दारिद्र्याच्या घामाने शिजून ‘वचपा’ काढणारी कादंबरी

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

दारिद्र्याच्या घामाने शिजून ‘वचपा’ काढणारी कादंबरी

बर्‍याच दिवसापासून आदरणीय मोतीरामजी राठोड सर, मला (डाॅ.वसंत भा.राठोड,किनवट) नांदेडला घरी बोलावत होते. तो योग आला १९ मार्च २०२५ रोजी कला महोत्सवाच्या निमित्ताने. संपूर्ण लेंगी मंडळच त्यांच्या घरी उतरविले. सोबत प्रा. डाॅ. राजीव राठोड होते. राठोड घराणे आणि चाळीतील सर्वांनीच गोबंजारा लेंगीनृत्याचा स्वानंद घेतला. सरांच्या अख्ख्या परिवारानेच आमचे सहर्षवदन स्वागत केले. याप्रसंगी मला त्यांचे आत्मचरित्र, आठवणीचं गाठोडं आणि वचपा ही कादंबरी भेट दिली. मी संपूर्ण कादंबरी वाचली आहे. अतिशय वाचनीय व तेवढीच संवेदनशील आहे. अतिशय जबाबदारीने राठोड सरांनी शब्दछटा वापरल्या आहेत.

            वाङ्मयाच्या क्षेत्रात ग्रामीण, नागरी, आदिवासी, दलित, कामगार, महिला, बाल इत्यादी वाङ्मयीन साहित्य पूर्वीपासूनच नावारूपास आलेले आहेत. नव्वदीच्या नंतर भटक्या विमुक्तांच्या साहित्यांने दमदार पदार्पण केले आहे. त्याआधी साहित्य लिहिल्या गेले असतील. यात दुमत असण्याचे कारण नाही. परंतु नव्वदीच्या नंतर हे साहित्य चांगलेच भरभराटीस येऊ लागले. अशीच एक ‘वचपा’, नावाची सूड भावनेने ठासून भरलेली व वाचकांना शेवटपर्यंत खिळवून ठेवणारी कादंबरी सेवानिवृत्त गट शिक्षणाधिकारी मोतीराम राठोड यांनी लिहिली आहे. 

● हे वाचा – मायबोली बंजारा भाषा आणि तिचा अभिजात वारसा

           या कादंबरीतील सर्वच पात्र दारिद्र्याच्या घामाने चिंब झालेले आढळून येतात. दारिद्र्याच्या जोडीला अशिक्षा नि अज्ञान यामुळे जन्मोजन्मीच्या काळ्याकुट्ट अंधारात चाचपडत असलेलं जीवन भटके-विमुक्त तांडावासी जगत असतात. या भटक्यांच्या दारिद्र्य आणि अज्ञानाचा फायदा हुशार नि कावेबाज रानबोके कसे घेतात; याचे जीवंत चित्रण लेखकांनी फारच हुबेहुब केले आहेत. तांडा जीवनातील संवाद, न्याय, निवाडा, खाण्यापिण्यातील चंगळ, आकर्षक संवादाच्या माध्यमातून मांडल्यामुळे जणूकाही आपण चित्रपटच पाहत आहोत; असे वाचकांना वाटल्याशिवाय राहत नाही. भारतवर्षात बर्‍याच विजय माल्या, मेहूल चोक्शी, ललित मोदी यांनी देश लुटला नि विदेशात निघून गेले. परंतु सामान्य लोकं शेळ्या, मेंढ्या, म्हैस, बैलं चोरणारे मात्र येथे चोर, दरोडेखोर, लुटारू ठरले व पोलीसकाठी, कोर्टकचेरी करून मरणपंथास गेले. 

            ‘ वचपा ‘ कादंबरीत लेखकांनी विरता, गेयता व तेवढेच शृंगारिक लावण्य रूपाचे अनेक पदर बिनधास्तपणे मांडले आहेत. मोकळेपणाने विविध कंगोर्‍यांची योग्य चाळण करून साहित्याचे शुद्धरूप वाचकापर्यंत पोहोचविले आहेत. 

           साधारणतः ‘वचपा, म्हणजे – सूड, बदला’ असाच त्याचा अर्थ होईल. माळरान भरकाडीवर पंधरा – वीस किलोमीटरच्या परिघात बरेचसे भटक्यांचे तांडा वसतीस्थान होते. त्यातच सकनूर नावाची एक वसती, येथे भिमला आणि भुरी गरीबीचे चटके सहन करीत मोलमजुरीच्या बळावर गुण्यागोविंदाने आपला प्रपंच चालवतात. या दाम्पत्याला एक शेवंती मुलगी तिच्या पाठचा तब्बल अठरा-वीस वर्षानंतर नवसाचा गंभिरा जन्माला आला म्हणून मोठ्या लाडागोडातच मोठा ठोम्या झाला. 

 हे वाचा – ग्रामीण जीवनाचा  सार म्हणजे : भूक छळते तेव्हा…

            शेवंतीच लगीन झाल्यानंतर भाऊ गंभिरा तिच्याकडे काही दिवस राहायला जातो व हुल्लडबाजीतच चरायला आलेल्या शेळ्याच्या कळपातून एक चांगली चिकनी पाट लपवून रात्रीला फडशा पाडतात. तेवढ्यात हिरानगरचे लोकं आपली हरवलेली पाट हुडकत, शोधत येतात नि यांची चोरी रंगेहाथ पकडतात व सर्वांनाच चांगली चोप देतात. या सर्वात गंभिरा लहान असतो पण भलताच रागीट. मारणाऱ्यांना गंभिरा म्हणाला,” हातपाय बांधूलालाव बांदा, बांदा पण म्या मोठा झाल्यावर तुमचा वचपा घेताव का नायी तेच बगा “(पृष्ठ- १४). या अपमानाचं शल्य गंभिराला पचनी पडत नाही. बालवयात चोरीचा बसलेला उर्मीघाव सहन होत नाही. हेच शल्य त्याला पुढेचालून अट्टल चोर, वाटमारी, मारामारी, दरोडेखोर बनवतो. तेंव्हापासून गंभिरा ‘ वचपा ‘ काढण्याची खूणगाठ बांधतो. 

           कोवळ्या वयातील भावाला झालेली मारहाण, झालेलं अपमान बहिण शेवंतालाही सहन होत नाही. ती ही सूड भावनेने पेटून उठते व हिरानगरच्या एका व्यक्तीवर छेडखानीचा आरोप लावते परंतु देशमुखाच्या न्याय निवाड्यात तिची पुरतीच फसगत होते. याही वेळेस सर्वांदेखत बहिणीची झालेली बेअब्रू गंभाराला सहन होत नाही. ” गंभिराने बहिणीची झालेली फजिती, बेइज्जती प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिली होती. देशमुखाच्या वाड्यातून दातओठ खात तो सरळ सकनूर तांड्याला निघून गेला “(पृष्ठ-३०). 

           या सर्वच बाबीचा वचपा तो एनकेन प्रकारे या हिरानगर, सकनूर, मुखेड, बाराहळी, परिसरात काढत असतो. आपल्या बलदंड शरीरयष्टीच्या बळावर जबरदस्त जरब निर्माण करतो. नेमका त्याच्या याच पिळदार देहयष्टीचा फायदा जीवनराव पाटील अर्थकारण, राजकारणात उचलतात. ” जीवनराव पाटलाची पार्टी ही पहिल्याच वेळेस निवडून आली होती. त्यात गंभिराचा वाटा लई मोठा होता. गंभिराची किंमत गावात वाढली. जीवनराव पाटील आता गंभिराला गंभिरराव म्हणून बोलू लागले ” (पृष्ठ -४४).

             मुखेड, बाराहळी, देगलूर परिसर हा तेलंगणा- कर्नाटक सीमावर्ती भागाच्या लगत जोडलेला आहे. आता गंभिरा आपल्या साथीदारांसह बरीच वाटमारी व दरोडे घालू लागला व मिळविलेला पैसा, मालमुद्दा जीवनराव पाटलाकडे नेऊन जमा करू लागला. अशा गुन्ह्यात कित्येक वेळेस पोलीसवारी, कोर्टकचेरी करून परत येऊ लागला. याकामी जीवनराव पाटलांचे मोठे सहकार्य गंभिराला मिळू लागले. एक वेळेस जीवनराव पाटील ठाणेदारास पैसे देतात व त्याच्या गुन्ह्याकडे नजरअंदाज करायला सांगतात ; या बदल्यात तुम्हाला सगळं मिळंल.  ” असं म्हणून जीवनराव पाटलाने मा. रा. कुबडे ठाणेदाराच्या हातात हात दिला. शंभरच्या पाच नोटा होत्या. ते कुबडे साहेबांनी उजव्या खिशात टाकले व म्हणाले, जीवनराव असं कसं म्हणताव. मी तुमचा हाय. मी तुमचाच राहणार “(पृष्ठ-१३४).

           गंभिराच्या गुन्हेगारी जगताच्या कारवाया दिवसेंदिवस वाढतच होत्या. यामुळे वडील भिमला व आई भुरी, पत्नी वनमाला घायकुतीला आले होते. कारण आधीच दुनियेच दारिद्र्य, गरीबी आणि आता बदनामीन कुटुंब पुरताच गारद झाला होता. यांच्या बदनामीची लक्तरे वेशीवर टांगल्या जात होती. एके दिवशी काकुळतीला येऊन वनमाला नवर्‍याला म्हणते, सोताच्या घराला आग लावून, दुसर्‍याच विजवायचं नसते, यावर गंभिरा म्हणतो, ” म्या शपथ घेऊन सांगूलालोय. म्या गरिबाच्या मुलीचं लगीन व्हावं म्हणून त्यांना पैसा वाटूलालावं. त्या मुलीचे लगीन लावून दिलाव. गरिबाला अडी अडचणीत मदत करूलालाव. गरिबांसाठी म्या झटूलालाव “(पृष्ठ- १५०).

           गंभिरा जेवढा क्रूर नि मग्रूर होता, तेवढाच तो हळव्या मनाचा मातृहृदयी होता. अशाच एका गरिबाच्या मुलीला सासरचे नीट नांदवत नाहीत, तिला त्रास देतात, मारझोड करतात. ही वार्ता गंभिराच्या कानी पडते. त्या मुलीला व तिच्या वडीलांना सोबत घेऊन मुलीच्या सासरी सक्रुतांड्याला जातात. गंभिराला पाहून सासरमंडळी चळचळा कापायला लागतात. तो त्यांना चांगलं दम भरतो, मुलीला नीट नांदवलं नाहीतर गाठ माझ्याशी आहे. गंभिरा विषयीची चांगुलपणाची वार्ता ऐकून एक बाई म्हणाली, ” माय उगीच गंभिराला नाव ठेवत्यात ; पण गंभिरा गरिबांसाठी देवमाणूस हाय मणं माय “(पृष्ठ-१५९).

           गंभिराचे गुन्हे, भांडणतंटा, चांगुलपणा, लाचारी अशा अनेक सुखादुःखाची वार्ता रोजच लोकांच्या मुखी चर्वितचर्वण होऊ लागली. परंतु मरणाच्या शेवटपर्यंत तो कुटुंबांच्या कामी काही आला नाही. भयंकर हालअपेष्टांने भिमला व भुरी नीजधामास जातात. पत्नी वनमाला काळजाला पिळणी देऊन, गीरीबीचे चटके व नवर्‍याच्या बदनामीची लक्तरे सहन करीत. बाळ जीवनला लहानाच मोठ करते. श्रमसंस्काराचे बीजारोपण त्याच्या मनपटलावर बिंबवते. मुलगा जीवन अतिशय कष्टाने शिकतो, देगलूरला वकिली करतो. पुढे न्यायाधीश होतो. स्वतःची कार घेऊन घरी येतो. आई – वडिलांचे दर्शन घेतो. याप्रसंगी वडील गंभिरा म्हणतात,*” म्या पापी हाव गा, मला तू शिवू नगंस, म्या तुझ्यासाठी कायबी केलेलो नायी. म्या पाया पडून घ्यायच्या लायकीचा नायी “(पृष्ठ-१९५). नवर्‍याचे हे शब्द ऐकून वनमालाने एकच हंबरडा फोडला. तिच्या मातृहृदयाच्या रडण्याने, विव्हळन्याच्या हुंदक्याने संपूर्ण तांडा गोळा झाला. गंभिराच्या अंगणात पांढरी कार पाहून तांडावासी आनंदून गेले. मरणपंथास आलेला गंभिरा अखेरच्याक्षणी वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला होता. नंतर न्यायाधीश (जीवन) साहेबाचे झुमकी (सविता) नावाच्या एका घरंदाज सुंदर मुलीशी विवाह होतो, वनमाला आजी होते. भिमला – गंभिरा- जीवन अशा तिन पिढीचा दारिद्र्य आणि संघर्षमय इतिहास वाचकापुढे ठेवून, अनेक वळणं घेत लेखक मोठ्या महतप्रयासाने एखाद्या सिनेमाला लाजवेल अशा पध्दतीने कादंबरीची सांगता करतात.  

         ‘ वचपा ‘ ही कादंबरी खरोखरच वाचकांना साहित्य वाङ्मयाच्या एका वेगळ्या दुनियेत घेऊन जाणारी आहे. सजलेले मुखपृष्ठ, आकर्षक बांधणी, सुबक छपाई, तेवढीच मजबूत आहे. सायास पब्लिकेशनचे प्रकाशक, माधव जाधव यांनी प्रस्तावना दिलेली आहे व थोर विचारवंत, अठराव्या विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, डाॅ. वासुदेव मुलाटे यांनी भक्कमपणे पाठराखण केली आहे. त्यामुळे प्रस्तुत कादंबरी आणखीन खुलून दिसते आहे. येत्या ०२ एप्रिल २०२५, बुधवार रोजी सिंगोडा, ता.किनवट, जि.नांदेड येथे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित होणार आहे. आपण खरेदी करून उपरोक्त कादंबरीचे स्वागत करावेत. 

धन्यवाद !

*लेखक –  मोतीराम रूपसिंग राठोड

*मोबाईल नंबर – 9922652407

*कादंबरी – वचपा

*पृष्ठ – २१६

*प्रकाशक – सायास पब्लिकेशन, नांदेड

*प्रथमावृत्ती – ३१ मे २०२४

*मूल्य – ३१० ₹

* शब्दांकन तथा समीक्षण,

दारिद्र्याच्या घामाने शिजून 'वचपा' काढणारी कादंबरी

*कल्लोळकार डाॅ.वसंत भा.राठोड, किनवट.

*मोबाईल नंबर – 9420315409.

Leave a comment