📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

तिफण : पावसाळ्यातील ग्रामीण जीवन, पेरणी आणि बालपणीच्या आठवणी.!

On: June 12, 2026 2:18 PM
आम्हाला फॉलो करा:
तिफण चालवताना शेतात बैलजोडीसोबत काम करणारा शेतकरी आणि पावसाळ्यातील हिरवेगार ग्रामीण दृश्य
तिफण चालवताना शेतात बैलजोडीसोबत काम करणारा शेतकरी आणि पावसाळ्यातील हिरवेगार ग्रामीण दृश्य

माय पायटीच सयपाक खोलीत चुलीवर गंजात गरम पाण्याचं आंदन घेऊन न्याहरीच्या ज्वारी,उडीद भरड धान्य मिसवून चक्की वरून दवून आणलेल्या ज्वारीच्या पिठाच्या हातावर मस्त मिसयच्या भाकरी थापायची. ताव्यावर हिरव्या मिरच्या भाजून गडव्यानं त्या कुस्करून बारीक करायची म्हणजे ठेचायची. म्हणूनच कदाचित त्याचं नाव ठेचा पडलेलं असावं. त्या मंद पहाटेच्या प्रहरी चुलीतल्या त्या लाकडाच्या उजेडात आईचा चेहरा चमचम चमकायचा.

आमचं घर म्हणजे समोर छोटीशी माडी धाब्याची खोली, त्याच्या मागं कौलारू सपरी म्हणजे ओसरी.ओसरीत एका कोपऱ्यात सातऱ्या,वाकया ठेवायची लाकडाची घडोसी. धान्याची,मातेऱ्याची पोतीच पोती.त्याच्याच समोर आठ बाय चारची कुडाची व शेणा-मातीचा गीलावा दिलेली सयपाकखोली.तीच्या भिंतीवर शेतातुन आणलेल्या तुऱ्याटया, पऱ्हाटयाईच्या छावन्या टाकलेल्या. ज्या पावसापासून भितीचं रक्षण करायच्या. दाठ्ठयाले पावसाचं पाणी लागू नये म्हणून मेनकापड आथरलेला असायचा.

ही सयपाक खोली म्हणजे त्याच्यातच कोपऱ्यात इंधनाचा कवटा.चूलीसमोर हिवाळ्यात अंग शेकण्यासाठी दोघं तीघं माणसं बसतील एवढी जागा.वरते आडव्या, उभ्या कमच्या लावून छोट्या खिडकीसारखं धूपट जाण्यासाठी व्हेंटिलेशन सारखं धूराडं केलेलं.पाटलीवर धुपटानं कायी ठीक्कर व चेपचाप झालेली एक,दोन गंज. ताराचा आकोडा केलेली व खुटीला लटकवलेली तेलाची शिसी.भांडीकुंडी ठेवण्याचं लहानसं लाकडाचं तुटकं कपाट. समोरच इटोला इटोल्याच्यावरते कनोडा हा कनोडा फार फारफार तर दिवालगीरी नाही तं अंगार डब्बी ठेवायच्या कामी यायचा. भितीत दोन काड्या रोवून पाटली टाकलेली.त्यावर धुपटानं झालेली कायी ठिक्कर भांडीकुंडी. व तिखट मीठाचं गाडगं,मडकी असायची. कोपऱ्यात वाटघाट करण्यासाठी पाटा,उरोटा त्याले आजकालच्या भाषेत वरवंटा म्हणतात.एक फडकं गुंडाळलेली लोणच्याची भरणी, स्टीलचा पाण्याचा गुंड पाण्यानं भरलेला.

सयपाक खोलीत व्रतें टांगलेलं कांदे लसन ठेवण्याचं ताराचं सुंदर विणलेलं शिकं असायचं. तुटका मोडका कुत्री मांजरं जाऊ नये म्हणून साकई कोंडा लावलेला व धुपटानं कायाशार झालेला दरवाजा.तो लावतांना सहजासहजी लागायचा नाही.एखादं तान्हं पोरगं काखीत अलगद उचलून घ्यावं तसं त्याले वर उचलून घ्यावं लागायचं तरच तो लागायचा. घरासमोर महादेवाचं खुप जुनं मंदिर. झडीपाण्याच्या दिवसात शेतीचं कामं बंद असली म्हणजे पोथी लागायची. आईसोबत पोथी ऐकायला व साखऱ्याचा प्रसाद खायला आम्हीपण सोबत जायचो.

जुन महिन्यात मृग नक्षत्राला सुरूवात व्हायची. मीरगाच्या दिवसात घरात निघालेल्या मिरूगाच्या किटकाची हयदकुकु टाकून पुजा व्हायची. या किड्यांच दर्शन मात्र मिरूगातच व्हायचं. आठ,आठ दिवस साजरी मिरगाची झडी लागायची.चांगली सात आठ रोजाची, वारं,हवा पाणी, बुडापासून झाडं उन्मळून पडायची. आठ आठ दिवस गाव खेड्यातील इलेक्ट्रीक बंद असायची. जिकडे तिकडे पाणीच पाणी व काळाकुट्ट अंधार. त्या अंधारात घराजोळच्या महादेवाच्या मंदिरात चाललेल्या हरीपाठाच्या टाळांची किनकिन कानावर पडून सारा आसमंत भक्तीभावाने भारावलेला.शेजारच्या नदीनाल्यातील बेडकांच्या डराव डराव व रातकिड्यांच्या आवाजानं रात्रीचं वातावरण अधिकच कून्न वाटायचं.

या भयाण अंधारात घरामागच्या गर्द मोठ्या कडुनिंबाच्या झाडावर बसलेल्या घुबडाच्या घुत्कारानं वातावरणातील भयावहता अधिकच गडद जाणवायची.अशा याच्यात एखाद्या लहान पोराले जोराची लागली म्हणजे त्याची आजी तमरेट घेऊन सोबत यायची.गावखेड्यात प्रत्येकाला कंदीलाच्या धुसर उजेडाची सवय झालेली. जेवणंही कंदिलाच्या उजेडात पार पडायची.गर्मीनं लहान लहान तान्ह्या बाळांची मोठी खातर निंघायची. पण आजच्या सारखं एवढं उन्हाचं प्रमाण तेव्हा नसायचं. लोकं एटायात खाटा टाकून नाही तर मावदाच्या घरांवर,छतावर मस्त पंख्याशिवाय निवांत झोपायची.पुलावरून पाणी असल्याने पुराच्या पाण्यानं वाहतूकीचे सगळे रस्ते बंद रहायचे.

आजूबाजूच्या परिसरातील साऱ्या छोट्या छोट्या गावाचा सम्पर्क तुटलेला. बिमार पडलं तर डॉ. चा पत्ता नाही. पण माणसं गावरान पोषक आहारानं धष्टपुष्ट होती. घराजवळच्या नदीच्या पुराच्या पाण्याचा सो-सो भितीदायक आवाज यायचा.नदीच्या पुरामुळे पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन वाहून गेलेली. त्यामुळे पिण्यासाठी व वापरासाठी नदीच्या पाण्याशिवाय पर्याय नसायचा.अशा पाण्या,पावसाच्या वातावरणात ऐनवेळी घरातलं सगळं पीठ संपून जायचं.सयपाकाची पंचाईत व्हायची. आई शेजारच्या घरुन गीलासभर उसनं पिठ आणायची.

एखाद्या आजूबाजूच्या परिसरातील खेड्यातील इलेक्ट्रीक आहे का चौकशी व्हायची.मग पायदळ चारदोन कोस दोन,तीन पायल्या डोक्शावर धान्याचं चुंबळं घेऊन चिखलानं कपडे भरू नये म्हणून पायजामा खोसून बाप खेड्यावर चिखलाची वाट तुडवत तरातरा निघायचा.कुठं दुपारी उशीरा घरी यायचा. तेव्हाच पोटात भाकर पडायची.नाही तर आजी जात्यावर कण्या भळळून त्या चूलीवर शिजवून आई पोरांना ताटलीत तेल मीठ टाकून खायला द्यायची. पोरं चुलीच्या विस्तवावर तेल मीठ लावून भाकरीचे पोपळे भाजायची. हाच आमच्या काळातला लिज्जत पापड असायचा. मस्त कुरूम, कुरूम लागायचा.

अशा झडीपाण्यात आईवडीलांना बाहेरचं काम नाही भेटलं म्हणजे घरखर्चावरही पद्धतशीर नियंत्रण असायचं. शक्यतोवर घरच्याच भरड धान्यावर भागवावं लागायचं. तर कधी जात्यावर दयलेल्या दायीच्या बेसनाच्या चूनोळया,वळया, बजारात स्वस्त भेटलेली वांगी कापून टपराचा डबा भरून ठेऊन केलेल्या उसऱ्या झडीपाण्याच्या दिवसात कामी पडायच्या.शेतातली सुकवून वाळवून ठेवले ली हरभऱ्याची दाय टाकून केलेली अंबाडीची भाजी, शेतातल्या गवाराच्या वाळवलेल्या शेंगा मस्त लागायच्या.

बाजारहाटाच्या दिवशी भाजीपाल्यापेक्षा चिंता फक्त तिखठामीठाची रहायची.तीले अगोदर प्राधान्य दिल्या जायचं. तेलाच्या शिशीला ताराचा आकोडा करून तो बोटात अटकवून पावशेर खायचं मद्रास नाही तर जवसाचं पिव्वंधम तेल मूलतान सेठच्या दूकानात आवर्जून भेटायचं व तेही साजरं निगुतीनं आठवडाभर पुरवायला लागायचं.मधात तयनवयन बंद म्हणजे बंद. फक्त सणासुदीच्या दिवसात तळण बघायला भेटायचं.बाकी मधात तेल सरलं तर भाकरीवर कोरड्या चटणीचा भुगा व त्यावर गीलासातल्या पाण्याची धार असायची. सोबत एकाच भुक्कीत फोडलेला कांदा व निंबुच्या रायत्याची तिखटामीठात मुरलेली फोड तोंडी लावायला असायची. घराच्या कौलारू पाख्यावर कारल्याची,दोडक्याची हिरवीगार वेलं लकटलेली रहायची. त्यामुळे अनेक पर्याय असल्याने ग्रामीण भागात पालेभाज्या किंवा भाजीची चिंता नसायची.

नेमक्याच याच पावसाच्या दिवसांत आमच्या शाळा सुरू व्हायच्या मंग उसनपासन करून उधारपाधार पैसै घेऊन बाप तालुक्यातील गावाला थैली घेऊन भाऊंच्या एसटीनं जायचा. आमच्या साठी खर्चात काटकसर करून नवी कोरी पुस्तकं आणायचा. त्या नवीन आणलेल्या कोऱ्या छन पुस्तकाचा सुगंध नाकात दरवळायचा. त्यामधे मोरपीस नाही तर वर्तमानपत्रातील कापलेली चित्र कापून ठेवायचो.एरव्ही अगोदर गावातच पास झालेल्या पोरांची अर्ध्या किमतीत पुस्तकं मिळतात काय म्हणून आधी शोध घेतल्या जायचा.पैसे बाजाराच्या दिवशी देणार म्हणून बोली असायची.

गावकीचं काम त्यामुळे प्रत्येकाचा व्यवहार उसन्यापासन्यावरच भागायचा. पेरणीसाठी आणलेल्या महाबीज बियाण्यांच्या थैलीपासून दप्तर शिवलेलं असायचं.रेनकोट म्हणून साखऱ्याची किंवा गव्हाची रिकामी गोणी असायची. तालुक्यातील गावातून शेतीसाठी सामान पेरणीच्या सरत्यासाठी नायलॉन दोरी. जूवाळी अडसाले नवंकोरं सूती चऱ्हाट, तिफनीसाठी, डवऱ्यासाठी नवी बल्ली बाजारातून एसटीच्या टपावर टाकून बाप आणायचा.व पेरणीच्या वेळी लवकर कामात पडण्यासाठी आंगणात किकरं,वासला घेऊन बसलेल्या निळकंठा मिस्त्रीच्या घराची वाट धरायचा. “सकाय आऊतभांड पेरण्याच्या कामात पाडजो राज्या”म्हणून त्याची विनवनी करायचा.

आम्ही संध्याकायच्या चारच्या एसटीची वाट बघत हिंगणबेटाच्या झाडाखाली तासनतास स्टॅण्ड वर वाट बघत आळोखे -पिळोखे द्यायचो. सोबत असलेला सायकलचा टायर व काडीनं तेथेच सडकेवर नाही तर जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मैदानावर खेळायचो.बाप एसटीतून उतरतांना दिसला म्हणजे धूम ठोकायचो.बजाराची थैली डोक्यावर धरून घरी आनंदात आणायचो. बापानं तालुक्याच्या गावावरून आणलेलं उजळणीचं पुस्तकं नव्या कोऱ्या पुस्तकाचा सुगंध नाकानं हुंगायचो. तो नाकात गेलेला मनमोहक सुगंध वर्षानुवर्षे तसाच दरवळत रहायचा ती आठवण अजूनही जशीच्या तशी मनात आहे.

शाळा झाली म्हणजे चिखलातून वाट काढत पावसात पोरं छत्र्या नसल्याने पेरणं संपल्यावर ज्या बि-बियाण्याच्या महाबिजच्या रिकाम्या थैल्यांची दप्तरं पाठीवर टाकून डोक्शावर डी.एपी किंवा युरिया खताच्या रिकाम्या थैल्याईची घोंगडी करून आरामात पाणी पावसातून गावच्या स्टॅण्डवर एक फर्लांग असलेल्या शाळेकडे आनंदानं पाणी उडवत उडवत निघायची.

रातभर चाललेल्या पावसानं दुसऱ्या दिवशी घमेलभर नदीकाठची किंवा बाजुच्या आखरातून पीवयची माती आणून ती ओसरीत कालवून बारकी सरकी पालवल्या जायची. बि-बियाणं घरचचं असल्यानं हा सगळा खर्च वाचायचा.हे सगळं करण्यासाठी बापाची चांगलीच कसरत व्हायची. आई बैलांच्या खुरावर तांब्यात पाणी घेऊन टाकायची. तिफणीची व पेरणीच्या लोकांना कुकवाचा टिक्का लावून आरती ओवाळून प्रसाद वाटायची. शेतात तीफन चालू असताना भलकशी मजा यायची.

पडलेल्या पावसानं भिजलेली जमीन ओलीचिंब होऊन तीचा लोण्यासारखा सुंगंध वातावरणात दरवळायचा.

शामराव चंभाराच्या दूकानातून आणलेली टायवरी चप्पल घालून व जागोजागी फाटलेला पायजामा टोंग्यां पर्यंत घोय घोचणारा बाप झोकात तिफन हाणायचा. ओलसर निंबर लोण्या सारख्या मातीत तिफनचे तीन ओरखडे सुंदर वाटायचे.सोबत सरते घेतलेली तीन माणसं दोन घरचीच नाही तर एकमेकांच्या संग ‘तू माह्या वावरात पेराले येजो’ म्हणून सायळ लावलेली असायची.

एकाचा बैल तर दुसऱ्याचा वखर अशी ती गमंत असायची.पैसे द्यायचं काम नसायचं. अडल्या नडल्याचं काम धकायचं. पेरलेलं शेत लग्नात नवरीच्या हातावर काढलेल्या मेंहदी सारखं गोंदलेलं वाटायचं व चार आठ दिवसांत हिरवा भरजरी शालू नेसलेल्या नवरी सारखं हिरवं,हिरवं दिसायचं. एक्कर दोन एक्कर काम हाताखाली राहिलं म्हणजे कामानं थकलेला व पोटात भुक लागल्यावर पेरणीचा जथ्था झाडाखाली विसायचा.


सोबत आणलेल्या शिदोऱ्या,भाकरी काढल्या जायच्या.थंडगार पाणी पोटात रिचवणं झाल्या वर व खिशात किंवा करदोडयाले बांधलेल्या पितयच्या दातकोरणीनं घडीभर दात कोरणं झालं म्हणजे पानसुपारी, चुना, तंबाखू, खाऊन चंचईतल्या बारीक वाटलेल्या काताची व लवंगीची आपसात देवाणघेवाण व्हायची. यासाठी मस्त बारीक,बारीक डब्ब्या असायच्या अगदी होमीयोपॅथीचा डॉ. गोया देतो तशा.बांडीसातल्या खिशातल्या चंचंईतलं पान खाणं झालं की नव्या ताकदीनं तरतरी आलेली माणसं परत तिफन हाणायची.दिवस डूबेलोक हे आंगमेहनतीचं काम सलगपणे एकसारखं न थकता सुरू रहायचं.

पेरणी आटोपून संध्याकायी तिफना माघारी घराकडं फिरायच्या एकामागं एक धष्टपुष्ट बैलजोड्या पाहून संध्याकाळी ५.०० वाजता नुकतीच शाळा सुटायला आलेली.शेतकऱ्यांची पोरं बैलांच्या गळ्यातील कसांडीच्या आवाजानं बिथरायची. हातातली पुस्तकं दप्तरात भरून घाईघाईने खिडकीची गज हातात पकडून रस्त्यानं चाललेल्या तिफणीचा जथ्था न्याहाळत बसायची. काही तर शाळेच्या समोरच्या वऱ्हांडयात येऊन शाळेच्या टनटन वाजणाऱ्या घंटीची वाट बघत रहायची.शाळा सुटली रे सुटली की धावतपयत रस्त्यानं दिसलेल्या तिफन टाकलेल्या कळोनावर बसून मस्त घरालोक डावडाव करायची मस्त मजा यायची.

घरी आल्यावर हातपाय धुवून सयपाकखोलीत चुलीसमोर बसून आईवडीलांसोबत गरमागरम डबलरोटीसोबत सोबत चहा घ्यायची. पण हल्ली आता हे चित्रच गायब झालं. आता बैलजोड्या हद्दपार होऊन आधुनिक तंत्रज्ञानानं थोडीफार सोय झाली, गावात ट्रॅक्टर आले. त्यामुळे श्रम कमी होण्यास या तंत्रज्ञानाची मदतच झाली.पण गायकवाडयांतील गव्हाणी ओस पडल्या हेही तितकच खरं पण त्याला बरीच कारणं आहेत. जनावरांना चारा भेटत नाही. कारण तो पेरणं जंगली जनावरांमुळे शेतकऱ्यांना परवडत नाही.रानडुकरे, रोही,हरणांची कळपं यांचा हैदोस वाढला.

हे एवढं राजालाही दुर्लभ ऐश्वर्य भोगलेल्या पिढीचा आता आधुनिक काळात इतक्या सोईसुविधा असूनही आता या गजबजलेल्या शहरात जीव रमत नाही. गावाचं सुंदर हिरव्यागार निसर्गाचं,तुडुंब भरलेल्या नद्या-नाल्याचं, व शेतीचं तेच चित्र वारंवार डोयासमोर तरळतं.ती आठवण जाता जात नाही.पण हे सगळं आठवलं म्हणजे आठवणींचा हुंदका येऊन मन मात्र हिंदोळ्यावर झूलत राहतं,पेरते व्हा,पेरते व्हा करत झाडाच्या उंच फांदीवर बसलेल्या पक्षासारख़ं.

– प्रा. विजय जयसिंगपुरे

अमरावती.

भ्रमणध्वनी-.९८५०४४७६१९

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now