- बडनेरा येथील रेल्वे वॅगन प्रकल्पाची कामे विहित मुदतीत पूर्ण करा
– खासदार डॉ.अनिल बोंडे यांचे निर्देश
– रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक
अमरावती : बडनेरा येथील रेल्वे वॅगन प्रकल्पाची कामे विहित मुदतीत पूर्ण करा, असे निर्देश खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना आज दिले.
बडनेरा येथील रेल्वे वॅगन प्रकल्पाच्या विविध कामकाजाचा आढावा घेत प्रत्यक्ष कामाची पाहणी खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी आज, सोमवारी केली. रेल्वे वॅगन प्रकल्पाद्वारे महिन्याकाठी 180 वॅगन निर्मितीचे लक्ष आहे. मात्र काही कारणामुळे सदर लक्ष्यांक गाठण्यासाठी अडचणी येत असल्याचे निदर्शनास आल्याने खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून आज रेल्वे वॅगन प्रकल्पाच्या सभागृहात आढावा बैठक घेतली.
या बैठकीदरम्यान येथे निर्माण होणाऱ्या विविध समस्या त्यांनी अधिकाऱ्यांकडून जाणून घेतल्या. प्रकल्पाचे काम युद्ध पातळीवर पूर्णत्वास जावे यासाठी रोड मॅप तयार करण्याच्या सूचना देखील त्यांनी रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना केल्या. मे महिन्यापर्यंत रेल्वे वॅगन प्रकल्पाची कामे पूर्ण व्हावी. तसेच प्रकल्पाशी संबंधित अधिकारी व रेल्वे मंत्रालय यांच्यामध्ये योग्य समन्वय ठेवून काम करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, राज्यमंत्री रावसाहेब दानवे आदींसोबत बैठक घेऊन येथील समस्या सोडविण्यात येईल, अशा सूचना सुद्धा खासदार डॉ.अनिल बोंडे यांनी बैठकीदरम्यान केल्या. आढावा बैठक संपल्यावर डॉ. अनिल बोंडे यांनी रेल्वे वॅगन प्रकल्पाच्या संपूर्ण कामकाजाची पाहणी केली. काम कशा पद्धतीने सुरू आहे याचा आढावा देखील त्यांनी परिसरात फेरफटका मारून कर्मचाऱ्यांकडून घेतला.