रोजगार भरती मेळाव्याचे यशस्वी आयोजन
कुशल देशासाठी कौशल्यविषयक विचार समाजापर्यंत पोहचविणे गरजेचे –संचालक दिगंबर दळवी
गौरव प्रकाशन
अमरावती (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील कुशल भारत घडविण्यासाठी कौशल्यविषयक विचार समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय ) व येथे प्रशिक्षण घेणारा प्रत्येक विद्यार्थी करीत आहे , असे प्रतिपादन राज्याचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी यांनी आज केले.
नांदगाव खंडेश्वर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये रोजगार भरती महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते , त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. दळवी बोलत होते. यावेळी विद्यार्थी , पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते .
मेळाव्याचे उद्घाटन प्रसंगी खासदार रामदास तडस, आमदार प्रताप अडसड, शिक्षक आमदार किरणकुमार सरनाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच अमरावती विभागाचे सहसंचालक प्रदीप घुले, मुंबई प्रकल्प समन्वयक राजेंद्र येते, सहायक संचालक रवींद्र लोखंडे, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी डॉ. शेळके, कौशल्य विकास उपायुक्त दत्तात्रय ठाकरे, श्रीमती प्रांजली बायस्कर, नांदगाव खंडेश्वर आय.टी.आय.चे प्राचार्य एन. ए. भुकवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना दिगंबर दळवी म्हणाले की, कोणतीही शासकीय संस्था ही नागरिकांना मदत करण्यासाठी कटिबद्ध असते. आय.टी.आय. मधील संसाधनांचा उपयोग गावातील नागरिकही करू शकतात. या विभागाने कौशल्य विकासाचा प्रचार व प्रसारासाठी अनेक लोकाभिमुख कार्यक्रम राबविले असून सद्यस्थितीत ‘मिशन शंभर’ हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबवित आहे. यामध्ये आय.टी.आय. च्या विद्यार्थ्यांना पिण्यासाठी वॉटर कुलर, डिजिटल हॉल, स्वछतागृहे, परकीय भाषांचे प्रशिक्षण, सुंदर व पर्यावरण संतुलित परिसर, ओपन जिम, अभ्यासिका असे अनेक विद्यार्थीपयोगी सुसज्ज उपक्रम राज्यातील आय.टी.आय. मध्ये सुरु आहे. याचा फायदा निश्चितच विद्यार्थ्यांना होईल , असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.