पारधी समाजासाठी वैयक्तिक लाभाच्या योजना
अमरावती, : प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, धारणी कार्यक्षेत्रांतर्गत पारधी विकास कार्यक्रमातील मंजूर योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकडून योजनेचे अर्ज मागविण्यात येत आहेत. वैयक्तिक लाभाच्या योजनांचे अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, धारणी जि. अमरावती, उपकार्यालय, मोर्शी, अपर आयुक्त, आदिवासी विकास, अमरावती यांचे कार्यालय, अमरावती तसेच शासकीय आश्रमशाळा गुल्लरघाट ता. दर्यापूर येथे विहित नमुन्यात उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी या कार्यालयाचे दुरध्वनी क्र. 07226-224217 या क्रमांकावर संपर्क साधावा. अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत दि. 18 जुलै 2023 आहे. याची संबंधितांनी नोंद घ्यावी. योजनेचा अर्ज भरतांना आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची माहिती अर्जाच्या नमुन्यावर नोंदविण्यात आली आहे.
वैयक्तिक लाभाच्या योजना
पारधी विकास कार्यक्रमांतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनांचा समावेश आहे. यामध्ये पारधी समाजाच्या लाभार्थ्यांना शेळी गट खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य देणे, बचत गटांना तेलघाणा सुरू करण्यासाठी अर्थसहाय्य देणे, बचत गटांना ट्रॅक्टर खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य देणे, लाभार्थ्यांना ऑटो रिक्षा पुरविणे, लाभार्थ्यांना कॉम्प्युटर व झेरॉक्स मशीन पुरविणे, दिव्यांग बांधवांना ई-ट्राय सायकल पुरविणे, युवक-युवतींना स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन करणे या योजनांचा समावेश आहे.
वरील योजनेसाठी शासन निर्णयानुसार प्राप्त झालेल्या अर्जाच्या जेष्ठतेनुसार संगणकीकृत यादी तयार करण्यात येईल. त्यानंतर कागदपत्रे तपासणी करून पात्र/अपात्र अर्जदाराच्या स्वतंत्र याद्या तयार करण्यात येईल. लाभार्थी निवड करताना प्रथम दारिद्रय रेषेखालील लाभार्थी, अपंग, वीरपत्नी, परितक्ता, निराधार, महिला यांना प्राधान्याने योजनेचा लाभ देण्यात येईल, असे आवाहन धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी सावन कुमार यांनी केले आहे.