मोर्शी वरूड तालुक्यात महाआरोग्य तपासणी शस्त्रक्रिया शिबिराला सुरुवात
* मोर्शी विधानसभा मतदार संघातील हजारो रुग्णांना मिळणार दिलासा !
* आमदार देवेंद्र भुयार मित्र मंडळाचा अभिनव उपक्रम !
मोर्शी (तालुका प्रतिनिधी) : मोर्शी वरूड विधानसभा मतदार संघामध्ये आमदार देवेंद्र भुयार मित्र मंडळाच्या वतीने आज दिनांक ६ ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या महाआरोग्य शिबिराच्या तयारीने वेग घेतला आहे. मोर्शी वरूड तालुक्यामध्ये भव्य आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराची जय्यत तयारी व भव्य नियोजनाचे काम सध्या युद्ध स्तरावर सुरू आहे.
मोर्शी विधानसभा मतदार संघाचे आमदार देवेंद्र भुयार यांच्या संकल्पनेतून वरूड तालुक्यातील शेघाट येथून ३ ऑक्टोंबर पासून महाआरोग्य तपासणी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असून आज दिनांक ६ ऑक्टोंबर रोजी मोर्शी तालुक्यातील हीवरखेड येथून महाआरोग्य शिबिराचा शुभारंभ आमदार देवेंद्र भुयार यांच्या हस्ते होणार आहे मोर्शी वरूड तालुक्यामध्ये १० ऑक्टोंबर रोजी अंबाडा, १२ ऑक्टोंबर रोजी पुसला, १६ ऑक्टोंबर रोजी राजुरा बाजार, १९ ऑक्टोंबर रोजी वरूड, २० ऑक्टोंबर रोजी रिद्धपूर, २२ ऑक्टोंबर रोजी जरुड, २६ ऑक्टोंबर रोजी बेनोडा, ३० ऑक्टोंबर रोजी आमनेर, ३ नोव्हेंबर रोजी पिंपळखुटा, ६ नोव्हेंबर रोजी लोणी येथे भव्य आरोग्य तपासणी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती यावेळी आमदार देवेंद्र भुयार यांनी दिली.
यापूर्वी मोर्शी वरूड तालुक्यात आमदार देवेंद्र भुयार यांच्या माध्यमातून झालेल्या अशा अनेक प्रकारच्या शिबिरांना चांगला प्रतिसाद लाभला आहे. कोरोना काळानंतर आता हे शिबिर प्रथमच होत आहे. या शिबिरामध्ये दुर्धर व गंभीर आजारांची तपासणी व औषधोपचार मोफत केला जाणार आहे. या शिबिराची मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे.
मोर्शी विधानसभा मतदार संघामध्ये आमदार देवेंद्र भुयार मित्र मंडळातर्फे नागपूर येथील तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत मेडीसिन, अस्थिरोग, स्त्रीरोग, नेत्ररोग, बालरोग, दंतरोग, न्युरोलॉजि, शल्यचिकित्सक, कान, नाक, घसा, मेंदू शस्त्रक्रिया (न्युरो सर्जन), किडनी रोग तज्ञ, हृदयरोग यासह आदी आजारांची भव्य आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे त्यामध्ये सर्व आजारांची तपासणी करून मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या भव्य शिबिरामध्ये आरोग्य तपासणी करून आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी केले.
नागरिकांना विविध आजाराच्या उपचारासाठी शहराच्या ठिकाणी जावे लागू नयेत. त्यांना स्थानिक पातळीवरच उपचाराची सोय व्हावी, याकरिता भव्य आरोग्य तपासणी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिराच्या माध्यमातून नागरिकांची विविध आजाराची मोफत तपासणी करुन त्यांना काही आजार असल्यास त्यांच्यावर औषधोपचार करण्यात येतील. तर गंभीर आजार असणार्या रूग्णांची शस्त्रक्रिया व पुढील उपचार नागपूर येथे करण्यात येणार असल्यामुळे या शिबीराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा.
– आमदार देवेंद्र भुयार