परिश्रमाचे आणि संकटाचे कडवे चित्र : शेतकऱ्याची बैलजोडी
चैत्रातलं उन्ह साजरंच कयकत होतं.उन्हानं रस्त्यावरचा फफुळ्ळा चांगलाच गरम झाला होता. झाडाझुडपाचा पालापाचोळा साऱ्या रस्त्यावर पसरला होता. कास्तकाराचा वावारातला दायदाना सुखरूप घरी आला होता.ज्याले लयच गरज होती त्यानं तालुक्यातील धान्य बाजारात मिळेल त्या भावात आपला शेतमाल इकटाक केला होता.शंकऱ्यानं डोक्शाले मयकट टावेलचं फडकं गुंडाळून गावाशेजारीच घरामांग असलेल्या आखरात निंबाच्या झाडाखाली सावलीत बांधलेल्या बैलाईले कडब्याची पेंडी टाकून तरंतरं घरी आला. उभ्या उभ्याच त्यानं न्हाणीत जाऊन नांदीतलं तमरेटानं थंड पाणी आंगावर घेतलं.खापरानं आंग घासून,टावेलानं साजरं निपक आंग पुसलं. तोपर्यंत त्याच्या बायकोनं गरम भाकर व ताकातलं तिखटवखट चून तयार केलं होतंच.हातापायाले खोबरेल तेलाचा हात लावून कनोडयातल्या वर भिंतीच्या खोबनीत फसवलेल्या फुटलेल्या आरशात पाहून केसातून दोन, चार दातं शिल्लक राहिलेला कंगवा फिरवला व तो सपरीत आल्याचं पाहून बायकोनं त्याले ताट वाढलं.हातात इवा घेऊन कांदा कापला.हिरवीगार कैरी चिरून त्यावर तिखट, हयदमीठ शिपडलं. राजनातलं थंडगार पाण्यानं भरलेला गडवा भरून आणला. चुलीवरच्या आरावर ताटलीत दोन,तीन पापड भाजून समोर ठेवले. जेवणं आटोपल्यावर शंकऱ्यानं गावाजोळचं उन्हामुळं निंबाच्या सावलीत बकऱ्यावाला बसवत असलेल्या बकऱ्याईजोळ जाऊन त्यानं त्याच्या घरच्या बकरीचे लहान लहान तान्हे पीलं पाजून आणले.बिच्यारे लहान पिल्ले भुकेनं तेही व्याकूळ झाले होते. दोन्ही पिलं पाजल्यावर हातात घेऊन छातीशी कवटाळून तो घरी आला.लहान,लहान पिल्ले डालपाटीच्या आत त्यानं सुरक्षित ठेवले व हातापायावर थंड पाणी घेऊन मस्त शेणानं सारवलेल्या थंडगार सपरीत सातरी आथरून थोडासा घढीभर ढुयका घेतला.
दुपार टळून गेली होती. दिवस कलणीला लागला होता. दुपारचे चार वाजले होते.तसी त्यानं शेणखतानं भरून ठेवलेली बैलबंडी बैलांच्या खांद्यावर देऊन वावाराकडे चालता झाला.परत येतांना त्याले चांगलीच झाकट पडली होती.येतांना बैलबंडीत गोंधनच्या झाडाची वायलेली लाकडं संध्याकायच्या सयपाकपाण्यासाठी भरली.घरी आल्यावर चारापाणी झाल्यावर हातपाय धुवून कंदिलाच्या उजेडात भाकर खाल्ली.
● हे वाचा –Dr Sujay Patil : डाॅ सुजय पाटील, अकोला मानसोपचार तज्ञ शेतक-याचा खरा मित्र
दुसऱ्या दिवशी झाकटीतच शंकऱ्यानं ढोरावासराईचा शेणपवटा काढला होता.बैलाईले पाणी पाजून धुरटन अडसून बंडीच्या चाकात वंगणाचा बोया कोंबला होता. बंडीत तडव आथरून तुरीचे दोन, तीन पोते तालुक्याच्या कृषी उत्पन्न बाजारात न्यायचे रातीच ठरवलं होतं.बायकोनं सोबत शिदोरी बांधून देली होतीच.लवकर पोहचण्यासाठी अरामानं गतीगती बैलांना धाक धाकवत कधी चुचकारत त्यानं डांबरी रस्त्यानं तालुक्याचं शहर जवळ केलं. सुर्य माथ्यावर आला होता. उन्हानं आंगाची चांगलीच लाहीलाही होत होती.डांबरी रस्त्यावर चालून चालून बैलांच्या तोंडाले फेस आला होता.शेवटी मूळ ठिकाणी आल्यावर त्यानं खांदची बैलगाडी काढून जवळच्या पाण्याच्या हौदावर तहानलेली बैलं पाजून चारापाणी टाकलं व सावलीत बैलांना बांधून ठेवलं. बारानंतर एकदाचा धान्य बाजार सुरू झाला.अडते मापारी हजर झाले.शंकऱ्या उन्हातान्हात डोक्शावर दुप्पटं घेऊन मुकाट्यानं आपल्या तुरीच्या शेतमालाजोळ उभा होता.
अडत्यानं पोत्यात बंबा टोचला तशी मोठी धार लागून आंजूयीभर तुरी अडत्यानं हातात घेऊन भाव ठरवण्यासाठी वरखाली फेकल्या. शंकऱ्याचा मात्र तटतटा जीव तुटत होता.ओंजळभर तुरी वेचण्यासाठी किती मेहनत लागते हे त्यानं लहानपणापासून आपल्या डोयानं पाहिले व अनुभवले होते.खाली सांडलेल्या धान्याची त्यानं सावळन करून परत त्या तुरी त्यानं परत झोऱ्यात टाकल्या. एकदाचं माप झालं मापाची पावती हातात भेटली. पैसे हातात घ्यायच्या आगोदर त्यानं झोऱ्यातली शिदोरी काढून आवारातल्या शिदोरी मंडपात त्यानं लगबगीनं खाल्ली व नळावर हाताची आंजूय करून डकंडकं पाणी पेला. अडत्यापासून तीन क्विंटल तुरीचे अठरा हजार रुपये घेऊन कृषी केंद्रावाल्याईची बियाणं,खत, किटकनाशके याची उधारीपाधारी चुकोली. बाजारहाट करून जवळच्या हाटेलातून पोट्टयाईसाठी भातक्याचा पुडा घेऊन बैलबंडी खांद्यावर देऊन घरचा रस्ता धरला. माकोनीच्या नाल्याजोळ येईपर्यंत किर्र अंधार पडला झाला होता.जवळच मसानवटी व तीले लागूनच नदी. नदीच्या पाण्यातून चाकजोळीचा डूबूक डूबूक आवाज त्याले अधिकच भिववत होता.एकदाची गोदरी ओलांडून बैलबंडी गावच्या रस्त्यानं लागली.लगेच ताडकन उतरून चारापाणी करून व हातपाय धुवून सोबत जेवणं करून तो अंगणात बाजेवर झोपी गेला.
दुसऱ्या दिवशीचा सुर्य चांगलाच माथ्यावर आला होता.पिकपाई निघाल्यानं वावराची उलंगवाडी जवळ जवळ झालीच होती.मोकाट जनावरं शेतात धुऱ्याधाऱ्यावर मस्त चरत,खुरटत होती.शंकऱ्यानं ही आपली बैलजोडी जरासीक हातपाय मोकये होण्यासाठी घंटाकभर चरायला सोडली होती.सय संध्याकाय झाली होती.शंकऱ्या संध्याकायचं च्यापाणी घेऊन ढोरवासरं आणण्यासाठी दुप्पट खांद्यावर टाकून गावाबाहेर गेला.बराच शोध घेतल्यावर नदीच्या पल्याडून फक्त गाय, वासरू त्याले दिसलं. बैलजोडीचा पत्ता नव्हता. त्यानं अंधार पडेलोक सारा जंगल खंगाळून काढला होता.तरी बैलजोडीचा अतापता नव्हता. आजूबाजूले चौकशी केली तरी कुठं थांगपत्ता लागत नव्हता. मोठ्या मुश्किलीनं तो घरी आला.बायकोनंही त्याले धीर देला.
“घरी इनच अधिक कुठी जातील,लांबले असतील दूर चारापाणी पाहून”
तरी त्याचा जिवात जीव लागत नव्हता.चार महिन्याआधीच कापूस इकून त्यानं इवायाच्या गावाहून बेपाऱ्यापासून पन्नास हजार रुपयांले हा बैलजोडीचा धडधाकट जोड खरेदी केला होता.त्याचं मन कशातच लागत नव्हतं.निरानाम बैलजोडीचाच इचार मनात येत होता.
“मांघ आड, समोर विहीर”
अशी शंकऱ्याच्या मनाची अवस्था झाली होती.जेवणातही त्याचं मन लागत नव्हतं. रात्री उशिरापर्यंत कंदील घेऊन तो गावच्या बसस्टॅणजवळ म्हणजे फाट्यावरून चक्कर टाकून आला.इकडे तिकडे चौकशी केली पण काहीच पत्ता लागत नव्हता. दुसऱ्या दिवशी त्यानं झाकटीच हातपाय धुवून पायटीची एसटी पकडून इवायाचं गाव जवळ केलं.पोरीच्या घरी च्या घेतला. गोष्टी,बाता झाल्या.शंकऱ्यानं शेवटी छातीवर गोटा ठेवून इवायापाशी बैलजोडी चोरी गेल्याची गोठ काढलीच. इवायाले ही जरासाक झटका बसला. ज्याच्यापासून बैलजोडी इकत घेतली त्याच्याकडे परत आली गेली तर नसल म्हणून त्याचीही भेट घेतली परंतु काहीच फायदा झाला नव्हता.शेवटी संध्याकायचं घरी वापीस आल्यावर दुसऱ्या दिवशी जवळच्या पोलिस स्टेशनला तक्रार दाखल केली.
दिवसामागून दिवस जात होते. शंकऱ्याच्या बैलजोडीचा कुठेच ठावठिकाणा लागत नव्हता. एक दोन कत्तलखान्यातही त्यानं चकरा मारल्या होत्या.जवळच्या बैलबजारातही चक्कर टाकला परंतु काहीच फायदा झाला नव्हता.
“घोडं मेलं ओझ्यानं,शिंगरू मेलं हेलपाटयानं”
अशीच परिस्थिती त्याच्या मनाची झाली होती. बैलजोडी त्याचा जिव की प्राण होती.बैलाईले हातानं चारा घाऊ घालणं,ढेपीचा अलप मांडणं,खरारा करणं अशा गोष्टी नजरेसमोर आल्या म्हणजे त्याचा जीव तडतड तुटत होता.असला नसला सारा पैसा,अडका सरत आला होता. त्यात अधिक पेरण्या, पाण्यासाठी बि-बियाणं,खतं व नवीन बैलजोडीच्या गगनाला भिडलेल्या किमती बघून त्याची तर चांगलीच पंढरी घबरावली होती.
जून महिन्यात चांगला पाऊस पडला होता.लोकाईच्या किस्तकाडया,जांभई वाया सुरू झाल्या होत्या. शंकऱ्याजोळ मात्र आता कशाचाच पत्ता नव्हता.
“अटकली खुटी तं जाशील कुठी”
अशी त्याची गत झाली होती.फाटकी परिस्थिती व जवळ पैसा अदला नसल्यानं आता मात्र दुसऱ्याजोळून वावराची उधारपाधार किस्तकाडी करण्या शिवाय त्याच्याजोळ आता कोणताच पर्याय शिल्लक उरला नव्हता.
-विजय जयसिंगपुरे
भ्रमणध्वनी- ९८५०४४७६१९