विज्ञानाला माणुसकीची झालर गरजेची.!

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

विज्ञानाला माणुसकीची झालर गरजेची.!

प्रख्यात शास्त्रज्ञ सर सी. व्ही. रमण यांच्या अभूतपूर्व शोधाला सन्मानित करण्यासाठी २८ फेब्रुवारी हा दिवस ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ म्हणून साजरा केला जातो. रमण इफेक्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रख्यात शास्त्रज्ञाच्या शोधाला १९३० मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले होते. ज्यामुळे पहिल्यांदाच एखाद्या भारतीय शास्त्रज्ञाला हा प्रतिष्ठित सन्मान मिळाला.


विज्ञान म्हणजे ज्ञानाची प्रणाली, सामान्य सत्ये किंवा मूलभूत कायद्याचे ज्ञान. विज्ञान हे एक पद्धतशीर आणि कठोर शिस्त असलेली ज्ञान शाखा आहे. विज्ञान म्हणजे विश्वातील घटना आणि घडामोडी यांचे बुद्धिनिष्ठ आणि कार्यकारणाधिष्टित असे आकलन. विज्ञान म्हणजे आपल्या शरीरात, मनात, आसमंतात, त्यापलीकडे जे काही घडते ते कसे का घडते? त्याचा अर्थ शोधणे. विज्ञान म्हणजे निरीक्षण, तर्क, अनुमान, प्रचिती आणि उपयोजन यांचा वापर करून सत्यशोधनाची वृत्ती होय.


विज्ञान हे जिज्ञासेतून विकसित होते. विज्ञानाचा पाया, प्रश्न विचारून, वाद घालून प्रयोग करून, तपासणी करून घट्ट केला जातो. विज्ञान आणि त्याच्या पद्धती सर्व प्रश्नांची उत्तरे होऊ शकतात. नवीन वैज्ञानिक ज्ञानाचा स्वीकार सरळ आहे.
मानव प्राणी हा मुळातच जिज्ञासू आहे. त्याला नवीन नवीन शोध लावण्याची आवड आहे. मानव प्राणी सुरुवातीला ज्या दशेत होता आणि आज ज्या दशेत आहे ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. माणसाने भरपूर क्रांती केली आहे. त्याला जगण्यासाठी ज्या गोष्टींची गरज आहे, त्या त्याने खूप अधिक सोप्या केल्या आहेत. माणूस आता सुख वस्तू-चैनी कडे वळला आहे. माणसाची बुद्धिमत्ता ही खूपच अफाट आहे आणि ह्याच त्याच्या अफाट बुद्धिमत्तेच्या जोरावर त्याने नवं-नवीन शोध लावून अंतराळात सुद्धा प्रवेश केला आहे. त्याने ह्याच विज्ञानाच्या सहाय्याने विविध रोगांवर मात केली आहे. त्याने भौतिक अंतर कमी केले आहे.

हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!


माणसाची कल्पनाशक्ती आणि विचार करण्याची शक्ती ह्या विज्ञानाला फारच पूरक आहेत. अगोदर मानवाने आपल्या कल्पनाशक्तीने मांडलेले विचार नंतर तर्कबुद्धीच्या भरवश्यावर त्याला दुरुस्त सुद्धा करावे लागले. काल एक कवी मनाचा माणूस तो त्याच्या कल्पनेने चंद्रावर जाऊन येत होता. एका कवीला तर तो लहान मुलांचा चांदोबा-चंदा मामा होता असे वाटते. तर एका प्रियकराला त्याच्या प्रियसीची उपमा ही “वह देखो चांद निकाल आया” असे वाटत होते. तर हा माणूस ज्याला तर्कसंगती होती त्याने हे सर्व दावे खोटे ठरवून चंद्र हा एक उपग्रह आहे आणि तो सुद्धा पृथ्वी सारखा पहाड, दगड, डोंगरांनी व दऱ्या खोऱ्यांनी बनलेला आहे असे सिद्ध केले तर निल आर्मस्ट्रॉंगने चंद्रावर पहिले पाऊल टाकले. तरी कवी मनाच्या माणसाच्या कल्पनाशक्तीत काही बदल झाला नाही. त्याचा तो चांद का मुखडाच राहिला व चांदोबा चांदोबा दमलास का हे काव्य मन तसेच राहिले.


इकडे मानवाने अंतराळात यानावर यान सोडलेत. कल्पना चावला व सुनीता विल्यम यांनी अंतराळात भेटी दिल्यात. आठ दिवसांसाठी गेलेल्या सुनीता विल्यमचा मुक्काम काही तांत्रिक कारणामुळे वाढलेले आहे. त्या नक्कीच सुखरूप पृथ्वीवर पोहचतील. ही विज्ञानाची खूप मोठी उपलब्धी आहे. मानवाची जस जशी प्रगती होत गेली, तस तशी क्रांती सुद्धा होत गेली. ह्या मानवाच्या प्रगतीच्या मार्गात त्याची भेट धर्माशी झाली. माणसासाठी धर्म की धर्मासाठी माणूस? ह्यात माणूस अजूनही गुरफटलेला आहे. ज्या ज्या तर्कविरांनी, संशोधनकर्त्यांनी आपल्या बुद्धीच्या भरवशावर शोध लावले व ते कसे खरे आहेत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला, तिथे काही ठिकाणी यांची धर्माची गाठ पडली. प्रस्थापित धर्मवीरांनी ह्या तर्कनिष्ठ मानवाला विरोध केला. त्यांना धर्म श्रेष्ठ वाटत होता. त्यांना धर्माला कोणी विरोध करू नये असे वाटत होते.


प्राचीन काळी लोकांना पृथ्वी स्थिर असल्याचे आणि सूर्य, चंद्र व तारे तिच्याभोवती फिरत असल्याचे दिसत होते. त्यामुळे त्यांनी पृथ्वीला विश्वाच्या केंद्रस्थानी मानले. १६ व्या शतकात निकोलस कोपर्निकस या खगोलशास्त्रज्ञाने हेलिओ सेंट्रिक सिद्धांत मांडला, ज्यानुसार सूर्य हा विश्वाच्या केंद्रस्थानी आहे आणि पृथ्वी व इतर ग्रह त्याच्या भोवती फिरतात. कोपर्निकसच्या सिद्धांताला सुरुवातीला विरोध झाला. परंतु गॅलिलिओने जेव्हा कोपर्निकसच्या सिद्धांताचे समर्थन केले त्याला सुद्धा विरोध झाला. मानवाने यंत्र मानव शोधले. संगणकाचा शोध लावला. संगणकामुळे तर विश्वात क्रांतीच झाली. त्याला जोडीला इंटरनेट आले. आता तर दोघांची गाडी सुसाट सुटली आहे. आता सर्वजण एकमेकांशी फक्त भौतिकरीत्या जोडल्या गेलेलो आहोत. संगणकाने अनेकांना सुरुवातीला चांगले रोजगार मिळवून दिले. आता मात्र उलटे चक्र फिरत आहे. हेच संगणक मानवाचा रोजगार खात आहेत. बेरोजगारीच्या अफाट समस्या वाढल्या आहेत.


विज्ञानाने अनेक रोगांवर मात केली आहे. मध्ये निसर्गाने एक सुसाट कोरोना नावाचा बॉलर आणला होता. त्याने सुसाट बॉलिंग केली आणि बरेच मानवाचे बळी घेतले. विज्ञान बिचारा बराच बेजार झाला होता. अधून मधून निसर्ग हा विज्ञानाची परीक्षा घेण्यासाठी असे काही प्रयोग करत असतो. आता बरेच आजार बरे झाले आहेत. तर विज्ञानाने बॉम्ब शोधला. माणसे मारली. हिरोशिमा, नागासाकी बेचिराख झालीत. अन्य युद्धात शहरेच्या शहरे बेचिराख झालीत. हे कशासाठी ? परत प्रश्न तोच अनुत्तरित राहतो. विज्ञानासाठी माणूस की माणसासाठी विज्ञान? विज्ञान शाप की वरदान? आता तर विज्ञानाने नवीन भरारी घेतली आहे. ती म्हणजे ए.आय.( कृत्रिम बुद्धिमत्ता) . आता संगणक विचार करेल आणि निर्णय घेईल. मध्ये एका सिनेमा आला होता रोबोट. रोबोट हा कालांतराने नायकाच्या नायिकेवर प्रेम करू लागतो व तो सुद्धा प्रेमात पागल होऊन ज्याच्याकडे रिमोट असतो त्याचे पण तो ऐकत नाही, तो सुद्धा माणसा सारखेच प्रेमात पागल होतो. मग त्याला सुद्धा तो आवरत नाही. थोडक्यात ए.आय. (कृत्रिम बुद्धिमत्ता) ही माणसाच्या नियंत्रणाच्या बाहेर जायला नको याची आधीच काळजी घेतलेली बरी.


आता म्हणतात ही ए.आय. (कृत्रिम बुद्धिमत्ता) मानवाला नक्कीच आव्हानात्मक राहणार आहे ह्यात काही दुमत नाही. मानवाने वेळीच खबर घेतलेली बरी, नाही तर सगळेच धातूत रूपांतर नाही झाले म्हणजे पावले. नाही तर शापाला उपशाप शोधावा लागेल. आता मानवाची मशीन लँगवेज ही प्रेमळ, सहिष्णू, मानवतावादी व कल्याणकारी असली पाहिजे. विज्ञानाची कितीही प्रगती होऊ देत, मानव मानवाचा मित्रच असला पाहिजे तो कधीही वैरी होता कामा नये.


योगायोग तर बघा फेब्रुवारी महिन्यातच १४ तारखेला ‘प्रेम दिवस’ असतो आणि २८ तारखेला ‘विज्ञान दिवस’ असतो. म्हणजे १४च्या दुप्पट २८. म्हणजेच काय विज्ञानाने मानवावर दुप्पट प्रेम केले पाहिजे. दुप्पट फुलांचा वर्षाव केला पाहिजे.
शेवटी विज्ञान म्हणजे काय निसर्ग. निसर्गाची मानवाला कालांतराने माहिती होते व त्याला आपण नंतर विज्ञान म्हणतो.
आता मानवाला गरज आहे प्रेमाच्या विज्ञानाची. शेवटी विज्ञानाला जोड ही मानवाच्या विचारशक्तीचीच असते. अपेक्षा करूया की भविष्यातील विज्ञान हे प्रेमरूपी, मंगलमय व मानवकल्याणकारी असेल. थोडक्यात काय तर विज्ञानाला माणुसकीची झालर असणे फार गरजेची आहे..!

-अरविंद मोरे,

नवीन पनवेल (पूर्व)

मो. ९४२३१२५२५१

Leave a comment