जिल्हाधिकारी यांची धामणगाव रेल्वे तालुक्याला भेट
गौरव प्रकाशन
अमरावती (प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी नुकतीच धामणगाव रेल्वे तालुक्याला भेट दिली. या भेटी दरम्यान आदर्श महाविद्यालय धामणगाव येथे नव मतदार नोंदणी व युवा संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांना मतदार नोंदणी, मतदान करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले.
आदर्श महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्यांनी स्पर्धा परीक्षा तसेच भविष्यकालीन रोजगाराच्या संधीबाबत मार्गदर्शन केले. नगरपरिषद धामणगाव अंतर्गत राष्ट्रीय शहरी आजीविका मिशन (एनयूएलएम) योजनेनुसार कार्यान्वित बचत गटाद्वारे संचलित रेशीम शेती केंद्रालाही भेट दिली. श्री. कटियार यांनी या बचतगटाच्या सदस्यांना त्यांच्या कार्याविषयी प्रोत्साहन दिले. आयुषमान भारत कार्ड वाटप, मतदान नोंदणी, पुरवठा विभागाच्या थेट लाभ (डीबीटी) योजनेसाठी उपस्थित विविध कंपन्यांना भेट देवून मार्गदर्शन केले.
त्यानंतर सामाजिक वनीकरण विभागामार्फत आयोजित केलेल्या वन्य जीव सप्ताहाच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धामध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना श्री. कटियार यांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले. नगरपरिषद धामणगाव व तहसील कार्यालय धामणगाव येथील सर्व विभाग प्रमुख तसेच अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. धामणगाव येथील रास्त भाव धान्य दुकानांची श्री. कटियार यांनी तपासणी केली. धान्य सुरळीतपणे व योग्यरित्या वाटप करण्याच्या सूचना दिल्या. कौशल्य विकास विभागाद्वारे आयोजित स्व. प्रमोद महाजन ग्रामीण विकास केंद्राच्या ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आलेल्या उद्घाटन सोहळ्याला, औद्यागिक प्रशिक्षण संस्था जुना धामणगाव येथे उपस्थित राहून जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी मार्गदर्शन केले.