पारदर्शक प्रशासनासाठी माहिती अधिकार कायदा महत्त्वपूर्ण– राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे
गौरव प्रकाशन
अमरावती (प्रतिनिधी) : माहितीचा अधिकार कायद्यामुळे प्रशासनात पारदर्शकता व विश्वासार्ह वातावरण निर्मितीस मदत होत आहे. प्रशासनाला त्यांच्या कारभारात अधिक उत्तरदायी बनविण्यासाठी आणि प्रशासकीय यंत्रणांवर सनियंत्रण आणि देखरेख ठेवण्यासाठी हा कायदा नागरिकांना अधिक सक्षम बनवितो, असे प्रतिपादन राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी आज येथे केले.
राज्य माहिती आयोग व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने माहितीचा अधिकार अधिनियम कायद्याची व्यापक जनजागृती होण्यासाठी माहिती अधिकार सप्ताहांतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन येथे करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी सौरभ कटियार, मनपा आयुक्त देवीदास पवार, पोलीस अधीक्षक अविनाश बारगड, राज्य माहिती आयोगाचे उपसचिव देविसिंग डाबेराव, माहिती अधिकार कायद्याचे राष्ट्रीय प्रशिक्षक राजेंद्र पांडे तसेच जनमाहिती अधिकारी, अपीलीय अधिकारी आदी उपस्थित होते.