर्मिती विषयीची आपली भुमिका स्पष्ट मांडतात.कवितेचे सर्व विषय सर्वसामान्य असून यापूर्वी ब-याच कविनी असे विषय हाताळले आहेत.असे असून कवयित्री अनिसा शेख यांची सर्जनात्मकता सर्वच बाबतीत सरस असून विषय हाताळण्याची पद्धत, प्रयत्न यातील तळमळ, आसक्ती,आस्था,प्रयत्नांची पराकष्टा, प्रतिभा आणि कवितेतील प्रतिमा उच्च दर्जाची असूनही वाचनीय व पुन्हा पुन्हा कवितेचा आस्वाद घ्यावा असे आहेत म्हणून कविता संग्रह नविन अनुभवाचा आस्वाद देवून जातो.
अलिकडे वाट्स अप् जमान्यात अनेक ग्रुपच्या माध्यमातून कवितेचे विषय देवून अथवा कवितांचा वर्षभर पाऊस कोसळत असतो. पण यातील किती कविता कसोटीला व अनुभवाच्या आचेतून सुलाखून नवचेतना ,नव निर्मितीचा आनंद देतात हा संशोधनाचा विषय आहे त्यात कविता संग्रह कोणी वाचत नाहीत, विकत घेत नाहीत अशी मानसिकता समाजात निर्माण झाली असूनही कवी संमेलनात कविचाच बोलबाला जास्त असतो.अशा परिस्थितीत बालकविता लेखनात अनिसा शेख यांची कविता सरस झाली आहे.हे नाकारता येत नाही.
सारस्वत निश्चित याची दखल घेतील.बालसाहित्यात अंकासाठी अनिसा शेख दीपस्तंभासारखे सर्वांना आदर्शवत मार्गदर्शक ठरतील.असे मला मनोमन वाटते. त्यांनी अनेक संकल्प केले ते सर्व पूर्ण होत आहेत हे विशेष बाब आहे.युगस्त्री फातिमाबी याचे कार्य उजागर करणारा प्रातिनिधीक काव्य संग्रह व फातिमाबी शेख याच्या नावे पी.एच डी पदवी या दोन्हीही इच्छा पूर्ण झाल्या त्यांची तिसरी इच्छा फातिमा शेख यांच्या नावे विद्यापीठ व्हावे.अशा मनापासून संकल्प करणा-या कवयित्रीचा हा काव्य संग्रह आहे.
कुटुंब रंगलयं काव्यात याचे सादरकर्ते प्रा.विसूभाऊ बापट, मुंबई याची पाठराखन व प्रस्तावना फारच अप्रतिम असून कविता संग्रहाचे कौतक करणारे आहे सर म्हणतात, “चला निसर्ग वाचवू या, एकतरी झाड लावू या. ‘झाड लावू या ‘ कवितेतील या ओळी बालकांना पर्यावरणाचे महत्व. सांगणाऱ्या आहेत.माझी एलिजा, बाबा आणि आजी या कविता मुलातील आस्था वाढवणा-या आहेत.
त्यांच्या ‘हसू खेळू ‘या कवितेत त्या लिहितात, ‘ आट्या पाट्या अन् सुरपारंब्या खेळू गड्याला हात लावून, सूर शोधायला पळू या ओळी मोठ्यांना बालपणात घेऊन जातात ….लोप पावत चाललेल्या खेळाची आठवण करुन देत सुट्टीचा आनंद लुटायला सांगतात.’या मुलांनो या’लवकर सारे या लवकर बसा चला, ‘पुस्तक वाचू या ‘आणि ‘वेड वाचनांचे ‘कवितेतील ओळी मुलांना पुस्तक वाचनाचे महत्व सांगून जातात. एकूनच अनिसा शेख यांच्या ‘बालतरंग ‘बालकविता संग्रहातील सर्वच कविता साध्या सोप्या शब्दांत लिहिलेल्या असल्याने मुलांना मनापासून आवडतील.”
असा कौतुकास्पद असा आस्वाशक मनाला उल्लासित करुन मनाला भावेल अशी सुंदर आपल्या लेखनशैलीतून दिलेला अभिप्राय कवितांची उंची सांगून जाते.बालकवितामधले नावीन्यपूर्णता जाणवते.
कवियित्रीला नातेसबंध जोडण्याचे वेड आहे.मनातला निखळ आनंद ती अवतीभोवतीच्या नातेसबंधात शोधते त्यातील पहिले मानकरी आई असते.आई खूप प्यारी ,कामे पटापट करते,गरम जेवणाची मेजवाणी देऊन स्वच्छतेचे धडे गिरवून घेते,पुस्तके वाचण्याचा छंद लावते,जणू सावित्रीच भासते तर बाबा निर्मळ ,कामात दक्ष,हौशी,सदा लक्ष ठेवणारे, सुट्टीची मजा लुटणारे असे हवे हवेसे वाटणारे बाबा,आजी गोरीपान,सर्वावर ध्यान ठेवणारी,गोष्टी सांगणारी, स्वच्छतेची पुजारी, तिच्या विषयी कवयित्री म्हणते, (पा.क्र.१२)
हात तिचे आहे
खूप मऊ मऊ
रोज देते मला
ती खाऊ खाऊ
दादा कसा तर छोटा, आवाज मोठा,खेळतांना मध्ये मध्ये येणारा,खोडकर, आई कामात असेल तर कवयित्रीच सांभाळते मात्र राखी पौर्णिमेला हेच छोटे हात चाॅकलेट देतात,तर ताई सोबत घेऊन जाणारी, जीव लावणारी, शाळेला जाणारी,हुशार,सांभाळून घेणारी अशा ताई विषयी अनिसा शेख म्हणतात,(पा.क्र.१४)
ताई माझी ताई
आहे खूप गुणवान
तिच्या शिवाय माझं
हलत नाही पान
रंगबेरंगी फुगे आणणारा फुगेवाला भेदभाव करीत नाही.वाघोबा, सिंह,, लांडगा,याचे बालसुलभ वर्णन अतिशय अप्रतिम हत्ती विषयी म्हणतात,(पा.क्र.३८)
सुंदर तुझी अंबारी
पाठीवर बसव मला
चक्कर मारल्यावर
माझा खाऊ देतो तुला
तर कधी माकडाचा वाढदिवस साजरा करतात.सारे प्राणी येतात केक खाऊन सारे पसार होतात,कवीतातून प्राण्याचे वर्णन वाचतांना निरीक्षण, प्रत्येकाचे स्वभाव,त्याचे खास वैशिष्ट्ये याचे वर्णन फारच छान व पटणारे असून त्यातून मुलांना शिकवण देतांना इसापनीतीच वेगळ्या स्वरूपात मुलांपुढे त्या मांडतांना अनुकरण वाटत नाही तर साध्या शब्दातले केलेले वर्णन वाचन्याचा मोह नक्कीच वाचक मनाला होतोच.पोपट,बदक,मोती,
उंदीरमामा,
मनीमाऊ, मोर,एलिजा ससा हा तर सह्याद्रीचा बर्फच ,मैना ,कोंबडा,चिऊताईच्या लग्नाचे वर्णन तर समाजातील आजच्या लग्न पध्दतीच्या वर्मावर बरोबर घाव घालत लहान मुलाच्या गीतातून बड्याना संदेश देतात त्या लिहितात(पा.क्र.५१)
नाही रुसणे फुगणे
नाही मानाचे मागणे
लग्न व्हावे असे सोपे
हेच तुम्हास सांगणे.
व्वा असा मंत्र साध्या शब्दातला समाजपरिवर्तन करुन जातो.सा-या प्राण्यांशी, पक्षाशी कवयित्री स्नेहाचे,मैत्रीचे नाते होते. ही आहेत म्हणून आपण आहोत हाच संदेश देऊन या मित्रांना सांभाळणे आपले कर्तव्य आहे .त्यांच्या जागेत माणसाने शिरकाव करु नये.नाहीतर ते आपल्या गाव वस्तीत येणारच अन् आता तेच होत आहे.
मनुष्य वासतूत त्यांचे आक्रमन ओळखून आपण कागदी घोडे न नाचवता प्रत्यक्ष कृती करायला शिकले पाहिजे आणि हा मोलाचा मंत्र मुलांच्या बालगीतातून त्या देत आहेत .हीच बालचमू उद्याचे नागरिक आहेत संस्काराची शिदोरी यांना आत्ताच द्यायला हवी असे सांगून गप्प न बसता त्या बालगीतून देत आहेत.यातून बदल होणारच तो होईल हा आशावाद अनिसा शेख यांना आहेच.तसेच जलचर प्राण्यांच्या दुनियेत ही कवयित्री रमते, मासा, गोगलगाय,,नाकतोडा,गाडूंळ विषयी म्हणतात(पा.क्र.५४)
दिसत असता लहान
कार्य त्यांचे खूप महान
खरा मित्र शेतक-याचा
गाऊ त्याचे आपण गान
या जलचर,भुचराचे संरक्षण करणे गरजेचे आहे .आता आपण पहातो कारखाना,गाव,शहर यांच्यातील प्रदूषणी रासायनिक पाण्याने नदीतले लाखो मासे मरत आहेत.पाणी विषयुक्त होत आहे .भूजलातील पाणी रसायन मिश्रीत झाले आहे आणि हेच पाणी आपण पिवून लाखो आजाराला कवटाळत आहेत.
दि .८ एप्रिल २०२३ ची सकाळची बातबी पहा ‘रसायनयुक्त पाण्याने शेती उद्ध्वस्त ‘ या मथळ्यातील जेष्ठ शेतक-याची व्यथा फारच बोलकी आहे .*दहा एकरावर शेती आहे ,विहीर आहे ,मात्र त्यातील तांब्याभर पाणी उपयोगाचे नाही.ते फक्त पावसाच्या पाण्यावर पीक घेतात. ऊस ,द्राक्ष. पीके संपली.जमिनीखालचे पाणी पिकांना दिले तर काही तासांत आडवी होतात,असा अनुभव आहे .अशा अवस्थेत खडबडून सा-यांना जागे करण्यासाठी कविताततून प्रबोधन आवश्यक आहे ते कवयित्री अनिसा शेख करीत आहेत.
फुलपाखरु,भुंगा मुंगी याचे परागीभवनामधील स्थान ओळखून घ्यायला शिकले पाहिजे.बाग या कवितेतला संदेश पहा(पा.क्र.६०)
व्हिटॅमिन सी ने
परिपूर्ण धरा
खाल्यावर त्यांना
आनंद येतो खरा
तर मोसंबीला म्हणतात (पा.क्र.६१)
रसाची तू महाराणी
क जीवनसत्वाची दामिणी
सोलण्याची असे कसरत
रोग पळवणारी कामिणी
अशी आरोग्याची शिकवण मुलांना अनिसा शेख देतात.पालक,फळे महत्व आपण जाणले पाहिजे इतकच नाही तर अननस खावे,पेरु खोकला पळवतो,डाळींब पोट साफ करते,कलिंगड शरीराला गारवा देते,सफरचंद आरोग्यमंत्र देते,द्राक्षे आळस पळवते असे आरोग्यदायी संदेश त्या कवितेतून देतात. सूर्य, ढग,इंद्रधनु, हेही आवश्यक आहेतच तर सूर्याला पाहून म्हणतात(पा.क्र.६५)
सूर्या रे सूर्या
मी ही तुझ्या सारखा चमकेन
बप्पा शप्पथ सांगतो
मन लावून अभ्यास करेन
अशा प्रबोधनाने सजलेला कविता संग्रह अर्पण पत्रिकेत अभीष्टचिंतन देतांना म्हणतात,” ‘आमच्या कौटुंबिक जीवन वेलीवरची दोन मनमोहक फुले म्हणजे अमेया’
सिकंदर आणिअरबाज सिकंदर होय. त्यातही सर्वांची मने वेधून घेणारा सर्वांचा लाडका हर्षित मनाचा सर्व गुणसंपन्न आणि सर्वांची मने जिंकणारा अरबाज सिकंदर यास २५व्या वाढदिवसानिमित्त काव्यरुपी अभीष्टचिंतन हा संग्रह प्रणाली रामचंद्र पंडित चिंचवड,पुणे १९ येथून प्रकाशकशित (मो.८२०८७०२९०७ करण्यात आला आहे.
२५ मार्च २०२२ रोजी प्रथम आवृत्ती निघाली असून मुखपृष्ठ कु.प्रणाली पंडित यांनी फारच सुंदर इंद्रधनुवरच हसरी मुले, सूर्य हसरा,फळे, फुले,प्राणी सारे सारे हसरे, चंद्र चांदण्या सोबत चिमण्या हस-या असा काव्यखजिना आपणासमोर ठेवत आहेत. प्रस्तावना व मलपृष्ठ प्रा.विसूभाऊ बापट, मुंबई, कुटुंब रंगलय काव्यात चे सादरकर्ते यांनी थोडक्यात पण अप्रतिम असा साज चढवला आहे.बा.ह.मगदूम सरांच्या साहित्यिक स्नेही यांच्या कल्पकतेमुळे मला आस्वाद घेण्याची संधी मिळाली म्हणून त्याचा मनापासून आभारी आहे.माझ्या अल्पबुध्दीने जसे समजले तसे त्याचा आस्वाद आपणासमोर मांडला तो आपण थोर मनाने स्वीकाराल अशी कामना करुन बालतरंग कविता संग्रहास व अनिसा सिकंदर शेख यांना त्यांच्या साहित्यिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देतो.
कविता संग्रह : बालतरंग
कवयित्री : अनिसा सिकंदर शेख,
दौंड,पुणे,
मो. :९२७००५५६६६.
प्रकाशक. : प्रणाली रामचंद्र पंडित.
चिंचवड,पुणे,१९.
मो. : ८२० ८७०२९०७.
मुखपृष्ठ. : कु.प्रणाली पंडित.
स्वागत मुल्य. : १०० रुपये मात्र.
* आस्वादक
– मुबारक उमराणी
शामरावनगर, सांगली
९७६६०८१०९७