* शासनाने शेतकरी सहायता निधीकोष निर्माण करावा-उपेक्षित समाज महासंघ
* महाराष्ट्र शासनाने शेतकरी सहायता निधी कोष निर्माण करावा व शेतमालाल हमीभाव द्यावा
* उपेक्षित समाज महासंघाची मुख्यमंत्र्यांना मागणी
अमरावती (प्रतिनिधी) : दलित – आदिवसी – बारा बलुतेदार – वंचित समाज घटकांच्या न्याय हक्कांसाठी सनदशीर मार्गाने लढा देणाऱ्या उपेक्षित समाज महासंघ या अराजकीय संघटनेच्या वतीने शेतकरी सहायता निधी कोष निर्माण करून त्यातील रक्कम केवळ शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी उपयोगात आणावी तसेच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सक्षम होण्यासाठी व बळीराजाच्या आत्महत्या थांबवण्यासाठी शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव देण्याची मागणीचे जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सचिवालय कक्षामार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आली.
उपेक्षित समाज महासंघाचे अध्यक्ष प्रा.श्रीकृष्ण बनसोड, कार्याध्यक्ष श्रीकृष्णदास माहोरे, कै. मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले, महात्मा फुले बहुउद्देशीय चारिटेबल ट्रस्टचे प्राचार्य प्रदीप लांडे,सावता माळी किसान आघाडीचे शंकरराव आचरकाटे व रामकुमार खैरे,रमेश गावंडे, डॉ.विजय बसवनाथे,तथागत बुद्धभूमि विकास संस्थेचे अध्यक्ष श्री टी.एफ.दहिवाडे व फुले, शाहू,आंबेडकरांच्या अनुयायांनी मागणीचे निवेदन दिले.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कधी अवर्षण तर कधी आति वर्षणाच्या नैसर्गिक आपत्तीमुळे तसेच यावर्षी अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे रब्बी,बागायती व फळ पिकांचे अतोनात नुकसान झाले. ” शेतकरी वाचला तर देश वाचेल ” , बळीराजा जगला पाहिजे तेव्हा केंद्र व राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने दीर्घकालीन सकारात्मक धोरण कार्यान्वित करण्याची गरज असून शेतकरी सहायता निधी कोष निर्माण करावा व शेतमालाला हमीभाव देण्यात यावा असे निवेदनात असल्याचे प्रा.श्रीकृष्ण बनसोड यांनी सांगितले. या प्रसंगी महासंघाच्या व इतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.