‘वनांचे श्लोक’ – वसुंधरेच्या रक्षणासाठी घोषवाक्यांची प्रेरक भेट!
पुणे, १४ जून: निसर्गप्रेम आणि पर्यावरण संवर्धनासाठी झटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक प्रेरणादायी भेट ठरलेले पुस्तक — ‘पर्यावरणविषयक घोषवाक्ये’ — नुकतेच पुण्यातील वनभवन येथे प्रकाशित करण्यात आले. सेवानिवृत्त वनाधिकारी श्री. रामदास पुजारी यांनी लिहिलेल्या या पुस्तिकेचा उद्देश स्पष्ट आहे – वसुंधरेच्या रक्षणासाठी जनजागृती आणि प्रेरणा!
“रामदास स्वामींनी जसे ‘मनाचे श्लोक’ दिले, तसेच हे ‘वनांचे श्लोक’ वाचकांना पर्यावरण जपण्याची साद घालतात,” असे स्पष्ट उद्गार डॉ. शेषराव पाटील (सेवानिवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक) यांनी काढले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्याचे मुख्य वनसंरक्षक आणि कुंडल वनप्रबोधिनीचे महासंचालक एन.आर. प्रविण होते. त्यांनी या पुस्तकातील घोषवाक्यांची सादर केलेली शैली, त्यांची परिणामकारकता आणि समाजात पोहोचण्याची क्षमता यावर विशेष भर दिला.
कार्यक्रमाला उपवनसंरक्षक पंकज कुमार गर्ग, विभागीय वनाधिकारी राम धोत्रे, माजी मुख्य वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, आणि साहित्य, वन व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
रामदास पुजारी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “पर्यावरण रक्षणासाठी वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन, आणि प्रत्येक व्यक्तीचा सक्रीय सहभाग आवश्यक आहे. घोषवाक्यांमधून लहानशा ओळींमध्ये मोठा संदेश देता येतो.”
रंगनाथ नाईकडे यांनी संत साहित्याचा संदर्भ देत सांगितले की, “ज्ञानेश्वरी, दासबोध, आणि तुकाराम महाराज यांच्याही लिखाणात निसर्ग रक्षणाची बीजे दिसून येतात.”
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेखक प्रा. विजय लोंढे यांनी केले आणि प्रकाशक विक्रम मालन शिंदे यांनी आभार प्रदर्शन केले.
📚 पुस्तकाची वैशिष्ट्ये:
- ५० हून अधिक घोषवाक्ये
- पर्यावरण, जलसंवर्धन, वनरक्षण यांसारख्या विषयांवर आधारित
- सोपी, प्रभावी आणि स्मरणात राहणारी मांडणी