मुंबई : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून घराघरात पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता गौरव मोरे सध्या एका खास कारणामुळे चर्चेत आला आहे. नुकतेच मुंबईतील पवई येथे त्याने स्वतःचे नवीन घर घेतले असून, या घराला बॉलीवूडचे ज्येष्ठ विनोदी अभिनेते जॉनी लिव्हर यांनी अचानक भेट दिली. या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
गौरव मोरेने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर हा खास व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये जॉनी लिव्हर घरात प्रवेश करताच गौरव त्यांचे पाय धरून आशीर्वाद घेताना दिसतो. हा भावनिक क्षण पाहून अनेक चाहत्यांच्या डोळ्यात पाणी आले.
व्हिडिओमध्ये गौरव म्हणतो की, “आज माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस आहे. हे स्वप्न सत्यात उतरेल असे कधी वाटले नव्हते. आज माझ्यासाठी मोठे सरप्राइज आहे.”
यानंतर गौरवने कॅप्शनमध्ये जॉनी लिव्हर यांच्याबद्दल मनातील भावना व्यक्त केल्या. त्याने लिहिले की, “प्रिय जॉनी लिव्हर सर, आज तुमचे पाय आमच्या नव्या घराला लागले आणि आम्ही धन्य झालो. तुमचे सिनेमे पाहण्यासाठी लहानपणी खूप धडपड केली. तुम्ही आमच्यासाठी प्रेरणा आणि गुरू आहात. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद कायम आमच्यावर राहू द्या.”
हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी गौरवचे भरभरून कौतुक केले आहे. अनेकांनी “जिंकलंस भावा”, “संस्कार असेच असतात”, “यश मिळूनही जमिनीवर राहणारा कलाकार” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.
गौरव मोरेचा हा साधेपणा आणि आपल्या गुरूविषयी असलेला आदर पाहून चाहत्यांनी त्याच्यावर पुन्हा एकदा प्रेमाचा वर्षाव केला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.








