मंतरलेले दिवस.!
रात्रीच्या गर्भातून नव्या सूर्याचा उदय होत होता.सकाळची उषःकाल नव्या नवलाईने नटून येत होती .विसाव्याला आलेली खग किलबिलाट करून मनसोक्तपणे अवकाशात विहार करीत होती. कामाच्या थकव्याने मला थोडा आराम हवा असं वाटत होतं. तरी पण माझे ध्येय गाठण्यासाठी मला आराम करून चालणार नव्हते. माझे जीवन निरंतर चालत राहणारे असावे असा चंग मी माझ्या मनात बानला होता.दाहीदिशांनी संकटाचे वारे झेपावत होते .डहाळीला आलेले कोमल फुल वावटळीच्या झोताने गळून पडणार का..? अशी भीती मला वाटत होती. जीवनाचा नवा पथ पादाक्रांत करण्याची जिद्द मनाला नवी उभारी देत होती. नव्या जीवनाला सुरुवात करत असताना येणाऱ्या संकटावर मात करण्याची ताकद माझ्यात निर्माण होत होती.डि एड.चं शिक्षण संपलं होतं. शासनाने भरतीवर अघोषित बंदी लावली होती. माझ्यासमोर फार मोठा प्रश्न आर्थिकतेचा निर्माण झालेला होता. नागपूरच्या गगनचूंबी शहरात स्वतःच अस्तित्व शो...