राज्यस्तर शालेय धनुर्विद्या व वुशू क्रीडा स्पर्धा; स्पर्धेकरीता उत्तम सुविधा उपलब्ध करुन द्या- जिल्हाधिकारी
अमरावती, : राज्यस्तर शालेय धनुर्विद्या व वुशू क्रीडा स्पर्धेचे आयोजन अमरावती येथे होणार आहे. स्पर्धेच्या अनुषंगाने जिल्ह्यात येणाऱ्या खेळाडूंना उत्तम सुविधा मिळावी याकरीता संबधित विभागाशी समन्वय साधून पूर्वतयारी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले.
राज्यस्तर शालेय धनुर्विद्या व वुशू क्रीडा स्पर्धेचे यशस्वी आयोजनासंदर्भात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा क्रीडा परिषदेची बैठक पार पडली, यावेळी ते बोलत होते. उपशिक्षणाधिकारी अनिल कोल्हे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक महाबुध्दभुषन सोनवणे, प्र.जिल्हा माहिती अधिकारी अपर्णा यावलकर, अमरावती महानगर पालिका प्रतिनिधी श्री. ठाकरे, पोलिस निरीक्षक जी. एस. उबंरकर, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, क्रीडा अधिकारी वैशाली इंगळे आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कटियार म्हणाले की, राज्यस्तर शालेय स्पर्धेकरीता निवास, भोजन, क्रीडांगण, वैद्यकीय समिती, वाहतुक, तांत्रिक समिती, प्रसिध्दी समिती, सुरक्षा समिती गठीत करण्यात यावी. स्पर्धेच्या उद्घाटन व समारोपासाठी लोकप्रतिनिधी व वरिष्ठ सनदी अधिकारी यांना निमंत्रीत करावे. तसेच स्पर्धेच्या अनुषंगाने शासकीय विभागांशी समन्वय साधून खेळाडूकरीता उत्तम सुविधा पुरवावे, असेही निर्देश दिले.