प्रिय मुलानो,
आज मला तुमच्याशी मनसोक्त बोलायचं आहे, कधी कधी वाटतं, तुमचं वय आणि तुमचा अनुभव आणि समजून घेण्याची कुवत लक्षात न घेता प्रौढ गुंतागुंतीच्या अडचणीच्या विषयावर माझ्या मनाला कठोर शिस्तीत बांधून जास्त मोकळेपणाने बोलणार आहे.
मला माहित नाही तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करत आहात पण जेही विचार कराल तेच मी माझ्या व्यक्तिमत्त्वाचं बक्षीस समजतो, मुलांनो मोठेपणाची एक जबाबदारी असते जेव्हा तुमच्यावर अडचणीची वेळ येईल तेव्हा तुम्ही अभिमानाने कर्तव्य निभावण्यात तुम्ही तसंही कमी पडणार नाही यावर माझा पूर्ण विश्वास आहे.
समोरील जीवन कोणत्या धारेला लागतील त्यात किती खाचखळगे असतील हे मी आता तुम्हा पोरांना कसं सांगू शकतो बरं! म्हणून डोळे मोठे करून,नाकाचे शेंडे लाल करून माझ्याकडे रागाने बघू नका, तुम्ही कितीही उसासे, सुस्कारे टाकलेत तरी तुम्हाला न आवडणाऱ्या विषयावर मी बोलणार आहे.
कर्तव्य ! कामाची यादी ! आणि जबाबदारी ! परस्परामधल्या नात्याचे बंध, कोटुंबिक संस्कृती, परंपरा आणि नितीमुल्याचा आग्रह…कठोर शिस्त आणि सारच झुगारून देणारी बंडखोरी…तासन तास चालणारे टेलीफोन कॉल्स… मध्यरात्री पर्यतच्या चालणाऱ्या पार्ट्या आणि इंटरनेटवरचं चैटिंग…वयात येतानाच्या काळज्या, कोवळ्या वयातील प्रेम, झपाटून टाकणारं शारीरिक आकर्षण आणि मैत्रीची नाजूक गुंतागुंत,
मुलांनो तुम्ही आज ज्या क्षणात जगताय ते क्षण अतिशय विलक्षण आहे, जणू काही तुमच्या जीवनाचं टर्निंग पॉईंट,आज अभ्यास करणं काळाची गरज आहे, आपण वर्गात सगळ्याच गोष्टी शिकलो आहे, अभ्यासातील गुणवत्ता,स्वअध्यापन,अध्ययन, समायोजन,अभिरुची,अभिवृत्ती, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला स्पष्ट बोललो आहे, माहिती तंत्रज्ञान आणि अभ्यास काय असतं हे सगळं उलगडून आणि स्पष्ट बोललो आहे.
मुलांनो मी तुम्हाला खूप दा असे सांगितले की मानवी जीवन न उलगडणार कोडंच आहे, आपले आई बाबा आपल्याला सगळ्या गोष्टी नाहीच सांगू शकत काही गोष्टी समाज शिकवतो तर काही गोष्टी मित्र मैत्रिणी,म्हणून सगळ्यांना घेऊन चालणं आणि योग्य ते स्वीकारणं हेच आपल्याला शिकायचं आहे.
जसजसा विचार करावा तशी भीतीच वाटते भविष्याची. उदयाची, परवाची, नव्या शतकातल्या वेगवान आंधळ्या जगात पाऊल टाकलेली माझ्या वयातली आईबाबाची पिढी धास्तावलीच आहे, आपल्या मुलांच्या आयुष्यातील गणितं आपल्या पेक्षा फार वेगळी असणार हे कळतं आणि धास्ती वाटते.
मुलांनो खूप मोठं व्हायचं असेल तर अभ्यास करावाच लागतो, माझे अभिनय हा माझा अभ्यास आहे, मी उगीचच काही बोलत नाही, सगळी अनुभूती आहे अनुभव नाही कारण अनुभव ही भूतकाळ आहे त्याचे वर्तमानात काय काम म्हणून मी नेहमीच अनुभूतीतून संवाद साधला आहे तुमच्यासोबत !
आज पर्यंत ज्या मुलाने अभ्यास केला नसेल,त्यांनी आता जरी सुरुवात केली तरी खूप काही होऊ शकतं, हे विसरता कामा नये, बाळांनो, घरातलं पुरुष करता म्हणून तुम्हालाच पाठ राखण करावी लागणार आहे, जीवनात खूप अडचणी येतील, जवळचे लोकही कधीकधी समजून घेणार नाहीत,यावेळेस तुम्ही पोरांनी स्वतःला सांभाळावं अशी माझी इच्छा आहे.
मुलांनो,आपण एकमेकांचे हात धरून खूप दूरवर चालत आलो आहोत,समोर नजर टाकली तर जी वाट दिसते,ती तुमची आहे, माझ्यापासून सुट्टी होऊन तुम्ही जेव्हा तू दिशांनी निघाल, आपल्या भविष्याला शोधत शोधत पुढे जात राहाल, पण भविष्यकाळ आपला होता, तुमचा आणि माझा, हे कधीच विसरू शकणार नाही, कारण कठीण काळातील जीवनाचे जे दवबिंदू असतात, त्याचा अलवार स्पर्श काही वेगळाच असतो त्यातूनच आम्ही आठवणीचे झुंबर बांधत असतो, मुलांनो एक लक्षात ठेवा, हे जग तुमचा आहे. बस तुमचं!
– प्रा. विशेष मां.पवार