विदर्भातील संत्राचा शालेय पोषण आहारात समावेश करा !
बांगलादेशने संत्र्यावर ८८ रुपये प्रति किलो शुल्क लावल्याने विक्री मंदावली !
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन !
गौरव प्रकाशन
मोर्शी (तालुका प्रतिनिधी) : विक्रमी संत्रा उत्पादनांसाठी प्रसिद्ध असलेल्या विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोर्शी वरूड तालुक्यांतील सध्या अडचणीत असलेल्या संत्रा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी शालेय पोषण आहारात संत्र्याचा समावेश करावा,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत एक निवेदन देऊन करण्यात आली.
मोर्शी वरूड तालुक्यातील संत्रा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे.गेल्या तीन-चार वर्षात संत्राला चांगला दर मिळत होता.परंतु या वर्षीच्या हवामान बदलाचा परिणाम या पिकावर झाला असून संत्रा निर्यातीसाठी अडचणी येऊ लागल्याने संत्राच्या स्थानिक बाजारपेठेतील दर घसरला आहे.सध्या तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना 10 ते 15 रुपये किलोप्रमाणे संत्रा विकण्याची वेळ आली आहे.हे लक्षात घेऊन शालेय पोषण आहार व महिला बालविकास विभागाच्या वतीने येणाऱ्या अंगणवाडी व स्तनदा माता यांना मिळणाऱ्या आहारात सांत्राचा समावेश करून शासनाच्या वतीने अथवा शेतकरी गटाच्या वतीने शेतकऱ्यांचा संत्रा योग्य दरात खरेदी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी केली आहे.
याशिवाय निर्यातक्षम संत्रा उत्पादनासाठी मोर्शी तालुक्यात संत्रा संशोधन केंद्र उभारण्यात यावे, वादळी वाऱ्यासह गारपिट व पावसाने नुकसान झालेल्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी,तालुक्यात माती,पाणी व रासायनिक खतांच्या परीक्षणासाठी शासनाच्या वतीने अद्यावत प्रयोगशाळा उभारण्यात यावी,पॅक हाउस व शीतगृह उभारणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने अनुदान देण्यात यावे,तालुक्यातील संत्रा उत्पादक भागातील खराब रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, शेती पंपाला करण्यात येणारा वीजपुरवठा दिवसा व पुरेशा दाबाने करण्यात यावा.अशा विविध मागण्यांचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य रुपेश वाळके यांच्यातर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,कृषी मंत्री धनंजय मुंडे, पालकमंत्री चंद्रकांत पाटिल, विभागीय आयुक्त अमरावती, जिल्हाधिकारी अमरावती यांच्याकडे करून संत्रा उत्पादकांच्या अडचणी तातडीने सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी करण्यात आली.
बांगलादेशने नागपुरी संत्र्यावर ८८ रुपये प्रति किलो आयात शुल्क लावल्याने मागणी असूनही विक्री मंदावली आहे.त्यामुळे संत्रा उत्पादकांना प्रति टन किमान ८ ते १० हजार रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे.केंद्र सरकार फळांच्या प्रक्रिया उद्योगांना तसेच साखरेच्या निर्यातीला सबसिडी देते त्याचप्रमाणे केंद्र सरकारने संत्रा फळांच्या निर्यातीला सबसिडी द्यायला हवी.संत्राला जगात चांगली मागणी असल्याने निर्यातक्षम शेतमालाच्या उत्पादनास प्रोत्साहन देऊन शासनाने संत्रा उत्पादकांना पायाभूत सुविधा पुरवायला हव्यात.
-रुपेश वाळके उपाध्यक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोर्शी तालुका.