Vidarbha Rain Alert : राज्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असतानाच आता विदर्भासाठीही महत्त्वाची हवामानाची माहिती समोर आली आहे. पुढील 48 ते 72 तासांत विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, दक्षिणेकडील भागात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम आता विदर्भावरही दिसून येणार आहे. त्यामुळे अमरावती, नागपूर, अकोला, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा यांसह अनेक जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
विशेष म्हणजे गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. काही भागांत 100 मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
मागील काही दिवसांपासून विदर्भात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, अतिवृष्टी होणाऱ्या भागांमध्ये नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे आणि कोकणातील अनेक भागांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. काही जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
हवामान विभागाने नागरिकांना नदी, नाले आणि पाण्याचा वेग असलेल्या ठिकाणी जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.








