शेतकऱ्याची बैलजोडी.! 

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

 शेतकऱ्याची बैलजोडी.! 

चैत्राची गुढी उभारली होती‌.गुढीपाडवा मोठ्या आनंदानं साजरा झाला होता.आता कास्तकाराचा सण म्हणजे पिका, पाण्या अभावी साधासुधाच, म्हणजे काजयानं डोया साजरा करावा तशीच बुराट गोठ होती.पण शंकऱ्याचं मन कशातच लागत नव्हत. विषयही तसाच गंभीर होता. या बैलजोडीच्या पायी तर त्यानं लगन पाणी,मरणं,धरणं, सगेसोयरे,नातेवाईक सारंच सोडून देलं होतं.शेपाचशे रूपयाची गोठ असती तर वाली गोठ होती. पण इथे तर पन्नासक हजाराचा साजरा झटका होता. कोणता  सोयरा,धायरा ही त्याले मदत करण्या इतपत धनसेठ नव्हता. हे आलेलं अस्मानी संकट त्यालेच एकल्याले निस्तारा लागत होतं.ऐन दुष्काळात म्हणजे तेराव्या महिन्यात एवढा मोठ्ठा गड्डा भरणं मोठं जिकरीचंच होतं. बैलजोडी पाई पुरा पागल झालेल्या शंकऱ्यानं आजूबाजूच्या पंचक्रोशीतील सारी गावं खंगाळून काहाढली होती. रातची त्याची झोप मुश्किल झाली होती. त्याची जोडीही तशीच जिवापाड जपलेली होती. सरकी,ढेप,अलप,रातचे उरलेले भाकरीचे घास,कुटके,तुरीचा कनोर,घुगऱ्या,भरडा खाऊ घालून  साजरी तब्येतीनं आंगमुंग झाली होती. त्याची बैलजोडी म्हणजे निरानाम आक्कया सारखीच डकरे ना बावा,खुरानं, शिंगांनं माती उधळणारी व कामाधंदयाले  रगरग करणारी आपली दोन्ही बैलं एकाएकी अशी कुठी गायब झाली ही कल्पनाच त्याले असह्य मोठी झाली होती.एका गावच्या ज्योतीष्याजोळ जाऊन त्यानं सगूणही पाह्यला होता.पण त्याचा काही फायदा झाला नव्हता.गेल्या साली उनायात बाहेर बांधलेलं त्याच्या चुलत्याचं गाय अन् तिचं गोरं असंच गोठ्यातून रातचं गायप केलं होतं. सारा परिसर धुंडाळयावर मोठ्या मुश्किलीनं गोरं भेटलं. त्याच्या गयात बांधलेल्या टापरात चोरानं वाजू नये म्हणून शेण भरून देलं होतं.ते मुकं जनावर चोरांच्या तावडीतून सुटून सुखरूप घरी आलं पण चुलत्याचं सारं घर चालवणारी दुभती गाय मात्र शेवटपर्यंत दिसलीच नव्हती.

“कामचोर लोकं धंदा पाणी करणं जीवावर आलं म्हणजे असे अयदी नारायण चोऱ्या,चपाटया करून आपली पोटं भरतात. त्यात दुसऱ्याची कशी पंचाईत होते याचं त्याईले काही घेणं नसते‌.अशी तं अजब दुनिया झाली सायाची. फक्त माह्या आड सट्ट्यात त्यानं सापडावं, एका झोडप्यात नाही चित्ता केला तं मले दोन बापाचं म्हणजा” असं तो चिडून काही तरी बकलायचा.

  एकदिवस आपण उनायात फक्त घडीभर  चराले  सोडलेली व संध्याकाई घरी वापस येणारी  बैलजोळी यावेळी संध्याकाई घरी आलीच नाई हे म्हणजे त्याच अवघड जागचं मोठ्ठं दुखणं होतं.

“नाहक भोसळीची बला आंगावर ओढून घेतली,याले म्हणते धडया गांडीले बिबे भरणं”

असा तो मनाशी पुटपुटायचा. शंकऱ्याची भलकशी खुटी फसली होती.बैलं चाऱ्या, पाण्याच्या शोधात दूरवर पांगली असतील म्हणून पंचक्रोशीतील पुर्णा काठावरची गावं त्यानं निकाल पायी उन्हातान्हात फिरून पायाखाली घातली होती. नाचोना. लेहेगाव. खुर्माबाद. कोकरडा.  इटकी. आंतरगाव. वडाळगव्हाण. सोनखेड,भुईखेड माऊली. पेठ इतबारपूर. अशे अजून लय गावं आणी गावच्या आजूबाजूचा जंगल निकाल पायला होता .जिकडे तिकडे चौकशा सुरूच होत्या…पंधरा, तीन हफ्ते  रात्रंदिवस पायाले भवरा बांधल्या सारखा शोध सतत सुरूच होता.. एवढा की बाहेरगावी चालता फिरता अंधार पडला म्हणजे एखाद्या गावची शाळा किंवा मारोतीचं मंदिर त्याचं झोपण्याचं ठाणं झालं होतं. रातचं उपाशी,तापाशी तर कधी कोण्या गावच्या दुकानातून छटाकभर गुय,शेंगदाणे तर एखाद्या भोई बुवा जोळचे शेरभर फुटाणे खाऊन दिवस काढा लागला होता. आंगोईले व पाणी प्यायले त्या त्या गावची नदी,नाले भागवत होती.जमेल तसं एवढी कठीण परिस्थिती समोर उभी येऊन ठाकली होती. गावच्या ग्रामपंचायतीच्या ओट्यावर बसलेली माणसं,गावचा म्हाल्यापासून सारी खळणीभूत चौकशी त्यानं केली होती.

 हे वाचा – नागपूरच्या कर्तव्यदक्ष  विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी  बिदरी 

“काहो बुवा कशी होती जोडी”

असं कोणी ईचारलं तर मात्र जीवात जीव व उसनं अवसान आणून तो

“एक काया कब्रा व दुसरा धामन्या रंगाचा होता राजेहो,सांगा ना कुठली पाह्यली असीन तं”

असा ज्याले त्याले तो सांगत सुटायचा. काही चोंडके लोकं त्याची मजाकही उडवायचे पण झालेल्या तरासानं मेटाकुटीला येऊन चिडून कधी कधी तो

“आपला मतलब पुरा झाला म्हणजे गधीच्या गांडीत जाना भोसुळचेहो”

ही भावना उरी ठेवून त्याच्याशी त्याले काही घेणं देणं नव्हतं.दोन, चार दिवसांनं गावाकडेही तो किस्तकाडी करण्याच्या जबाबदारी पोटी चक्कर टाकायचा. झाकटीतच सयपाकपाणी करून  दोघं नवरा बायको मिळून वावरातले काड्या,फणं,तुरीचे धसकटं पेटोपाटो करायचे व घरी आल्यावर जेवणं खावणं करून दुपारनंतर  बैलजोडीचा शोध घ्यायचे.एक दिवस तर त्याची नसतीची मरगत्ती आली होती.वावरातल्या एका गंजाखाली लपून  ठेवलेली अंगार डब्बी व घासलेटची शिसी काढाले त्यानं गंजाखाली जसा हात घातला तसा मोठा भोरांग्यानाथ त्याच्या हातात आला.दैव बलवत्तर म्हणून तो त्या दिवशी वाचला नाही तर काही खरं नव्हतं. मागच्या वर्षी गावातलाच तरणा बांड पोरगा दिवाईले आपलं घर शेणानं सारवतांना वयनाटीत हात घातल्या बरोबर मोठा सरप चावून जाग्यावर खलास झाला होता. शंकऱ्याच्या बापानं तं याहीपेक्षा कमालच केली होती. गवताचा भारा वावरातून कापून डोक्शावर आणल्यावर हातभर मोठ्ठा सरप तोंड वर काढून लबंकत होता. स्टॅण्ड वर बसलेल्या चार,दोघांनी कल्ला हल्ला केल्यावर त्याच्या बापानं गवताचा भारा डोक्शावरून खाली फेकला होता. असं तं कास्तकाराचं जगणं असतं.जागोजागी मृत्यू दबा धरून बसलेला. तरी झालेला भयानक प्रकार पाहून बायकोनं त्याले खुळकावलंच.

“एवढं कोणतं मोठं आंगात भूत घुसलं, निरा मरालेही मांगपूढं पाऊन नाही रायले लयंच काव आणली बाई या माणसानं”

त्यानं मात्र रागावून

“धूत तीच्या यायची कटकट तं  मुकाट्यानं बस वं,उबारीचं बोंबलून रायली”

“मुकाट्यानं जिऊन गिऊन घ्या निरानाम टूणटूण नका लावू माह्या वाल्या मांग. सदानकदा निरा आंगात आल्या सारखं करणं”

तीनं त्याच्या पुढे नमतं घेतलं म्हणून होणारी कलागत वाचली होती. तसा तीले ही त्याच्या वचकवाचक स्वभावाची चांगलीच कल्पना ठावूक होती. तीनं झाडाखाली पालवातली भाकर सोडून त्याले खाले आवाज देला. दुपारचा सुर्य चांगलाच माथ्यावर आला होता.तसं त्याईनं उरलेलं घड्डीतलं पाणी झाडाचे टाकून साडीच्या फडक्यात इंधनाचा कवटा बांधबुंध करून तरंतरं घराचा रस्ता धरला. जवळजवळ एका महिन्या नंतर एकदिवस रात्री झोपताना उनायात अंगणात बाजा टाकून सातरीवर झोपतांना रात्रीचे चांदणे मोजत,बुढीचं खाटलं पायतांना न राहवून शंकऱ्यानं बैलजोडीचा विषय काहाढलाच. बैलजोडीनं त्याच्या फाटक्या संसाराला हातभार लावला होता.कोणाचे भाडे आले तर तो आवर्जून कामाले जायचा.कोणाची पऱ्हाटी पाडून द्यायचा.पेरणं, पाण्यासाठी सायळ लावायचा.चार,दोन पैसे मिठ,मीरचीसाठी हातात पडायचे. त्या पैशाच्या भरोशयावर तर त्यानं गायवाडयाच्या दोन नव्या भिती उचलल्या होत्या.त्याच्या आठवणी ऐकता ऐकताच ते सगळे झोपी गेले.. त्याचं रात्री अर्ध्या रातचा जवळजवळ दोन अडीच वाजता घराचा टपराचा दरवाजा.. खाडकन वाजला. कोणतं तरी मोहल्लयातले  मोकाटे कुत्रे,गीत्रे असतील म्हणून  त्यानं लक्ष न देता हाडहूड करत झोपीतच  पांघरूण अंगावर घेऊन तसाच झोपून रायला.पण सकाळी झाकटीतच शेणपवटा काढण्यासाठी उठल्यावर टीनाचा  दरवाजा उघडल्यावर पाहतो तर बैलजोडी दारात बसून मस्त,निवांत बागुल करतांना दिसली होती.. एखादी सोन्याची मुंदी  हारपावी व नंतर ती मोठ्या कसरतीनं सापडावी तसा तो मनातून हरीखला.मनातून लयच हरीख झालेल्या शंकरनं  तसाच बायकोने अवाज देला. बैलजोडी तीनं ताटात भाकरीचा कुटका आणुन त्याईची ओवाळून दिट काहाढली.. चारापाणी करून, घमेल्यात उंडा मांडला.ते अधाशासारखे खातांना पाहून लेकराईचे व त्या दोघांचेही डोळे पाणावले.उर भरून आला होता.तरी कोण्या तरी बदमास तोंडाच्यानं बैलांच्या नाथा,घुंगराच्या मोठ्या मन्याईच्या गळसऱ्या,मागच्या पोयाले इकत घेतलेले  पितयीचे तोळे सोडून घेतले होते.‌

“जाऊ द्या ना सिर सलामत तर पगडी हजार”

असं म्हणत त्यानं त्याच्या मनाची समजूत काढली. आंगावर आलं ते थोडक्यात निभावलं होतं.नंतर त्यानं इकडं तिकडं चौकशी केल्यावर समजलं की ते दहाबारा कोसावर कान्होलीच्या जंगलात हिरव्या चारा, पाण्याच्या शोधात बैलं दूरवर पांगले होते. त्याचेच नाही तर आजूबाजूच्या एक दोन गावातली ढोरं,वासरंही चरता,चरता अशीच गायब झाली होती…. तसाच त्यानं मायेनं त्यांच्या आंगा, खांद्यावरून हात फिरवला. बैलजोडीनंही त्याले चाटाले सुरूवात केली.दोघांचीही बऱ्याच दिवसांपासून घरमालकापासून झालेली ताटातूट पाहून दोंघाचांही अश्रुंचा बांध फुटला होता.आज शंकऱ्या नवस पावल्या सारखा मनातून खरोखर सुखावला होता.

कथालेखन – विजय जयसिंगपुरे
भ्रमणध्वनी -९८५०४४७६१९ 

Leave a comment