वाचन प्रेरना दिन विशेष……
मानवी व्यक्तीमत्त्वाला आकार देतात ती पुस्तके…..
मानवी जीवनामध्ये पुस्तकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पुस्तके वाचनातून आपल्याला चांगले काय, वाईट काय याचे दर्शन घडते. पुस्तकातून आपण चांगले-वाईट ओळखायला शिकतो. वाईटाचा त्याग केला पाहिजे आणि चांगले ते आत्मसात केले पाहिजे ही दृष्टी प्रत्येकाला पुस्तकातूनच मिळते. वाचनातून नवनिर्मिती साधता येते नव्हे तर साधल्या जाते. वाचनातून मानवी कल्पनाशक्ती वाढीस लागते. वाचनातून माणूस स्वप्ने पाहू लागतो व ती प्रत्यक्षात उतरविण्यासाठी प्रयत्न करतो. म्हणून स्व: व्यक्तिमत्त्व विकासासाठी पुस्तके वाचन करणे खूप महत्त्वाचे आहे.
जसे दररोज उगवणारा सूर्य मानवी जीवनाला ऊर्जा प्रदान करतो. चंद्र शितल चांदणे देतो. डोंगरदर्यातून उगवणारी प्रत्येक नदी काठावरच्या गावाची तहान भागवते, धरती माणसासाठी अन्नाची निर्मिती करते, उगवलेली वनश्री, झाडे मानवी जीवनाची प्रत्येक गरज पूर्ण करते, पशु-पक्षी पर्यावरणाची शुध्दता राखतात, गुरे-ढोरे मानवाच्या कष्टात सहभागी होतात, वातावरणातील हवा मानवी श्वास जगवते, सारा आसमंत मानवी जीवनासाठी निस्वार्थी वृत्तीने दातृत्व जोपासतो, त्याचप्रमाणे पुस्तके सुध्दा मानवी जीवनाला सर्वांगाने समृद्ध करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. पुस्तके आपल्याला जगण्यासाठी प्रेरणा देतात, नवी दिशा दाखवतात. पुस्तके वाचनामुळे माणूस प्रगल्भ बनतो. यावरून माणसाच्या आयुष्यातील पुस्तकाचे अनन्यसाधारण महत्त्व आपल्या सहज लक्षात येईल.
उदाहरणार्थ, महात्मा फुले यांचे साहित्य आपण वाचले की शेतकऱ्यांची हलाखीची स्थिती, शेतकर्यांवर होणारा अन्याय आपल्या लक्षात येऊ लागतो. त्यामुळे आपल्या अंत:करणात भावनांची मोठी खळबळ उडते. आपल्या अवतीभोवतीच्या परिस्थितीचे आपण निरीक्षण करतो. त्यात चांगले काय, वाईट काय आहे हे आपल्याला कळू लागते. म्हणून असे पुस्तक आपण कधीच विसरू शकत नाही. उलट असे पुस्तक आपण पुन्हा पुन्हा वाचत राहतो. अशा पुस्तकाच्या प्रत्येक वाचनाच्या वेळी आपल्याला नवीन दृष्टी मिळते, परिस्थितीचे अधिकाधिक चांगले ज्ञान मिळते. अशा परिस्थितीत काय केले पाहिजे आणि काय करता कामा नये यांचीही दृष्टी मिळते. मग आपण त्यानुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच पुस्तके आपल्याला चांगले जीवन जगायला शिकवतात. हे पुस्तकाचे फार मोठे महत्व आहे.
उत्तम स्वरूपाची पुस्तके आपल्याला सदोदीत भावनिक सोबत करतात. चांगल्या शब्दांची, वाक्यांची, परिच्छेदांची पुस्तके मानवी जिवनाला कलाटणी देतात, उभारी देतात, योग्य दिशा दाखवतात. पुस्तकरूपी संवादातून पात्रांच्या मनातील भावभावना आपल्याला कळायला लागतात. पुस्तकांमधील विविध घटना, प्रसंग यांची नाट्यमय मांडणी आपल्याला पाहायला मिळते. एकाच व्यक्तीचा स्वतःशी होत असलेला संवाद आपल्याला पुस्तकांमध्ये वाचायला, पाहायला मिळतो अशा संवादाला आपण ‘स्वगत’ म्हणतो. स्वगतमध्ये आत्मचिंतन, आत्मविश्लेषण, आत्मनिवेदन, आत्मटिका इत्यादी वैशिष्ट्य असतात. ही वैशिष्ट्ये मानवी जीवन सुकर, समृध्द करण्यास मदत करतात. म्हणजेच पुस्तक वाचनातून ज्ञान, आकलन, उपयोजन, कौशल्ये, अभिरूची, अभिवृत्ती आदींची वृद्धी होऊन विकसित होते. चांगल्या पुस्तकातून विलक्षण अनुभव मिळतात. पुस्तके वाचल्यावर आपल्या मनावर काहीना काही परिणाम करत असतात. पुस्तकातील दुःखद घटना वाचकांचे मन हेलावून टाकतात, हृदय पिळवटून टाकतात. मग या परिस्थितीतील दुःखाची जाणीव व्हायला लागते नव्हे होते. ही अशी स्थिती वाईट आहे, ती तशी असता कामा नये, तर ती बदलली पाहिजे, असे विचार मनात डोकावतात. मग माणसे ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करतात. नवीन चांगली स्थिती आणण्याच्या विचारांना पाठिंबा देतात.
दया पवार यांच ‘बलुत’ हे आत्मकथनात्मक पुस्तक पाहा. यात दलित समाजाचे अत्यंत हीनदीन अवस्थेतील चित्रण रेखाटलेले आहे. हे पुस्तक वाचल्यावर वाचकांना दुःख होते, संतापही येतो, मग जातीयता, धर्मांधता या तत्त्वांविरुद्ध त्याच्या मनात तिडीक निर्माण होते. याचा अर्थ ‘बलुत’ हे पुस्तक माणूसकीची बाजू घेते. गुलामगिरीविरुद्ध, अन्यायाविरुद्ध हे पुस्तक माणसाला लढायला प्रवृत्त करते.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या लिखित हिस्टरी ऑफ इंडियन करन्सी ऍण्ड बँकिंग, द बुद्धा अँड द फ्युचर ऑफ हिज रिलिजन, बुद्धिझम अॅंड कम्युनिझम, बुद्धा, आंबेडकर एंड माक्र्स, बहिष्कृत भारत, प्रबुद्ध भारत आदि. ग्रंथामधून त्यांनी धर्मसुधारणा, समाजसुधारणा व शिक्षण याकडे प्रामुख्याने लक्ष दिले. शिक्षणाने माणसाला आपले कर्तव्य व हक्कांची जाणीव होते हे बाबासाहेब जाणून होते. त्यांच्या ग्रंथ लेखनातून समाजाविषयीची तळमळ, सुधारणा व देशप्रेम दिसून येते. देश विकासात त्यांच भरीव कार्य आपले लक्ष वेधून घेते.
‘झोपी गेलेला जागा झाला’ या बबन प्रभूंच्या फार्स(प्रहसन) या इंग्रजी वांग्मयमध्ये मानवी व्यवहाराचा आणि जीवनातील सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मानवी व्यक्तिमत्त्वातील शाश्वत सत्य हे योग्य व रंजक पद्धतीने मांडलेले या नाटकात आपल्याला पाहायला मिळते. माणसाच्या स्वभावाचे अंतर्बाह्य दर्शन यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ‘मुलगी झाली हो!’ या ज्योती म्हापसेकर लिखित पथनाट्यात पुरुषसत्ताक व्यवस्थेमध्ये स्त्रियांचे होणारे शोषण मांडलेले आहे. हुंडाबळी, नोकरी करणाऱ्या स्त्रियांचा प्रश्न, स्त्रियांवर होणारे शारीरिक व मानसिक अत्याचार, स्त्री-पुरुष समानतेच्या विचारांची आवश्यकता अतिशय प्रभावीपणे या पथनाट्यात आपल्याला वाचायला, पाहायला मिळते.
‘ व्हय मी सावित्रीबाई बोलते’ सुषमा देशपांडे लिखित या एकपात्री प्रयोगामध्ये महात्मा फुले यांच्या जीवन व कार्याचा परिचय करून दिला आहे. त्यांच्या जीवनातील प्रसंग आणि घटनांची मांडणी सावित्रीबाई फुले यांनी प्रभावीपणे रेखाटली आहे.
म्हणजे अशी पुस्तके माणसाला चांगले जग निर्माण करण्याची प्रेरणा देतात. चांगली पुस्तके जीवनाचं वास्तव दर्शन घडवतात. माणसाला प्रगल्भ करतात. म्हणून प्रत्येकांनी दररोज कोणत्यानं कोणत्यातरी पुस्तकांच समजपूर्वक वाचन केलं पाहिजे.
लेखन~ संतोष मो. मनवर
जि.प.उ.प्रा.शाळा पंचाळा, जि.प. वाशिम