मानवतेचा विचार करून
डोळे असून बनतो अंध
प्रत्येकाच्या हृदयी मूरावा
प्रांजळ माणुसकीचा गंध
नाहकच सहनशीलतेचा
अंत कोणी पाहू नये
ऊस गोड लागला म्हणून
मुळासकट खाऊ नये
तुम्ही आम्ही एकच आहोत
एकसंध नियमांचे बांधील
विखुरलेल्या अव्यवस्थेला
कोण कशाप्रकारे सांधील?
आपलाच अव्यवहारीपणा
समाजाला दावू नये
ऊस गोड लागला म्हणून
मुळासकट खाऊ नये
समाज काही म्हणत नाही
आपल्या मनाला तरी कळावं
अंधारात चाचपडणाऱ्यासाठी
एका दिपासारखं जळावं
वाईट माझं होणार नाही
भ्रमात कोणी राहू नये
ऊस गोड लागला म्हणून
मुळासकट खाऊ नये
तुमच्या चांगल्या कामाचे
चांगलेच फळं मिळतील
कोणी करतील वाहवा
कोणी तुमच्यावर जळतील
सत्याचा मार्ग खडतर
वाट कोणाची पाहू नये
ऊस गोड लागला म्हणून
मुळासकट खाऊ नये
-पी के पवार
सोनाळा बुलढाणा
९४२१४९०७३१