चिखलदरा मान्सून पर्यटन महोत्सव 15 व 16 जुलैला
अमरावती, (गौरव प्रकाशन वृत्तसेवा) : पर्यटन संचालनालय तसेच जिल्हा प्रशासन यांच्या विद्यमाने ‘चिखलदरा मान्सून पर्यटन महोत्सव’ नगरपरिषद विश्रामगृह, चिखलदरा येथे दि. 15 व 16 जुलै 2023 रोजी आयोजित करण्यात आले आहे. शनिवार दि. 15 जुलै रोजी दुपारी 1.30 वाजता खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. तसेच महोत्सवाचा समारोपीय कार्यक्रम रविवार दि. 16 जुलै रोजी दुपारी 3.30 वाजता दिव्यांग कल्याण मंत्रालयाचे अध्यक्ष ओमप्रकाश ऊर्फ बच्चभाऊ कडू तसेच आमदार राजकुमार पटेल यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
विदर्भाचे नंदनवन तसेच राज्यातील प्रमुख थंड हवेचे ठिकाण म्हणून चिखलदरा येथे वर्षभर पर्यटक मोठ्या संख्येने येतात. विशेषत: पावसाळी हंगामात मुसळधार पावसासह डोंगरदऱ्यातून कोसळणारे धबधबे, दऱ्याखोऱ्यांचे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटक उत्साहाने येतात. यामुळे चिखलदऱ्याचे ‘पावसाळी पर्यटन स्थळ’ (मान्सून डेस्टिनेशन) म्हणून प्रसिध्दी व्हावी, यासाठी चिखलदरा मान्सून पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके यांनी दिली.
राज्यातील पर्यटनाला चालना देऊन पर्यटन स्थळांची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापक प्रमाणात प्रसिध्दी करण्यासाठी पर्यटन संचालनालय प्रयत्नरत आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी साहसी उपक्रम जसे पॅरासेलिंग, पॅराग्लॅडींग, जंगल सफारी, कॉफीचे मळे, स्ट्रॅाबेरी तसेच आदिवासी लोकांनी केलेल्या वनशेतीमधील रानभाज्या, रानफळे, वनौषधी याचे पर्यटकांना आकर्षण आहे. या पार्श्वभूमीवर सन 2023-24 मध्ये विविध महोत्सव, रोड शोच्या माध्यमातून प्रसिध्दी मोहिम राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून चिखलदरा मान्सून पर्यटन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवामध्ये हेरिटेज वॉक, आदिवासी नृत्य, आदिवासी कलादर्शन, खंजिरी (भजन) वादन, ‘गाविलगडावर बोलू काही’ यावर माहितीपट, वाईल्ड कॉल-पक्षांची बोलीभाषा सादरीकरण, आदिवासी खाद्यसंस्कृती, छायाचित्रण कार्यशाळा, छायाचित्र प्रदर्शनी, निसर्ग भ्रमंती, ‘निसर्गसंपन्न चिखलदरा’ या विषयावर पथनाट्य, चिखलदरा फन-रन, पावसाळी गिर्यारोहण, गाविलगड किल्ला भ्रमंती, सायकल रॅली, ‘प्रेक्षणीय चिखलदरा’ आणि जैवविविधतेवर आधारित माहितीपट अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी जास्तीत-जास्त पर्यटकांनी या महोत्सवाचा सहकुटुंब आनंद घ्यावा, असे आवाहन पर्यटन संचालनालयाचे उपसंचालक प्रशांत सवाई यांनी केले आहे.