शासन आपल्या दारी उपक्रम यशस्वी करण्यासाठी सुक्ष्म नियोजनावर भर द्या – जिल्हाधिकारी सौरभ कटियार
अमरावती, : शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ अभियान शासनामार्फत राबविण्यात येत आहे. ‘शासन आपल्या दारी..योजना कल्याणकारी’ हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महत्त्वाकांक्षी उपक्रम आहे. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहचून त्यांना सहाय्य व्हावे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या अनुषंगाने शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे जिल्हास्तरीय आयोजन अमरावती येथे लवकरच करण्यात येणार आहे. प्रशासकीय विभागांनी समन्वय साधून जिल्हास्तरावरील ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी आज येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे जिल्हास्तरीय ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाच्या आयोजनाच्या अनुषंगाने आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी श्री. कटियार बोलत होते. जिल्हास्तरीय कार्यक्रमामध्ये मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, मा. पालकमंत्री तसेच मा. मंत्री महोदय यांच्या उपस्थितीत नागरिकांना शासकीय योजनांचा थेट लाभ प्रदान करण्यात येणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा, मुख्यमंत्री सचिवालयाचे विशेष कार्य अधिकारी राहुल देशपांडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. विवेक घोडके, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उपविभागीय अधिकारी अनिल भटकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके, जिल्हा नियोजन अधिकारी अभिजीत म्हस्के, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत म्हेत्रे, पोलीस निरीक्षक अर्जून ठोसरे तसेच विविध विभागांचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी श्री. कटियार म्हणाले, शासन आपल्या दारी उपक्रम यशस्वी करण्यासाठी विविध विभागांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांनी ती चोखपणे सांभाळावी. उपक्रमामध्ये लाभार्थ्यांना कार्यक्रमासाठी आणणे हा महत्त्वाचा भाग आहे. त्याअनुषंगाने वाहतूक आराखडा तयार करावा. लाभार्थ्यांना कार्यक्रमाच्या दिवशी आणतांना त्यांची काळजी घेण्यात यावी. बसमध्ये प्राथमिक उपचारासोबतच आरोग्य सेवक, कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात यावी. कार्यक्रमासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. कार्यक्रमस्थळी स्वच्छता विषयक व्यवस्था, शौचालय सुविधा, वीज, सुरक्षा व्यवस्था, आरोग्य, खाद्यान्ने तसेच पाणी, आसन व्यवस्था याबाबत नियोजन करण्यात यावे. प्रत्येक लाभार्थ्याला ओळखपत्र देण्यात यावे. यावेळी लाभार्थ्यांना रोपे आणि सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. याबाबत नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
कार्यक्रमस्थळी मोठ्या प्रमाणावर नागरिक येणार असल्याने आरोग्य व्यवस्था उभारण्यात यावी. फिरत्या शौचालयांची व्यवस्था करण्यात यावी. तसेच परिसरात स्वच्छता राहील या दृष्टीने नियोजन करण्यात यावे. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी बॅरेकेट्सची व्यवस्था तसेच आगीच्या स्थितीबाबत योग्य ती काळजी घेण्यात यावी. कार्यक्रमाच्या दिवशी शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक विभागाने आपले नियोजन करावे, असे आवाहन श्री. कटियार यांनी केले.