📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

सरतं वर्ष आणि नववर्षात काय नाविन्य?

On: September 18, 2025 9:12 PM
आम्हाला फॉलो करा:
सरतं वर्ष आणि नववर्षात काय नाविन्य?
नववर्षाच्या पूर्वसंध्येला जवळजवळ प्रत्येकच घरातले दिवे मध्यरात्रीपर्यंत सुरू असते. त्यामुळे देश रात्रीसुध्दा जागा असतो असं म्हणायला हरकत नाही. सरत्या वर्षाला निरोप देत असताना कटू-गोड आठवणींची सोबत असते. हे वर्ष खूप काही देऊन आणि शिकवून जाते. त्यामुळे हे सरतं वर्ष अनेक प्रकारे प्रेरणादायी आणि आश्चर्यकारक ठरते. याच आश्चर्यामुळे सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचं जल्लोषात स्वागत केल्या जाते. हा सोहळा जेवढा नेत्रदीपक असतो, तेवढाच मनाला सुखावणारा आणि नवी उमेद देणारा ठरतो. पण…
       ज्याप्रमाणे कोणतीही व्यक्ती जडभरीत वस्त्रांनी आणि वेगवेगळ्या सौंदर्य प्रसाधनांनी नटून-थटून चारचौघात गेल्यावर त्याला कुणीही नवं तर म्हणणार नाही ना! एवढच का जोपर्यंत त्याच्या शरीरावर जडभरीत वस्त्र व प्रसाधनं असते, तोपर्यंत तो थोडा वेगळा वाटतो. ते सर्व उतरल्यावर ‘जुनं ते सोनंच’ असते. अगदी त्याचप्रमाणे आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस हा सारखा नसतो. असं असलं तरीही प्रत्येक दिवसात काहीतरी ‘नवं’ असतंच असं नाही. पण एक मात्र निश्चित त्यात ‘वेगळं’ काहीतरी नक्कीच असतं. आणि या वेगळेपणामुळेच उगवणारा प्रत्येक दिवस आपल्याला नवा वाटत असतो. याच वेगळेपणाचे नाविन्य ओळखले तर प्रत्येक दिवस हा नववर्षाची ‘सुरुवात’ ठरू शकतो.
       सूर्याच्या प्रत्येक किरणाला सप्तरंग असते. ज्याला आपण ‘इंद्रधनुष्य’ या नावाने ओळखत असतो. या सात रंगापैकीच एक रंग स्मृतीचा असतो आणि हा स्मृतीचा रंग ज्या क्षणाला सर्वांगाने स्पर्शून जातो, तो क्षण अविस्मरणीय ठरतो. पण या रंगालाही वेगवेगळ्या छटा असतात. कधी सुखाची तर कधी दु:खाची, कधी यशाची तर कधी अपयशाची, कधी कॅन्सरची तर कधी कोरोनासारख्या व्हायरसची. पण काहीही असो, अशा क्षणामुळेच पूर्ण वर्ष अविस्मरणीय ठरत असते. म्हणूनच नववर्षाचं स्वागत करताना पाठमो-या वर्षाला विसरावं असं वाटत नाही.
               ऊन पावसाचा मिलाफ होता
                   इंद्रधनुष्य नभी दिसतो
            सुख दु:खाचे सप्तरंग अवतरता
                   नियतीचा खेळ कळतो
       नवीन वर्ष म्हणजे विविध संकल्पाचा मुहूर्ताचा क्षण! भूतकाळाच्या अंधारात हरवलेल्या क्षणांच्या गर्ततेतून आलेली जीवनाची ‘नाव’ उज्ज्वल भविष्यातील स्वप्नांच्या यशाच्या किनारी लावण्याची नवी उमेद देणारा क्षण…पण स्वप्न कितीही आपुलकीनं रंगविली तरीही ते कधीच आपली होत नसतात. मानवी जीवनाची अस्थिरता आणि स्वप्नांची क्षणभंगुरता यांचं नातं कासवाच्या कवचासारखं घट्ट विणलेलं. हा त्यांचा संबंध नववर्षाच्या पहिल़्या दिवशी जाणवतच नाही. पण जुनं होणा-या वर्षाकडे पाहिलं की, हे खरं वाटायला लागतं. म्हणून मग नववर्षाचं स्वप्न रंगविणे म्हणजे तळहातावरच्या आयुष्य रेषेची लांबी मोजण्यासारखं आहे. मानवी कल्पक बुद्धीचा विचार करता…
                   ईश्वर साक्षी नवीन वर्षी
                 करीन प्रयत्न नव्या दमाने
                 संकल्पांच्या पुण्यतिथीला
                  संकल्पाचे स्मरण नव्याने
       सुरू होणारं नववर्ष एक वर्षानंतर जुनं होणारं असतं. पण तरीही नववर्षाचा पहिला दिवस आपल्या आयुष्यात वेगळच महत्त्व घेऊन येतो. या दिवशी उगवणारा सूर्य तोच असला तरी नववर्षाच्या ‘सुखाची भूपाळी’ गात येतो. त्यामुळे त्याच्या चेह-यावर एक ‘पाहुणपण’ जाणवतं आणि म्हणूनच अशा पाहुण्याचं स्वागत करण्याची अदम्य इच्छाशक्ती प्रत्येकाच्या चेह-यावर स्पष्टपणे जाणवते.
                   इंचभराने फुगली नाही
                 यगायुगांची खोगिरभरती
                सूर्य कारकुन रोज सारखी
                 सही ठोकतो मस्टर वरती
       नववर्षाच्या पूर्वसंध्येला मावळतीकडे निघालेल्या सूर्याला निरोप देताना मनाला लागलेली भावस्पर्शी हुरहुर तर दुसरीकडे गुलाबी बोच-या थंडीत कुडकुडत का होई ना थर्टीफर्स्ट साजरा करण्यासाठी चाललेली लगबग यामुळे निरोप आणि स्वागताचा हा एक आनंददायी ‘सोहळा’ होत असतो.
       मावळतीच्या वर्षात केसर रंगात अर्घ्यस्नान करून सूर्य मोतीजडीत लाल जडभरीत प्रकाशमय वस्त्र परिधान करण्यासाठी क्षीतिजाआड गळप होतांना गलबलून आलेलं हळवं मन कृत्रिम रोषणाईच्या आरासीत, फटाक्यांच्या आतषबाजीत विचारांना नावीन्याचा मुलामा चढवून नव्या वर्षात समरस व्हायला लागतं. संगिताच्या मधूर स्वरात अन् ढोलताशांच्या निनादात नव्या वर्षाच्या स्वागतासाठी सर्वजन सज्ज असते.
‘सुखमय वैभवाच्या पानाफुलांनी 
बहरत यावे नववर्ष
अमृतमय आनंद फळांनी
बहरावा जीवनवृक्ष’
       यासारख्या लक्षवेधी शब्दांच्या संगतीनं मनही हरखून जातं. येणारी आव्हानं नव्या उमेदीनं पेलण्यासाठी हे नववर्ष प्रत्येकाला खुणावत असतं आणि प्रत्येकजन हे आव्हान पेलण्यासाठी आपआपल्या परीने तयार होत असतो आणि प्रत्येकाला सांगत असतो…
गेले दिवस विसरूनिया
 करा स्वागत नववर्षाचे
पाऊल उचला न डगमगता
 नव कल्पीत आशेचे
– शब्दस्पर्शी-सुनील शिरपुरे
कमळवेल्ली,यवतमाळ
भ्रमणध्वनी-७०५७१८५४७९

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now

Leave a comment