वर्तमान आंबेडकरवादी आंदोलनासमोरील आव्हाने व त्यांचे समाधान
क्रांतिघोष करून आंदोलनाचा
चालून जा रे आंबेडकर वीरांनो
मृत्यूतत्त्ववादी बंडलबाजाचा
फसवा चेहरा उजागर करा वीरांनो …
प्रस्तावना :
आंबेडकरवाद हा एक मुलतः परिवर्तनीय महाऊजेचा मुख्य स्त्रोत आहे. भारतीय समाजाला व जगातील सर्व मानवाला नव्या मूल्यमंथनाचा नवा अविष्कार देणारा महाप्रकल्प आहे. आंबेडकरांच्या क्रांतीत्त्वाने भारतीय समाजाचा ,शिक्षणाचा, राजकारणाचा, धर्माचा व विज्ञानाचा चेहरामोहराच बदललेला आहे. आंबेडकरवादी आंदोलनाने देशाला नवी मूल्यसंहिता दिली आहे .धगधगत जळणाऱ्या मानवाला धम्माची शांतता देण्याचे काम आंबेडकरवादी आंदोलनाने केलेले आहे.
आंबेडकरवादी आंदोलन हे समता मुलक मानवतावादी विचारांचा मूल्यजागर आहे.
भारतीय समाजातील विषमतामय मुळांना आग लावून समतेचे मानवीय सरोवर निर्माण करणारा संवेदनशील आविष्कार म्हणजेच आंबेडकरवाद होय .आंबेडकरवादी होणे म्हणजे भारतीय संविधाननिष्ठ माणूस निर्माण होणे.देशांमध्ये आंबेडकरी आंदोलनाने मोठी धडकी भरली होती. अनेक सामाजिक संघटनेच्या माध्यमातून भारतीय समाजाला नव्या सापेक्ष व्यवस्थेच्या मार्गावर घेऊन जाणारा विद्रोह म्हणजे आंबेडकरवादी आंदोलन होय.
पण आज वर्तमान आंबेडकरवादी आंदोलनाने अत्यंत निराशमय वातावरणात वावरताना दिसतात. आंबेडकरवादी काही नेत्यांनी आंबेडकरवादी आंदोलन समाप्त केले आहे. पहिल्या व दुसऱ्या पिढीतील आक्रमकता वर्तमान आंबेडकरवादी आंदोलनात फारशी दिसत नाही. नेते बेरोजगार असल्यामुळे आंबेडकरवादी आंदोलनाला क्षीणता प्राप्त होत आहे सामाजिक, शैक्षणिक धार्मिक राजकीय ,आर्थिक अशा विविध समस्या नव्याने निर्माण झाले आहेत. नव्या भांडवलदारी व जागतिकीकरणाने भारतातील आंबेडकरवादी आंदोलनापुढे मोठे आव्हान उभे केलेले आहे. उत्तम कांबळे लिहितात की “ग्लोबल व्हिलेजमध्ये सारं सारं काही आलं आणि ते मिळवण्यासाठी स्पर्धा आल्या .माणूस आता स्वतःशी, माणसाशी व्यवस्थेशी, रोबोटशी आणि ग्लोबशी म्हणजेच निसर्गाशी लढतोय. अस्तित्वासाठी लढतोय स्वतःचा चेहरा जपण्यासाठी लढतोय .किती लढतोय माणूस.” ही वास्तविकता जागतिकीकरणाने माणसाच्या पुढे आणून ठेवली आहे.
आज आंबेडकरवादी आंदोलन दिशाही होताना दिसतात .एकात्मतेचा अभाव व नेत्यांची चमचागिरी करण्यातच काही नेते आहेत .त्यामुळे आंबेडकरवादी आंदोलनासमोर फार मोठे आव्हान वर्तमानात आलेले आहे. या वर्तमानातील आव्हानाला परतावून लावण्याचे काम फक्त आंबेडकरवादी आंदोलन करू शकते. यासाठी आंबेडकरवादी सकल संघटनाने एकत्र येणे काळाची गरज आहे.
आंबेडकरवादी आंदोलन कशाला म्हणतात?
आंबेडकरांच्या विचारावर आपली निष्ठा ठेवून भारतीय संविधानाच्या मूल्यानुसार व्यवस्था परिवर्तनाची लढाई लढण्याची प्रक्रिया म्हणजे आंबेडकरवादी आंदोलन होय. आंबेडकरवादी आंदोलन हा भारतीय समाजाला नवे प्रकाशऊर्जा देणारी उजेड वाट आहे. भारतीय लोकशाहीला जपणारा आंबेडकरवादीच होऊ शकतो. म्हणून तो लोकशाही वाचवण्यासाठी सदोदित प्रयत्नशील असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीची व्याख्या करताना म्हणतात की,” Democracy is the form and method of Government where by revolutionary life change in the economic and social life of the people are brought about without bloodshed “. ही व्याख्या भारतीय समाजाला नव्या वैचारिक क्रांतीची प्रेरणा देणारी आहे. आंबेडकरवादी आंदोलनाचा श्वास हा तथागत गौतम बुद्धाच्या शिकवणीतून प्रस्फोटीत झाला आहे.
उजेडाची वाट पकडून
सारा अंधार नष्ट करा
लोकशाहीच्या संविधानसूर्याने
भारतीय माणूस प्रज्वलित करा..
वर्तमान आंबेडकरवादी आंदोलनासमोरील आव्हाने
सामाजिक आव्हान
भारतीय समाजाला मनस्मृतीचा जो कलंक लागला तो कलंक भारतीय संविधानाचीची सुरुवात झाल्यापासून नष्ट झाला. त्यापूर्वी २० मार्च १९२७ ला महाड चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळी नव्या क्रांतीचे बिगूल डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी फुुंकले होते .ही लढाई म्हणजे आंबेडकरवादी सामाजिक आंदोलनाची ठिणगीच होती. ते म्हणतात की ,”सर्व माणसे जन्मता समान दर्जाचीच आहेत व ती मरेपर्यंत समान दर्जाचीच राहतील .लोकोपयोगीत्वाच्या दृष्टीनेच त्याच्या दर्जात फरक पडू शकेल. एरव्ही त्याचा समान दर्जा तसाच कायम राहिला पाहिजे म्हणून राज्यकारभारात आणि सार्वजनिक व्यवहारात समतेच्या तत्वाला बाधा येईल अशा कोणत्याही धोरणाला व विचारांना थारा मिळू नये.” हा सामाजिक ठराव पारित करण्यात आला होता. महाड चवदार तळे सत्याग्रह फक्त पाण्यासाठी नव्हता तर आम्ही माणसे आहोत, आम्ही हिंदू नाहीत हे सांगण्यासाठी केलेला महासंगर होता.
आंबेडकरांनी केलेल्या चळवळीतून नव्या विचारांची सामाजिक बदलांची नांदी उभी झाली. स्वतःच्या सामाजिक चालरीतील नष्ट करून नवा माणूस तयार व्हावा हीच भूमिका त्यांची होती. आज देशातील वर्तमान परिस्थिती अत्यंत भयावह आहे .आंबेडकरवादी विचारवंतांना अर्बन नक्षलवादी म्हटले जात आहे. दररोज अस्पृश्य लोकांवर व स्त्रीवर अन्याय आणि अत्याचार होत आहेत. आंबेडकरवादी आंदोलनाची धार पूर्वीपेक्षा कमी झाली काय असा प्रश्न मला पडला आहे.
आज शासकीय यंत्रणा हुकूमशाही पद्धतीने वागत आहे. भोतमांगे परिवारात हत्याकांड, ऊना प्रकरण, घाटकोपर प्रकरण, रोहित वेमुला प्रकरण, पायल तडवी प्रकरण हे समाजाला फारच बेचैन करत आहेत . आंबेडकरी समाजासमोर मोठे आव्हान आज उभे ठाकले आहे. आंबेडकरी आंदोलन करणाऱ्या दलित पॅंथर ,बामसेफ, दलित मुक्तीसेना, इतर आंबेडकरवादी सामाजिक संघटना या समाजाला नवी दिशा द्यायचा प्रयत्न करतात .
समाजावरील होणाऱ्या अन्याय अत्याचारा विरूद्ध आवाज उठवतात.रिडल्स प्रकरण व मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलन, भीमा कोरेगाव आंदोलन ॲट्रोसीटी कायदा आंदोलन ,ओबीसी आरक्षण आंदोलन ,ओबीसी जातीय जनगणना आंदोलन, जुनी पेन्शन आंदोलन, विद्यार्थ्या आंदोलन, स्त्रीमुक्ती आंदोलन असे विविध पातळीवर आंदोलन करत आहेत .या आंदोलनाला पाहिजे तेवढा इतरांचा पाठिंबा मिळत नसला तरी आंबेडकरवादी हा देशातील बदलाचा मागोवा घेत आहे. वर्तमानातील सत्तेला व समाजातील ठेकेदारांवर तुटून पडत आहे. त्यामुळे समाजात नवे क्रांतीगर्भ उभे होत आहेत.
आंबेडकरवादी आंदोलनाचा पराभव करण्यासाठी टपून बसलेले मोरके यांना उजागर करून नव्या रणनीतीचा उपयोग करून आंबेडकरवादी आंदोलनाची दिशा ठरवावी. लढणाऱ्या लोकांसोबत समाजातील लोकांनी सहकार्य करावे. कारण आपली लढाई भारतीय समाजाच्या एकात्मतेसाठी आहे हे आपण समजून घेतले पाहिजे.
*राजकीय आव्हान*
भारतीय राजकारणात आंबेडकरी विचारांनी राजकीय क्रांती केली आहे. स्वतंत्र मजूर पक्ष, शेड्युल कास्ट फेडरेशन, भारतीय रिपब्लिकन पक्ष, बहुजन समाज पार्टी ,बहुजन महासंघ, वंचित आघाडी ,बहुजन मुक्ती पार्टी या पक्षाने आपापल्या परीने राजकीय सत्ता आणण्याचा प्रयत्न केलेला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले ध्येय साकार करण्यासाठी राजकारणाला अत्यंत महत्त्वाचे स्थान दिले आहे.ते म्हणायचे ,”जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायचे आहे.” या विचारांच्या अनुषंगाने आंबेडकरवादी विचारांची मोठी क्रांती केली.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने साठच्या दशकामध्ये राजकीय क्रांती केली .तो विरोधी पक्ष म्हणून देशात अग्रस्थानी होता .नंतर माननीय कांशीराम साहेबांनी बहुजन समाज पार्टीच्या निर्मितीतून उत्तर प्रदेश या मोठ्या राज्यांमध्ये स्वतःचे सरकार स्थापन केले .महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर व इतरही नेते राजकीय क्रांतीच्या दिशेने वाटचाल करत आहेत .पण त्यांची भूमिका सातत्याने बदलत असल्याने संपूर्णपणे त्यांना यश आले नाही.
वर्तमान परिस्थितीमध्ये आंबेडकरवादी राजकीय आंदोलनाला घरघर आली आहे. नेतृत्वाची अभिलाषा ,स्वतःची पोळी शिकण्याची वृत्ती, आंबेडकरी समाजासोबत प्रतारणा अशा विविध कारणाने आंबेडकरवादी राजकीय आंदोलन क्षीण झाले आहेत. म्हणून वर्तमानात आंबेडकरवादी आंदोलनासमोर राजकीय आव्हान उभे ठाकले आहे. समाजातील संघटित पणा कमी होत आहे. मतदानाच्या दिवशी पैसा, मटन व दारू यांचा महापूर आल्याने आंबेडकरवादी माणूसही आपले खरे मत पक्षांना न देता विरुद्ध पार्टीला देत आहे .नव्या हुकुमशाही वृत्तीला पाठिंबा देत आहे.
आपली राजकीय क्रांती करायची असेल तर आपण आपले सर्व मतभेद विसरून एक झालो पाहिजेत. या आव्हानाला परतावून लावण्यासाठी समाजाला आंबेडकरी विचारांची कास धरावी लागेल.
आर्थिक आव्हान
आंबेडकरवादी लोकांचा आर्थिक विकास हा १९५० पासून झाला. त्यापूर्वी त्यांना स्वतःचा आर्थिक विकास करण्याच्या साऱ्या वाटा बंदिस्त केल्या होत्या. संविधान लागू झाले तेव्हा आपण राजकारणात समानता मान्य केली तर सामाजिक व आर्थिक समानता मान्य केली नाही. जोपर्यंत भारत देशात सामाजिक व आर्थिक समानता प्राप्त होत नाही तोपर्यंत भारतीय समाजाला खरा न्याय मिळाला असे म्हणता येणार नाही. भारतीय संविधानाने दिलेल्या आरक्षणाच्या भरोशावर या समाजातील लोकांना आर्थिक विकास केला असला तरी तो फक्त ५% टक्के एवढाच झालाय. अजूनही ९५ टक्के आंबेडकरी समाज यापासून वंचित आहे.
आज खाजगीकरणाच्या नावाखाली आरक्षण समाप्त केली जात आहे. भांडवलदाराच्या निर्मितीने आर्थिक समानतेचे तत्व लयात जात आहे. देशात नवी आर्थिक गुलामगिरी निर्माण झाली आहे. पैसाचे विकेंद्रीकरण होण्यापेक्षा केंद्रीकरण होत आहेत. पाच टक्के लोकांजवळ ९५% लोकांची संपत्ती आहे .त्यामुळे आंबेडकरवादी आंदोलनपुढे आर्थिकतेचे आव्हान उभे ठाकले आहे. समान कामासाठी समान वेतन हा मूलभूत अधिकार असताना नव्या कामगार व औद्योगिक कायद्याने त्याला हरताळ फासला आहे.
नव्या कामगाराची क्रांती करण्यासाठी नव्या जनआंदोलनाची गरज आहे .देशातील सर्व मानवांना समान आर्थिक न्याय मिळावा यासाठी आज संघर्ष सुरू आहे. पण सत्तेच्या मग्रुरीने श्रीमंताचे लाड पुरवले जात आहेत .अनेक भांडवलदाराचे कर्ज माफ केले जात आहे. देशाला आर्थिक गुलामगिरीच्या जाळ्यात वर्तमान सरकार घेऊन जात आहे का हा प्रश्न भारतीयांना पडला आहे.आर्थिक गुलामीला थोपवण्यासाठी आंबेडकरवादी आंदोलन करणे गरजेचे आहे. अर्थसंकल्पातील आपला वाटा कमी केला जात आहे.
रुपयांचे दर दिवशी अवमूल्यन होत आहे. अशा परिस्थितीत आंबेडकरवादी आंदोलनाने संघर्ष वाढवला पाहिजे. देशातील मागासवर्गीय ,स्त्री, शोषित ,वंचित, आदिवासी यांच्या जीवनात आर्थिक समानता प्राप्त करून देण्यासाठी आंदोलन करणे काळाची गरज आहे. सरकारच्या आर्थिक धोरणाला पाठिंबा न देता देशाच्या हितासाठी आंबेडकरवादी आंदोलकांनी आपली दिशा घ्यावी. तेव्हाच वर्तमानातील आर्थिक गुलामगिरी आपण रोखू शकतो.
शैक्षणिक आव्हान
भारतीय समाजात शैक्षणिक प्रगती करणारा आंबेडकरी समाज इतर समाजाला प्रेरणा देत आहे.. डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या मताला शीर्ष मानून त्यांनी आपल्या समाजाला शैक्षणिक क्षेत्रात पुढे आणले आहे. इतर समाजापेक्षा आंबेडकरी समाजात शिक्षणाचे महत्त्व व शिक्षणाचे प्रमाण जास्त आहे .
भारतीय संविधानातील शैक्षणिक आरक्षण व सरकारी सेवेतील आरक्षणामुळे दोन पिढ्यांनी आपला शैक्षणिक तर वाढवला पण सुवर्ण समाजासोबत आपली स्पर्धा करू लागला. नव्या शैक्षणिक क्रांतीचा नवा उर्जावान प्रवाह म्हणून देशाला नवा मार्ग दाखवू लागला. पण आज आंबेडकरी समाजासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे ते शैक्षणिकतेचे.
सरकारने आपले हात वर केल्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेवर शिष्यवृत्ती मिळत नाही .जातीय विषमतेच्या नावाखाली रोहित रेमुला, पायल तडवी तसेच इतर स्कॉलर्सला आत्महत्या करायला लावणारी संस्थाने विद्यार्थ्यांच्या जीवावर बसलेली आहेत. न्यायाचे समानतत्व पायदळी तुडवले आहेत. विद्यार्थ्यांना विविध समस्येला समोर जावे लागत आहे.
.कॉलेजमध्ये जातीय अस्मिता नव्याने उभ्या ठाकल्या आहेत. विकृत खाजगी संस्थेमध्ये विकृत मानसिकतेने आरक्षणाची पायमल्ली केली आहे. बेरोजगारीचे नवे तांडे रोज तयार होत आहेत. अशा वर्तमानात आंबेडकरवादी आंदोलनाची खरी गरज आहे .अन्याय करणाऱ्या प्रवृत्ती विरुद्ध जनआंदोलन करून न्यायाने लढले पाहिजेत .आंबेडकरी विद्यार्थ्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध सरकारला धारेवर धरले पाहिजेत. धर्मभेद व जातीभेद सोडून नव्या शैक्षणिक आंदोलनात सर्वांनी सामील व्हावे. देशाला आज या आंदोलनाची फारच गरज आहे .
जागतिकीकरणाचे आव्हान
वर्तमान परिस्थितीत आंबेडकरवादी आंदोलनासमोर जागतिकीकरणाचे मोठे आव्हान उभे आहे. जग हे खेडे होत असताना जातीय व्यवस्थेच्या भिंती नव्याने उभ्या होत आहेत. देशातील स्वातंत्र्य , समता , बंधुभाव व न्याय या मूल्यांची होळी होत आहे. आधुनिक जागतिकीकरणाने भांडवलदारी व्यवस्थेने नव्या गुलामीचा फास आवळला आहे. आर्थिकतेला प्राधान्य दिल्याने सामाजिक व राजकीय शक्ती क्षीण झाली आहे.
आज भारतीय व जगातील सरकारे श्रीमंताच्या भरोशावर निवडून येत असल्याने सरकारने सारे क्षेत्राचे खाजगीकरण करत आहेत .महाराष्ट्र शासनात नुकताच नवा जीआर काढून सरकारी सेवेतील पदभरती हे खाजगी एजन्सीला देण्याचे ठरवलेले आहे. संविधानातील तरतुदीला आपोआपच समाप्त करण्याचे हे षडयंत्र नक्कीच महाराष्ट्राला व देशासाठी धोकादायक आहे .म्हणून या निर्णयाविरुद्ध मोठे जनआंदोलन करणे आज गरजेचे आहे .जागतिकीकरणाच्या अनुषंगाने विष्णू भागवत असे म्हणतात की, “जागतिकीकरणाच्या नव्या विश्वात भारताचे विघटन व्हावे अशीच अपेक्षा नव्या जागतिक व्यवस्थेकडून बाळगली जाणार आहे.
भारताच्या भौगोलिक आकार ,स्थान ,साध्य संपत्ती त्यांची बाजारपेठ या सर्व वैशिष्ट्यामुळे नव्या जागतिक व्यवस्थेचे तो पहिला लक्ष ठरिवल्या जाण्याची शक्यता निश्चित आहे.” (पा.न.३० जागतिकीकरण नवीन गुलामगिरी डॉ. विष्णू भागवत) जागतिकीकरणाने फक्त आंबेडकरवादी लोकांना पंगू केले नाही तर देशातील ९५% जनता नव्या गुलामीच्या तोंडावर उभी केली आहे. वर्तमानातील शासन हे खाजगीकरणासाठी सुपीक जमीन करून देत आहे. या शासनाचा खरा उद्देश लक्षात घेऊन आंबेडकरवादी आंदोलनाची नवीन रणनीती आखने काळाची गरज आहे. नव्या धोक्यांना समजून घेऊन नवे मार्ग चोखाळणे हेच आंबेडकरवादी आंदोलनापुढील लक्ष असावे. तेव्हाच आपण खाजगीकरणाविरूध्द त मोठा मुकाबला करू शकतो.
संविधान बदलवण्याचे षडयंत्र
वर्तमान शासन व्यवस्था संविधानानुसार आरूढ झाली असली तरी ते संविधानानुसार कारभार करत नाही. एक छत्री अंमल करून केंद्र सरकारने विविध राज्यातील सरकारी पाडले आहेत .सरकारी यंत्रणाचा गैरवापर करून लोकांवर अंकुश लावण्याची वाईट प्रवृत्ती देशात निर्माण झाली आहे .प्रसारमाध्यमे आपले निष्ठा लोकशाहीवर न ठेवता हुकूमशाहीवर ठेवत आहेत.
नोटबंदी व लाॅकडाऊनच्या फतव्यामुळे देश हा एका शोषणाच्या दिशेने गेला आहे. असेच निर्देशनात येत आहे . वर्तमान शासनातील अनेक मंत्री भक्तगण देशातील संविधान विरोधी कार्य करत आहेत. संविधान बदलून मनुस्मृति लागू करावी ही भाषा बोलत आहेत. त्याप्रमाणे काही राज्य मनुस्मृतीची शिकवण देत आहेत .संविधानाला जसेच्या तसे ठेवून आपला सांस्कृतिक, सामाजिक व आर्थिक अजेंडा राबवत आहेत .नव्या शैक्षणिक धोरणातून बहुजनांच्या उच्च शिक्षणाला पायबंध घातला आहे.
श्रीमंताची दुकाने चालवण्यासाठी नव्या शैक्षणिक धोरणाची निर्मिती केली आहे का असा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे . पुरान विचाराचा उदोउदो करून भारतीय संविधानाचे प्राणभूत तत्व पायदळी तुडवले जात आहेत .अशा परिस्थितीत आंबेडकरवादी आंदोलकांनी संविधानाच्या जनजागृतीसाठी स्वतःचा पैसा व वेळ खर्च करावा. संविधानाची नैतिक जबाबदारी कोणती याचे प्रश्न राजकार्त्याना विचारावे .आपल्यावर अन्याय करणाऱ्या मुजोरवृत्तीला उखडून फेकण्यासाठी एकत्र यावे. संविधानासोबत होणाऱ्या छेडछाडीसाठी सरकारला दणाणून सोडले पाहिजेत . इतर समाज झोपेचे सोंग घेत असताना आपल्या संविधानाचे रक्षण करणे हे आंबेडकरवादी आंदोलनाचे परम कर्तव्य आहे. कारण भारतीय संविधान भारताचा खरा श्वास आहे.
भारत की क्या पहचान
एक तिरंगा एक संविधान …
देशाच्या एकात्मतेसाठी आंबेडकरवादी आंदोलना शिवाय तरणोपाय नाही. या देशाला एका सूत्रात बांधणारा आंबेडकरवाद हाच माणसाच्या जीवनाला नवे उन्नयीन प्राप्त करून देऊ शकतो. पण आज या आंबेडकरवादी आंदोलनासमोर फार मोठे आव्हान उभे ठाकले आहेत. आंबेडकरवादी साहित्यातून परिवर्तनवादी विचार पेरणारा आंबेडकरवादी हा रस्त्यावर दिसत नाही .तो गटागटात विखुरलेला आहे.
जाती पोटजातीचे नवे जाळे तयार करत आहे .मातंग बांधवाने शेड्युल कास्ट मधील आरक्षणातील अ ब क ड अशी विभागणी करावी अशी मागणी केली आहे.ते बौद्ध बांधवांना आपला शत्रू म्हणत आहेत. ज्या ब्राह्मणवादाने त्यांना गुलाम ठेवलं त्यांचा विरोध न करता, आरक्षणाच्या विभागणीसाठी चर्चा करत आहेत. या समूहासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निकराची लढाई लढली ते शेड्युल कास्ट आपल्यातच लढत आहेत.
ज्यांनी मागे ठेवले त्यांच्या कळपात जाऊन बौध्द बांधवाना बोल ठेवत आहेत. पण ही नवी व्यवस्था म्हणजे जातीच्या भिंती पुन्हा उभ्या करण्याचे षडयंत्र आहे म्हणून मातंग बांधवाने न्यायाच्या बाजूने उभे राहावे .आपल्या मुलाला योग्य शिक्षण द्यावे .जेव्हा अन्याय होतो तेव्हा आंबेडकरवादी माणूस पुढे असतो.पण आज हाच बांधव विरोधी पक्षाच्या लोकांच्या हातचे बाऊले झाले आहेत .त्यांनी आपली अस्मिता समजून काम करावे कारण हा एक आंबेडकरवादी आंदोलन फूट पाडण्याचा प्रयत्न असल्याने फसव्या डावपेचात त्यांनी फसू नये. आंबेडकरवादी आंदोलनाची धग कायम राहावी यासाठी संदीप गायकवाड आपल्या एका कवितेत म्हणतात की,
“अंधार पेरणाऱ्या श्वापदांनो
तुमच्या फसव्या मायाजालाचे
इमले उध्वस्त करायचे आहे
माणसाला गुलाम करू पाहणाऱ्या व्यवस्थेचा शिरच्छेद करायचा आहे आपल्या देशबांधवांना लुटणाऱ्या टोळक्यांचा बंदोबस्त करायचा आहे अंधार पेरणाऱ्या श्वापदांना आंबेडकरवादी आंदोलनाने
मुळासकट उखडून फेकायचे आहे…”
वर्तमान अतिशय खदखदत असताना आपण झोपेचे सोंग घेऊन घरात बसून राहाणे हे उचित नाही .तर आंबेडकरवादी आंदोलकांच्या खांद्याला खांदा लावून क्रांतीची नवे फलित पेटवायला हवे.
समाधान
१) आंबेडकरवादी आंदोलकांनी आपण फक्त एका समूहाची जवळकी न साधता भारतीय समाजातील सर्व माणसांना आपल्या आंदोलनात सहभागी करून त्यांना खरी जाणीव करून द्यावी.
२)वर्तमानात होणारे माणसाचे शोषण व मूलभूत हक्काचे उल्लंघन हे समाजाला समजावून द्यावे.
३) देशातील कामगार संघटना, सामाजिक संघटना, आर्थिक संघटना, नौकरशाही, राजकीय पक्ष, साहित्यिक चळवळी ,विद्यार्थी संघटना यामध्ये समन्वय ठेवून आपल्या निश्चित ध्येय कोणते व ते कसे साध्य करता येईल याचा एक रोपमॉडेल तयार करावा. जेणेकरून वर्तमानातील आंबेडकरवादी आंदोलनाला कोणताही माणूस वेगळ्या नजरेने पाहणार नाही.
४) भारत हे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. भारतीय संविधान हाच साऱ्या देशांचा राष्ट्रग्रंथ आहे .आपापले भेदाभेद नष्ट करून संविधाननिष्ठ माणूस तयार व्हावा. यासाठी अनेकांनी आंबेडकरवादी आंदोलनात सामील व्हावे.
४) वर्तमानातील देशाच्या नेतृत्वाची समीक्षा करावी. अन्यायकारी कायद्याच्या विरुद्ध एल्गार करावा. भारतीय माणसाचे होणारे शोषण कशामुळे होते हे समजावून द्यावे. संविधान साक्षरता अभियान राबविणे हा आंबेडकरवादी आंदोलनाचा मुख्य हेतू असावा .
समारोप
वर्तमानात आंबेडकरवादी आंदोलनासमोर आव्हाने व त्याचे समाधान या निबंधातून व्यवस्था परिवर्तनाचे नवे विचार प्रयुक्त केले आहेत .सामाजिक ,शैक्षणिक, राजकीय, धार्मिक ,सांस्कृतिक, जागतिकीकरण ,साहित्यिक अशा विविध आव्हानाचे वास्तविकता आपण समजून घेतली पाहिजे.
आपल्यापुढील आव्हानाचा मुकाबला करून अहिंसेच्या माध्यमातून आपले आंदोलन करायला हवे .भारतीय राज्यघटनेच्या सूत्रातच आपले समाधान लपले आहे. त्यामुळे देशातील सर्व नागरिकांनी भारताचे संविधान वाचले पाहिजे. तसेच ते आचरणात आणले पाहिजेत .संविधान नैतिकता निर्माण करणे हे आंबेडकरवादी आंदोलनाचा मुख्य हेतू असावा प्रकाशमान भारत करण्यासाठी वर्तमानात आंबेडकरवादी आंदोलनाची गरज आहे .कवी बाबुराव बागुल आपला एका कवितेत म्हणतात की,
“कधीकधी मनामध्ये शिरतोस तलवारीवरी विचार
फिरावे वाटीत बंदुका शस्त्रांच्या सामर्थ्यावर
संबोधीच्या साथसोबतीने टाकावा बदलून भारत
कधी कधी मनामध्ये शिरतो सुगंधापरी विचार
धारण करावे चिवर व्हावे बौद्ध भिक्षू प्रखर
मनामनातला काळोख करून गोळा द्यावा दूरवर नभापलीकडे काळोखात काळोख अन्
करावा पुन्हा प्रकाशमान भारत अन् माणूस महान”
आंबेडकरवादी आंदोलनाचा केंद्रबिंदू माणूस आहे. माणसाच्या परिवर्तनाची नवी महाऊर्जा देण्याचे काम वर्तमानातील आंबेडकरवादी आंदोलन करत आहेत .देशातील विविध समस्येवर शांत मार्गाने आवाज उठवत आहेत. नागपूरच्या आंबेडकर भवन जागेसाठी महिलांनी एल्गार पुकारला आहे.त्यामुळे वर्तमानातील आंबेडकरवादी आंदोलन नव्या भारताच्या निर्मितीचा क्रांतिघोष आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
संदर्भ:१) ॲड. भागवत विष्णू, जागतिकीकरण नवीन गुलामगिरी,समता प्रकाशन नागपूर पृ क्र.३०
२) डॉ.भवरे महेंद्र,दलित कवितेचे अर्धशतक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,मुंबई पृ.क्र.१२४
३)डॉ.राठोड प्रकाश,डॉ.पठाण अक्रम, बदलते विश्व आणि साहित्यापुढील आव्हाने,युरो वर्ल्ड पब्लिकेशन, मुंबई पृ.क्र.१९
४)Dr.Babasaheb Ambedkar the Architect of Modern India.R T M N U Nagpur
-संदीप गायकवाड
नागपूर
९६३७३५७४००
ReplyForward |