* नांदेड येथील घटनेची मुख्यमंत्र्यांनी घेतली गंभीर दखल
* चौकशीअंती दोषींवर कारवाई करणार
मुंबई, : नांदेडच्या शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात झालेल्या घटनेची शासनाने गंभीर दखल घेतली असून या घटनेची चौकशी करुन त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
मंत्रालय येथे आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, याबाबतीत प्राथमिक माहिती घेतली असता लक्षात आले की, रुग्णालयात औषधांची कमतरता नव्हती. रुग्णालयात पुरेशी औषधे होती. तिथे पुरेसे डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांची उपलब्धता आहे. यानंतरही अशा प्रकारची घटना घडल्याने ही गंभीर बाब आहे. त्यामुळे नांदेड येथे झालेल्या मृत्यूंची चौकशी होईल. यात कोणी दोषी आढळला, तर त्याच्यावर कारवाई केली जाईल.
राज्य सरकारने ही घटना अतिशय गांभीर्याने घेतली आहे. त्यामुळेच मंत्री, सचिव आणि अधिकाऱ्यांना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. आता याप्रकरणी चौकशी होईल आणि पुढील कारवाई केली जाईल.