आयुष्मान कार्ड त्वरित काढून घेण्याचे जिल्हाधिकार्यांचे आवाहन
* अमरावती जिल्ह्यात 5 लक्ष 2 हजार 979 पात्र लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड्सचे वाटप
गौरव प्रकाशन अमरावती, (प्रतिनिधी) : अमरावती जिल्हा प्रशासनातर्फे आयुष्मान कार्ड काढण्याच्या मोहिमेमध्ये सर्व ग्रामपंचायत, सर्व आरोग्य केंद्रे आणि शहरी भागात वॉर्डनिहाय कार्ड काढण्यासाठी शिबिरे आयोजित केली आहेत. आतापर्यंत 5 लक्ष 2 हजार 979 पात्र लाभार्थ्यांना आयुष्मान कार्ड्स देण्यात आले आहेत. मागील 20 दिवसात 90 हजारपेक्षा जास्त आयुष्मान कार्डचे केवायसी करण्यात आले आहेत. ही बाब अत्यंत प्रशंसनीय आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ मिळण्याकरिता आयुष्मान कार्ड आवश्यक असल्याने सर्व पात्र लाभार्थींनी आपले कार्ड त्वरित काढून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.
केंद्र शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह जिल्ह्यात 23 सप्टेंबर 2018 पासून राबविली जात आहे. या योजनेमध्ये 1 हजार 359 गंभीर आजारांवर ५ लक्ष रुपयांपर्यंतची शस्त्रक्रिया व उपचार अंगीकृत शासकीय आणि खासगी रुग्णालयातून पूर्णतः मोफत केले जातात. हे आरोग्य विमा कवच प्रति कुटुंब, प्रति वर्ष ५ लक्ष रुपये अशा स्वरूपात मिळत असते. सन २०११ च्या सामाजिक, आर्थिक, जातीय जनगणनेनुसार एकूण 10 लाख 69 हजार 224 या योजनेमध्ये पात्र आहेत. तसेच अंतोदय,अन्नपूर्णा, पिवळे व केशरी शिधापत्रिकाधारक 8 लाख 74 हजार 488 इतके लाभार्थी आहेत. अमरावती जिल्ह्यातील संपूर्ण लाभार्थी संख्या 19लाख 42 हजार 712 इतकी असून त्यापैकी 5 लाख 2 हजार 979 इतक्या लाभार्थ्यांनी आपले गोल्डन कार्ड काढून घेतलेले आहेत.
संपूर्ण राज्यामध्ये ‘प्रधानमंत्री जन आरोग्य योजने’मध्ये एकूण १ हजार २४ रुग्णालये अंगीकृत आहेत .त्यापैकी २२६ शासकीय रुग्णालये असून ७९८ खासगी रुग्णालये अंगीकृत आहेत. तसेच अमरावती जिल्ह्यांमध्ये एकत्रित महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत 22 अंगीकृत रुग्णालये आहेत. यामध्ये 14 खाजगी रुग्णालय व 8 शासकीय अंगीकृत रुग्णालयांचा समावेश आहे.
01 सप्टेंबर 2023 पासून ‘आयुष्मान भव’ या मोहिमेतंर्गत ‘आयुष्मान आपल्या दारी ३.०’ उपक्रम जिल्ह्याभरात राबविला जात आहे, त्यामध्ये सर्व पात्र लाभार्थीना त्यांचे आयुष्मान कार्ड्स शासनाकडून केवायसीद्वारे तयार करून दिले जात आहेत. हे कार्ड तयार करण्यासाठी आशा सेविका, ग्राम पंचायत केंद्र चालक, सेतू सुविधा केंद्र, आरोग्य यंत्रणा आणि अंगीकृत रुग्णालयातील आरोग्यमित्र लाभार्थीच्या आधार कार्डच्या सहाय्याने आयुष्मान कार्ड तयार करून देत आहेत. याकरिता राष्ट्रीय स्वास्थ्य प्राधिकरण यांचे कडून एक मोबाईल अँप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. Web Portal: https://beneficiary.nha.gov.in, Mobile Application: https://play.google.com/store/apps/details?id=com.beneficiaryapp
या लिंकद्वारे अँप्लिकेशन डाउनलोड करून लाभार्थी बेनेफिशरी पर्याय निवडून स्वतःचे कार्ड स्वतः तयार शकतात, अशी माहिती महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेच्या जिल्हा समन्वयक डॉ. अंकिता मटाले यांनी दिली.