विद्युत व यंत्र अभियांत्रिकी नवीन इमारतीची पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पायाभरणी
गौरव प्रकाशन
अमरावती (प्रतिनिधी) : अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात नव्याने उभारण्यात येणाऱ्या विद्युत व यंत्र अभियांत्रिकी विभागाच्या नवीन इमारतीची पायाभरणी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कुदळ मारुन व कोनशिलेचे अनावरण करुन करण्यात आली. इमारत बांधकाच्या कामाला उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून निधी उपलब्ध करुन दिला जाईल, अशी निसंदिग्ध ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.
या समारंभास खासदार डॉ. अनिल बोंडे, खासदार नवनीत राणा, आमदार प्रताप अडसड, आमदार प्रवीण पोटे, एमआयडीसी असोसिएशनचे किरण पातुरकर, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. आशिष महल्ले, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता रुपा गिरासे, कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहत्रे यांच्यासह महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग, अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.
विद्युत अभियांत्रिकी व यंत्र अभियांत्रिकी विभागाची नवीन इमारत बांधकामात तळमजला व पहिला मजला असणार असून त्याचे 3432 चौ. मीटर क्षेत्रफळ आहे. या इमारतीत यु.जी क्लासरुम व पी.जी. क्लासरुम, स्टाफ केबिन, कार्यालय, ग्रंथालय, प्रयोगशाळा, स्वच्छतागृह आदी बाबी व सुविधा अंतर्भूत आहेत. या दोन्ही विभागाच्या इमारतींच्या बांधकामासाठी सुमारे 33 कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाकडून मंजूर करण्यात येणार असून त्याची प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.