मूल्यसंस्कृतीची पेरणी करणारा; अभंग सरीता

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

मूल्यसंस्कृतीची पेरणी करणारा, दर्जेदार सामाजिक अविष्काराचा अनुभव संग्रह म्हणजे…’अभंग सरीता’

यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील तरनोळी सारख्या छोट्या गावातील माझे मित्र अजय चव्हाण. सह्याद्री कवी एकसंघ यांनी माझ्या कविमित्राला “शब्दसखा” पदवीने सन्मानित केलेले आहे.’अजय चव्हाण’ यांचा “अभंग सरीता” हा अभंग संग्रह नुकताच वाचण्यात आला. त्यासाठी हा लेखनप्रपंच!

एकुण ऐंशी अभंग रचना समाविष्ट असलेल्या संग्रहाला महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून नवलेखक अनुदान प्राप्त झालेले आहे. त्यासाठी माझ्या मित्रांचे प्रथम अभिनंदन नि कौतुक!

● हे वाचा – भूक छळते तेव्हा… एक संघर्ष गाथा

मागिल काही काळात काही साहित्यिक ग्रूप मधून मी अजयचे अभंग सातत्याने वाचत आलो आहे. आशयाच्या अगदी खोलात जाऊन संस्कारांची पेरणी करणे,हे अजयच्या लेखणीचे वैशिष्ट्ये. विविध वृत्तपत्रात मासिकात अजय लिहितो. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात अजयचे काव्यवाचन झालेले आहे.

 साहित्य हा समाजाचा आरसा असतो. आदर्श समाजाला संस्कारक्षम मूल्यांची नितांत गरज असते.. किंबहुना  अभिजात साहित्यातून समाजात मूल्यांची  रूजवणूक आपसूकच होत असते. म्हणजेच अपेक्षित परिवर्तन घडत असते.ही प्रकीया सुक्ष्मपणे  चालू असते. म्हणून साहित्याला पुर्वी सुद्धा राजाश्रय होता. आजही आहेच.

आमचे कविमित्र अजय चव्हाण यांच्या अभंग लेखनात संत साहित्याचा फारच प्रभाव पडलेला दिसतो. मी यापुढे जाऊन म्हणेन की,अजयचे अभंग वाचल्यावर मला संत तुकोबा आठवले. साहित्यावर लेखकाचा “आत्मप्रभाव” पडतो हे खरेच आहे. संस्कारीत व्यक्तिमत्वाचा प्रभाव त्यांच्या लेखनीत पदोपदी जाणवतो. ‘लढायला शिक’..या अभंगात कवी म्हणतो…

 लढायास शिकl नको घाबरुस ll

आसवांना पुसl स्व हाताने ll

“आशावादाचं” जबरदस्त उदाहरण म्हणून हे चरण उद्बबोधित करता येईल. अजयच्या रचनेत सहजता आहे सोबतचं कमालीची गेयता आहे.  अभंग रचनेच्या  दुसऱ्या चरणातून कविला अपेक्षित आशयाचा सारांश एकत्रित होतो.  आशयाचा अचूकपणा सरांनी बेमालूमपणे साधला, हे मात्र नि:सशंय! ‘लक्ष्याला भेदावे’…या अभंगात कवी म्हणतो..

प्रत्येक दिवसlपरंतू नविन ll

कर्म केल्याविनlराहू नका ll

आदर्श कर्मवादाची शिकवण एक आदर्श कर्मवादीच देऊ शकतो.. संस्काराला चांगल्या कर्माचाच पाठिंबा असतो. कर्म सिद्धांत अनेक संतांनी सांगितला आहेच.. म्हणजेच कविमित्राच्या अभ्यासाला संतसाहित्याची किनार आहेच आणखी एक अभंग पाहू…याच कर्मसिद्धांतावर आहे..’मनास आवर’ यात कवी म्हणतो..

कष्टणारे हात l भिक मागणार ll

काहिच होणार l ऐसे कधीll

अजयच्या रचनेत जितकी सहजता आहे तितकीच प्रगल्भता सुद्धा आहे. कमी शब्दांत व्यापक आशय म्हणजेच अभंग… विचारांची बैठक “अभंग” असली तरच “अभंग” जन्मास येतो. ‘शुद्ध ठेव भाव’ या अभंगात कवी म्हणतो…

चांगले वाचनIप्रसन्न वदनll

ठेवणे सुमनlध्यानी ठेवll

किती सार्थ ओळी आहेत ह्या! ‘मूर्ख पुरूषांची लक्षणे संत रामदासांनी ‘दासबोधात’ सांगितली.. तर “अभंग सरीतेत”.. उत्तम पुरूषांची लक्षणे अजूने सांगितले…असे म्हणता येईल.’

छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, संत सेवालाल महाराज, गौतम बुद्ध आदी समाजसुधारकांची चरित्रे सरांनी अभंगात लिहिलेली आहेत. त्यामुळे अभंग सरीता व्यापकतेने वाहत आहे. पहिलाच प्रयत्न असुनही आमच्या कविमित्रांचे अभंग लेखन…बहूसंपन्न, अनुभवी नि प्रस्थापित वाटते. 

 हे वाचा – Karanja Lad : आमचे लाडाचे  कारंजे ….आधुनिक कारंजा महात्म्य

कविता संग्रहाला.. आमचे मित्र,नेहरू महाविद्यालय नेरचे (परसोपंत) प्रा.डॉ.प्रविण बनसोड सरांची अभ्यासू  प्रस्तावना लाभलेली आहे. आतापर्यंत उत्तम अशी पुस्तके छापण्याचा पायगुण असणाऱ्या अमरावतीच्या पायगुण प्रकाशनाच्या श्रीमती संध्याताई राजेश बहाळे यांनीअभंगसरीतेस आकार दिला आहे. उत्तम दर्जा दिलेला आहे. साहित्याची आवड असणाऱ्या प्रत्येक रसिक व्यक्तिमत्त्वास हा अभंग संग्रह निश्चितपणे आवडेल ,असा विश्वास वाटतो.

कविमित्र अजय चव्हाण सरांच्या लेखणीतून भविष्यात अनेक पुस्तके तयार होतील. त्यांचे वर्तमान गतिमान आहे, याशिवाय संस्कारीत आहे.अभंगासह त्यांनी साहित्याचे विविध प्रकार हाताळावे, यासाठी त्यांना शुभेच्छा देतोच याशिवाय  साहित्यक्षेत्रात त्यांचे नाव”अजय” राहिलं..त्यांची अभंग सरिता भविष्यातही प्रवाही राहिल…या शुभेच्छेसह थांबतो…

  • काव्यसंग्रहाचे नाव : अभंग सरिता
  • कवि : अजय चव्हाण

(तरनोळी ता..दारव्हा जि.यवतमाळ)

  • समिक्षक : रामहरी पंडित (चंद्रांशू)

कारंजा(लाड) जि.वाशिम

संवाद..९७६५०११२५१

Leave a comment