![](https://www.gauravprakashan.com/wp-content/uploads/2023/10/DSC_8760.jpg)
रुग्णांना तात्काळ उपचारसेवा पुरविण्यासाठी आरोग्य यंत्रणेने सतर्क रहावे -डॉ. निधी पाण्डेय
अमरावती, : रुग्णालयात दाखल होणाऱ्या प्रत्येकाला तात्काळ उपचार सुविधा उपलब्ध होण्यासाठी चोवीस तास सतर्क राहून आवश्यक वैद्यकीय सेवा-सुविधा, औषधी व उपकरणांची तजवीज करुन ठेवावी. औषधे व उपचाराअभावी कोणालाही जीवाला मुकावे लागणार नाही, यासाठी आरोग्य यंत्रणेने जबाबदारीपूर्वक काम करावे. आरोग्य सेवा-सुविधांबाबत नियमितता राहण्यासाठी संबंधित जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नगरपालिका प्रशासन आदींनी आरोग्य केंद्र, रुग्णालयांना दररोज प्रत्यक्षरित्या भेट द्यावी. तेथील आरोग्य सेवासुविधांचा, अनुषंगिक बाबींचा आढावा घेऊन त्यासंबंधीचा अनुपालन अहवाल सादर करावा, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज येथे दिले.
राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीला विभागीय आयुक्त डॉ. पाण्डेय दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होत्या. त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत विभागीय आयुक्तांनी अमरावती विभागाचा आरोग्य व्यवस्थेसंबंधीचा आढावा दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून घेतला. अमरावती विभागांतर्गत येणाऱ्या पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त देविदास पवार, आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा आरोग्य अधिकारी, नगरपालिका प्रशासनाचे अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.