अमरावती : विभागीय संदर्भ सेवा रूग्णालय येथे अमरावतीसह यवतमाळ, अकोला, वाशीम आणि बुलढाणा या जिल्ह्यातून रूग्ण उपचारासाठी येतात. रूग्णांना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेंतर्गत उपचाराचा मोफत लाभ दिला जातो. त्याअंतर्गत बालकांवरील शस्त्रक्रिया मुत्रपिंड, लघवी संबंधीत आजार, किडनी प्रत्यारोपण, प्लास्टिक सर्जरी, हृदयरोग शस्त्रक्रिया, मेंदूसंबंधीत आजार, उच्चरक्तदाब, मधुमेह इत्यादी आजाराची तपासणी, निदान करुन शस्त्रक्रिया तसेच उपचार करण्यात येतात.
चुकीची जीवनशैली तसेच वाढत्या ताणतणावामुळे कर्करोग झपाट्याने वाढत आहे. याचे गांभीर्य लक्षात घेऊन वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे यांनी कर्करोग शस्त्रक्रिया येथे सुरू व्हावी, यासाठी प्रयत्न केले व त्यास यश आले. कर्करोग विभाग नियोजनासाठी विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश मेंढे तसेच सर्व निवासी वैद्यकीय अधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले.
कर्करोग विभाग सुरू झाल्यापासून 44 कर्करोग शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्या आहेत. कर्करोग तज्ज्ञ डॉ. रणजित मांडवे, डॉ. अनुप झाडे, डॉ. भावना सोनटक्के, डॉ. अमित बागडिया तसेच सर्व सहायक वैद्यकीय अधिकारी, सहायक वार्ड कर्मचारी यांच्या परिश्रमाने या कर्करोग शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या. कर्करोग आजाराची वेळीच तपासणी, निदान, उपचार करावे. जिल्ह्यातून संशयित रूग्ण संदर्भित करण्याचे आवाहन डॉ. नरोटे यांनी केले आहे.