जातीव्यवस्थेने घडवुन आणलेला रक्तपात म्हणजे खैरलांजी- भाई जयदिप कवाडे
पीपल्स रिपब्लिकन पार्टी तर्फे भोतमांगे परिवारास आदरांजली
गौरव प्रकाशन
नागपूर ( प्रतिनिधी ) : महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशाला हादरवून सोडणारे हत्याकांड भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील खैरलांजी या गावात घडले होते. मानवतेला काळिमा फासणाऱ्या या हत्याकांडात भैयालाल भोतमांगे यांची पत्नी सुरेखा भोतमांगे, मुलगी प्रियंका भोतमांगे, मुलगा रोशन भोतमांगे आणि सुधीर भोतमांगे अशा चौघांचा जातीव्यवस्थेने घेतलेला बळी होता. पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रात जातीव्यवस्थेने घडवुन आणलेला रक्तपात म्हणजे खैरलांजी, असे प्रतिपादन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भाई जयदीप कवाडे यांनी केले आहे. खैरलांजी हत्याकांडाच्या १७ व्या स्मृतीदिनानिमित्त पीपल्स रिपब्लिकन पार्टी आदरांजली वाहण्यात आली. या अभिवादन सभेत जयदीप कवाडे हे बोलत होते. तत्पूर्वी संविधान चौक येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाला लाॅंग मार्च प्रणेते व पीरिपाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे सर तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे यांच्या हस्ते पुतळयाला माल्यापर्ण करण्यात आले. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे युवक महाराष्ट्र प्रदेश संघटक मृणाल गोस्वामी यांनी दिली.
पुढे बोलतांना भाई जयदीप कवाडे म्हणाले की, मानवाने मानवतेवर केलेला आघात म्हणजे खैरलांजी हत्याकांड होता. ही घटना महाराष्ट्राच्या पुरोगामित्वावरही एक काळा डाग ठरली होती. खैरलांजी गावातील एका दलित कुटुंबातील सामूहिक हत्याकांडाने संपूर्ण देश ढवळून निघाला होता. खैरलांजी हत्याकांडात एकमेव जिवंत असलेल्या भैयालाल भोतमांगे यांचेही 20 जानेवारी 2017 रोजी हृदयविकाराने निधन झाले. भैयालाल हे शेवटच्या क्षणापर्यंत न्यायासाठी समाजाला सोबत घेऊन संघर्ष करीत होते. परंतु त्यांना न्याय मिळाला नसल्याचीही खंत भाई जयदीप कवाडे यांनी व्यक्त केली. अभिवादन सभेत नागपूर शहर अध्यक्ष कैलाश बोम्बले, प्रदेश संघटक कपिल लिंगायत, युवक प्रदेश संघटक मृणाल गोस्वामी, भीमराव कळमकर, स्वप्निल महल्ले, ऍड. राजेश बाराहाते, प्रभाकर बागड़े, हिमांशु मेंढे, मोरश्वर दुपारे, इंजीनियर अजय वासनिक, दिलीप पाटिल, अभिषेक गणवीर, रविराज शाहू, धीरज मेश्राम, सुहास तिरपुडे, अजय चव्हाण कुशीनारा शामकुंवर आदिंची उपस्थिती होती. यावेळी उपस्थितीतांनी भोतमांगे परिवाराला आदरांजली वाहली.