शक्ती, भक्ती आणि मुक्तीचा कानमंत्र…. नवरात्रोत्सव
माझ्या मैत्रिणीच्या घरातला हा संवाद कानावर पडला आणि सर्वच भगिनींना एक कानमंत्र द्यावा या उद्देशाने हा लेखन प्रपंच मांडला.
“हे बघ सुनबाई, आज शेवटचा दिवस आहे. साफसफाई सगळी व्हायलाच पाहिजे. उद्या देव(घट) बसतील. एकही भांडंकुंडं आणि घराचा कानाकोपरा अस्वच्छ राहता कामा नये.”
“आई, ऐका ना! काही थोडं राहिलं असेल तर, मी सुट्टी बघून नक्की करेन.”
“अगं, कधी करणार? उद्या सणाचा दिवस. पोळ्या करणार की स्वच्छता करत बसणार.”
“अहो, पण आई, माझं ऑनलाईन वर्किंग सुरू आहे ना. तुम्ही पाहतच आहातच, मला जेवायला देखील वेळ मिळत नाही. तरी त्यातूनही तुमच्या बरोबरीने मी सारं काही आवरत आणलंच आहे ना! वरची एक अडगळीची खोली राहिली आहे, एवढंच ना! घेईन की मी, तुम्ही नका काळजी करू.”
“कसल्या ग पोरी तुम्ही? तुम्हाला जराही सणासुदीचं काही महत्त्वच वाटत नाही. थोरली तर गावाकडे यायचं नावच घेत नाहीत. तिला तरी सणाचं काय करायचं असतं, हे पण माहिती नसेल. तू ही अशी.. मला वाटतं माझ्या माघारी तुम्ही सण करता की नाही कोणास ठाऊक.” सुधामावशीची बोलण्यातील तळमळ आणि रितीरिवाज जपण्याची धडपड वाखाणण्यासारखी होती. सत्तरी पार केली तरी तितक्याच तत्परतेने आणि चिवटपणे तीची सारी कामं सुरू होती.
“अहो आई, थोरल्या ताई पोलीस खात्यात आहेत. प्रत्येक सणांमध्ये त्यांना जास्तीची ड्युटी असते, हे तुम्हाला माहीत नाही का? त्या कशा येतील सणाला… आपणच समजून घ्यायला नको का! आणि मी असतेच की इथे. सगळं काही करू लागतेच ना” वेदिकाची नकळत होणारी कुचंबणा तिच्या बोलण्यातून जाणवत होती.
“समजतं बरं का मला, एकमेकीची बाजू घेऊन एकमेकीना पाठीशी घालता ते! जाऊ दे..सगळे एका माळेचे मणी. राहू देत, तू तुझ्या परीने बघ, ती तिच्या पद्धतीने बघेल! माझे हात पाय चालतात तोपर्यंत मीच करत जाईन. परमेश्वरा, माफ कर रे बाबा, माझ्या लेकी सुनांना.. काळ बदललाय तशी तुझी उपासना देखील बदलत चाललीय. घे आता मानून देवा….” सुधामावशीने रागाने केलेली बडबड नकळत माझ्या कानी पडली. जेव्हा मी वेदिकाला बोलवायला तिच्या घरी गेले होते. मला पाहताच भरल्या डोळ्यांनी वेदिका माझ्याकडे आली, तर सुधा मावशीने पटकन माझ्या हातात पाण्याचा तांब्या दिला.
“मावशी झाली की नाही, घटस्थापनेची तयारी.” या माझ्या प्रश्नाकडे मावशींनी फारसे लक्षच दिले नाही. आपण केलेली बडबड कदाचित हिने ऐकली आहे. याचा सुधामावशींना अंदाज आला. त्यामुळे त्या थोड्याशा वरमल्या देखील. परंतु ईकडच्या तिकडच्या गप्पा काढत मीच मावशींना बरोबर विषयावर आणल.
“हे बघ मावशी, वेदिका माझी खास मैत्रीण. तुमची दोन नंबरची सून, खरंतर ती सुनबाई होण्याअगोदरच एक क्लासवन ऑफिसर आहे. तिच्या ड्युटीला, ना काळ ना वेळ…. वारंवार सुट्टी घेणं तर सोडच, रेग्युलर सुट्टीत देखील तिला व्यवस्थित विश्रांती घेता येत नाही. सणासुदीचे महत्व तिलाही आहे. आपल्या घराण्याच्या रितीरिवाजा प्रमाणे चालत आलेल्या सर्व चालीरीती सांभाळाव्यात, हे तिलाही वाटतं. पण कामाच्या व्यापात, सार काही करणं तिला कसं शक्य होईल? आणि हो ..मावशी तुझी थोरली सून पोलीस खात्यामध्ये ड्युटी करते. तीही चांगल्या पोस्टवर आहे. प्रत्येक सणासुदीला सुट्टी काढून येणे मनात असलं तरी ते कसं शक्य आहे? दोघी सूना वेळेत सणादिवशी कामी येत नाही याचा तुला राग येतो आहे, होय ना? परंतु अगदी प्रामाणिकपणे, निष्ठेने आपली ड्युटी करतात. सेवा बजावतात. ही पण एक प्रकारची भक्तीच आहे ना! कामातच राम असतो असं तूच तर म्हणतेस. बरं ह्या तुझ्या सूना आहेत. म्हणूनच कदाचित राग येणे साहजिकच आहे. परंतु लेक तर तुझी किती वर्षानंतर आलीय. तिच्यावरही तू चिडतेस! त्याचं कारण तरी समजेल का?” या माझ्या प्रश्नाची बहुतेक मावशी वाटच पाहत असेल. माझं बोलणं संपते न संपते तोच अगदी तत्परतेने मावशी म्हणाली,
“काय सांगायचं बाई तुला, ती तर येताना बरोबर विटाळ घेऊनच आली बघ. जरा चार दिवस राहायचं म्हटल्यानंतर, गोळ्या खायच्या.. हे काय मी सांगायला हवं का?”
अरे बापरे, हे कारण होतं तर! दोन सुनांच्या दोन अडचणी. अनेक वर्षातून लेक आली, तर तिची ती अडचण. मावशीची चिडचिड होणं मावशीच्या दृष्टीने साहजिकच होते.
वेदिकाच्या घरातील संवाद ऐकला आणि क्षणभर मी विचारमग्न झाले. खरंच सगळे सणवार, उपास तापास, चालीरीती स्त्रीभोवतीस का गुंडाळले असतील? प्रत्येक सणाचं काही ना काही महत्त्व असतं? चालत आलेल्या रूढी परंपरा याचही काही महत्त्व असतं? त्या चालीरीती का रुळत आल्या? परंपरेने चालत आलेल्या पद्धती आणि आत्ताची वास्तव परिस्थिती याचा का नाही आपण विचार करत?
या संबंधित विचार करता करता आणि मावशी बरोबर बोलता बोलता हा लेखन प्रपंच घडून गेला.
खरंतर हिंदू धर्मातील सण समारंभ असो अथवा इतर धर्मातील सण समारंभ असो, अनेक वर्षापासून आणि काळापासून ते चालत आलेले आहेत. आपल्या प्रत्येक सणांमध्ये आपल्याला निसर्गाशी सौख्य राखण्याचा आणि निसर्गाबरोबर राहण्याचा सल्ला नकळत सण समारंभाच्या रूढी परंपरेतून मिळतो. नातेसंबंध जपण्याचा, भाऊबंदकी आणि सगे सोयरे, शेजारी यांच्याशी सलोख्याने राहण्याचा सल्लाच जणू समारंभाच्या पद्धतीतून मिळत असतो.
आता हेच पहा ना आपण घटस्थापना करतो. अर्थातच देवाच्या समोर ज्या काही धान्याची पेरणी करतो त्यामुळे जुन्या काळामध्ये शेतकऱ्यांना पीकपाण्याचा अंदाज लावता येत होता. देवाच्या उपासनेतून आणि होणाऱ्या उपवासातून एक प्रकारचं मनाला स्थिरत्व प्राप्त होतं. घटस्थापनेच्या अगोदर घरातील प्रत्येक वस्तूची आणि घराच्या कानाकोपऱ्याची व्यवस्थित साफसफाई करून घेतो. घटस्थापनेच्या निमित्ताने घराची साफसफाई तर होतेच शिवाय घरातील अनावश्यक वस्तूची देखील विल्हेवाट लागते. वर्षभर पोटाच्या मागे धावणारा माणूस दसऱ्याच्या निमित्ताने दररोज वापरत असणाऱ्या हत्यार, अवजारांची योग्य देखभाल करुन त्याचं पूजन करतो. दसऱ्याच्या निमित्ताने नऊ दिवसाचा उपवास बरेच जण करतात. भक्तीभावाने केलेल्या पूजेतून एक प्रकारची मन: शांती मिळते, मानसिक समाधान मिळतं.
हे सारं जरी खरं असलं तरी एक लक्षात घ्यायला हवं की, आपल्या परंपरा, सण, उत्सव त्या त्या काळानुसार चालत आलेले आहेत. वास्तव परिस्थितीनुसार त्यामध्ये थोडाफार बदल झाला तरी फार मोठे नुकसान होतं असं काही नाही. आता हेच पहा ना पूर्वीपेक्षा आजच्या माणसाला स्वच्छतेचे महत्व समजलेलं आहे. पूर्वीसारखी वर्षातून एकदाच घराची सफाई होते असं काही नाही. प्रत्येक घरामध्ये वारंवार स्वच्छता सुरू असते. नेहमीच आपण घरातील साफसफाई, मोठ्या कपड्यांची धुलाई अधून मधून करीत असतो. मग वेळेची कमतरता असल्यास फार मोठा अट्टहास का करून घ्यावा? ठीक आहे ना, देवघर, किचन याची अगदी जाणीवपूर्वक साफसफाई करून घटस्थापना करुया. दीर्घ सुट्टी मध्ये आणि आपल्या वेळेनुसार राहिलेली सफाई नक्कीच आपण करून घेऊ शकतो. त्यासाठी तारेवरची कसरत करून जीवाचा आटापिटा का करून घ्यायचा?
स्त्री ही धनाची पेटी मानतात. गृहलक्ष्मी आहे, संतान देवता आहे, काली माता आहे अशा अनेक विविध रूपात स्त्रीकडे पाहिले जाते. स्त्रीला स्त्रीत्व कधी पूर्ण होईल जर तिला एमसी येत असेल तर… तरच तिला अगदी आपल्या पुरातन काळापासून देवा धर्मात सुद्धा महत्त्व आहे. ती आई होण्यास पात्र आहे. शिवाय ती एक नैसर्गिक क्रिया आहे. जसं की डोळ्याची उघडझाप, नाकाने घेतला जाणारा श्वास व उच्छवास या क्रिया जशा आपोआप घडत असतात शिवाय त्या शरीरासाठी आवश्यक असतात त्याप्रमाणे स्त्रीला महिन्याच्या महिन्याला येणारी एमसी हा फार मोठा प्रॉब्लेम नसून स्त्रीत्वाचं अविभाज्य अंग आहे. या नैसर्गिक क्रियेचा नैसर्गिक पद्धतीने आणि सहजतेने स्वीकार व्हावा. मान्य आहे तुम्हाला धार्मिक विधी मध्ये याची ढवळाढवळ नको असेल. ठीक आहे मात्र गोळ्या घेऊन किंवा त्याला प्रतिबंध करून शरीरावर नाहक विपरीत परिणाम का करून घ्यायचे? सण आयुष्यात एकदाच येणार असतो का? नाही ना मग प्रतिबंधक उपाय करून त्याचे साईड इफेक्ट्स का ओढून घ्यायचे?
पूर्वीची शारीरिक, मानसिक दृढता निराळी होती. अन्नधान्य सकस होतं. माणूस स्थिर होता. चिंतन मनन अभेद्य होतं. त्या मानाने आज स्त्री असो अथवा पुरुष असो दोघांचेही घड्याळाच्या काट्याप्रमाणे जीवन धावते झाले आहे. घर प्रपंच बघत, मुलांची देखभाल करत, पै पाहुणे सांभाळत, नोकरी करणारी स्त्री तितकीशी चालीरीती, परंपरा पार पाडताना स्वतःला वेळ देऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे. असं असताना नाहक अट्टाहास करून स्वतःची घालमेल का करून घ्यावी. जमेल तेवढं केलं म्हणून परमेश्वर तुम्हाला फार मोठी शिक्षा करणार आहे असं थोडंच आहे!
संत मंडळी परमार्थ सांगतात, मानतात. मात्र कोणत्याही कर्माचं कर्मकांड होऊ देत नाहीत. उलट “दोन हात एक मस्त” हा भक्तीचा मार्ग ते सांगतात. म्हणूनच मी तर म्हणेन, सण, समारंभ आपण आपल्या समाधानासाठी, घरातील सुख, शांतीसाठी आणि नातेसंबंध, समाज संबंध घट्ट करण्यासाठी निर्माण केले आहेत. सगळे नियम, सगळी बंधनं, सगळ्या प्रथा आपण आपल्यासाठी निर्माण केलेल्या आहेत. त्यामुळे आपलं स्वास्थ्य, समाधान सांभाळून सर्व काही केलेलं सर्वात उत्तम. प्रत्येक सणाचा तितक्या सहजतेने आपण लाभ घ्यावा. त्यातून आनंद घ्यावा. एकमेकावर नाहक बंधन घालण्यापेक्षा एकमेकांना समजून घेऊन वास्तव परिस्थितीतून आनंद लुटण्याचा प्रयत्न करावा आणि नवी परंपरा निर्माण करावी, हेच खरे उत्सव.
-सौ आरती अनिल लाटणे
इचलकरंजी