रंग बदलतो माणूस.!
गावंखोरी कुपावर
झाली सरड्यांची मिटिंग
पन्नास होते कुपाटीला
काही झुडपावर वेटिंग !!
चर्चेचा विषय होता
दोन पायाचा प्राणी
फसवी, हसवी, स्वार्थी
ज्याची कडू, गोडं वाणी !!
निसर्ग धर्म पाळतो
बदलतो अंग ढंग
काळ, वेळ, ऋतू पाहून
बदलतो आपुन रंग !!
जहरील्या नागावानी
तो रोज टाकतो कात
रंग बदलतो रोज
करतो माणुसकीचा घात !!
जातीसाठी माणसानं
लयचं कहर केला
कंबरेच फेडून सन्या
त्याचं त्यान मुंडास केला !!
असा माणूस हा प्राणी
लय सरड्याहुनी भारी
घडोघडी न्यारे रंग
त्याचे व्यवहारी संसारी !!
म्हणून म्हणतो सारे
आपुन एकीने जगू
जाती संग माती खाऊ
नाही माणसापरी वागू !!
-वासुदेव महादेवराव खोपडे
सहा. पोलीस उपनिरीक्षक (सेनि)
अकोला 9923488556
ReplyForward |