हृदयातून द्रवणाऱ्या दुःखाचे समीकरण मांडणारी कविता- भूक छळते तेव्हा…
भावनेचा बहर जेव्हा चिंतनाच्या पातळीवर येतो आणि अनुभवाचे संचयन होऊ लागते तेव्हा स्वतः कविता बाहेर पडण्यासाठी मार्ग शोधत असते आणि मग ती सह्रदयातून अखंड पाझरू लागते. भरल्या पोटी अनुभवाचा शोध घेत फिरावे लागते पण भूक छळते तेव्हा दस्तुरखुद्द शब्दच कवितेचे रूप घेऊन प्रगट होतात. केवळ प्रगटच होत नाहीत तर अनेकांच्या हृदयाचा ठाव घेतात. तर असाच शब्दाशब्दातून काळजाचा ठाव घेणारा,कष्टकऱ्यांच्या दुःखांना वाचा फोडणारा कवी संदीप राठोड यांचा ‘भूक छळते तेव्हा…’ हा कवितासंग्रह वाचनात आला.त्यात वाचक म्हणून मला जे जाणवलं ते असं-
कवी संदीप राठोड यांचा हा पहिला कवितासंग्रह असला तरी त्यात पहिलेपणाच्या खुणा शोधत बसण्याचा प्रश्नच येत नाही, कारण हा संग्रह चुका शोधतानाच भावनेत अडकवून टाकतो.हळूहळू वाचक पुढे जातो तेव्हा प्रस्तुत संग्रह धगधगत्या अनुभवाची लहाडच होऊन येतो तेव्हा त्यातली कविता वाचकाच्या मनाला चटका देऊन गेल्याशिवाय राहत नाही.
खरंतर प्रस्तुत काव्यसंग्रहातील कविता आकलन पातळीवर सरळ साधी सोपी असल्याने कुठेही दुर्बोधतेचा खेळ खेळत बसत नाही, म्हणून ती प्रत्येक वाचकाला आपलीशी वाटू लागते. सर्वांगीण दुःखाची परिसीमा समजणारा वाचक कवितेतल्या दुःखालाही आपले समजून त्यात स्वतःला शोधत बसतो आणि असे होत असताना कवितेची ताकद व वाचकाची समरसता यांचा मेळ बसतो आणि हाच मेळ या संग्रहाला वाचताना बसतो हे या संग्रहाचे खास वैशिष्ट्य म्हणावे लागते.
‘भूक छळते तेव्हा…’ या कवितासंग्रहातील बहुतेक कविता अष्टकात रचल्या असल्याने गेयतेचं वैशिष्ट्य घेऊन आल्या आहेत. तसेच प्रत्येक कविता भावनेला सरळ हात घालत असल्याने रुदनता जास्त जाणवत राहते त्यामुळे वाचक अधिकच अस्वस्थतेचा अनुभव घेतो पण दुसऱ्या क्षणी वाटते की भावनाविवश होऊन तर चालणारच नाही तर नव्या उमेदीने जगण्यासाठी सतत संघर्ष केला पाहिजे. फिनिक्स पक्षासारखे पुन्हा पुन्हा भरारी घेऊन उठले पाहिजे आणि नव्या जगण्याचा शोध घेतला पाहिजे याचाही प्रत्यय वाचकाला माय-बापाच्या कविता वाचून आल्याशिवाय राहत नाही. शिवाय ह्या सर्वच कविता जगण्यासाठी उत्तम बळ देऊन जातात.
खरंतर बंजारा समाज हा मूळचा व्यापारी समाज असल्याने ‘रसद’ पुरविणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता.इंग्रजांनी भारतात रेल्वे सुरू केल्याने त्यांचा व्यापार, व्यवसाय बुडाला.याला अनुसरून इंग्रजांशी दोन हातही झाले परंतु बदल काळाची गरज असते त्यानुरूप तांड्यांनी बदलायला हवे होते पण तेच त्यांना शक्य झाले नाही.परिणामी तांडे बेकार झाले.हाताला काम उरले नाही.अशात पोटाची खळगी भरण्यासाठी मिळेल ते काम तांडा करू लागला. यातूनच तांडा ऊसतोड कामगार म्हणून मोठ्या संख्येने पुढे आला, मात्र भूक त्यांचा कायमचा प्रश्न झाला.यासंदर्भात कवी आपल्या शीर्षक कवितेत म्हणतात…
उदरनिर्वाहाचं साधनच हिसकावून घेतल्यानंतर
भाकरीच्या शोधात निरंतर
वणवण भटकावे लागते जेव्हा…
अतृप्त राहिलेल्या आत्म्यांना
जगावं की मरावं हेच कळत नाही
भूक छळते तेव्हा…
व्यापार संपला आणि या जगात मालकीचं काहीच राहिलं नाही पण काळाच्या ओघात भटकंतीनंतर कुठेतरी स्थिरावताना कुडाचे का असेना एक घर मालकीचे झाले. शेणामातीचा वास असलेले घर कवीला फार मोलाचे वाटते. या घरातच आपली नाळ गाडल्या गेलेली असल्याने ते त्याच्या प्रेमाचं प्रतीक बनलेलं आहे. कवीसाठी घरसुद्धा बापासारखं कधी मागे हटत नाही. म्हणूनच घर कवीच्या जीवनातल्या अनेक घडामोडींचे साक्षीदार होते आणि म्हणूनच ते कवीला इंद्रपुरीपेक्षाही महान वाटते.
माय बापाने बांधले
देवळावाणी घर
येईल कशी माझ्या घराची
इंद्रपुरीला सर…!
‘भूक छळते तेव्हा…’ या काव्यसंग्रहात तांड्याचा संदर्भ घेऊन अनेक विषयाला हात घातलेला असला तरी महत्त्वाचा विषय ऊसतोड कामगारांचा आहे. तर दुसरा विषय स्वतःचे आधारवड मायबाप तद्नंतर काही विषय नाममात्र आलेले असून तेही संग्रहाची उंची वाढवीणारेच आहेत.ऊसतोड कामगारांचे प्रतिनिधित्व जरी कवीचे आई-वडील करीत असले तरी कविता मात्र तांड्याचे प्रतिनिधित्व करताना दिसते.
कवी संदीप राठोड यांच्या आधीही अनेक कवींनी ऊसतोड कामगारांना आपल्या लेखणीतून जागा दिलेली आहे परंतु तांडा या जटील समस्येतून बाहेर पडताना दिसत नाही.म्हणूनच की काय या कविलाही हा विषय महत्त्वाचा वाटतो.याचं कारणही तसंच मोठं आहे.ही एक समस्या बनत चालली आहे.या समस्येतून अनेक समस्यांना जन्म मिळत आहे हेही विसरून चालणार नाही.नवी पिढी शिक्षणापासून वंचित होत आहे पर्यायाने गरिबी, बेकारी,व्यसनाधीनता अशा एक ना अनेक समस्या संपूर्ण समाजालाच रसातळाला नेणाऱ्या झाल्या आहेत म्हणून या समस्येच्याच मुळाशी घाव घातला पाहिजे असे कवीला वाटते.
आज प्रत्येक तांड्याचं काय चित्र आहे ? पावसाळी पीकं घेतल्यानंतर घरा घराला कुलूप लागतात. परिणामी तांडे ओसाड पडतात.घरातल्या दिव्याला राखण म्हणून प्रत्येक उंबऱ्यात म्हातारी माणसे बसलेली असतात. शिक्षण घेणारी मुले बिऱ्हाड सांभाळायला आईवडीलांसोबत निघून जातात. मुकडदमाकडे बांधलेल्या कोयत्यातून पैसे घेऊन एक तर कर्ज फेडलेले असते, उरलेल्या रखमेची दारू पिऊन व पत्ते खेळून कर्त्या पुरुषानेच वाट लावलेली असते. बायको तर लंकेची पार्वती पूर्वीच झालेली असते आणि तोही पुरता कफल्लक झालेला असतो.पुढे चार महिने बायको पोरांना कोलूचा बैल बनवून जुतून दिलेले असते.जर आधुनिक काळातही तांड्याचं चित्र इतकं भयावह असेल तर कवीची छाती फाटणार नाही तर काय ? अन् काळजातून कविता उतरणार नाही तर नवलच.म्हणून ‘भूक छळते तेव्हा…’ सारखा कवी जागर मांडून बसतो.
युगानयुगे कष्ट करूनही सर्वकाळ दास राहिलेला कुणबी चिंतनाचा फार मोठा विषय आहे ते यासाठी की एकूणच समाजाची मनोवस्था फार गढूळ झाली आहे. कुणालाच कुणाबद्दल चाड उरलेली नाही. एकमेकांची कदर करणारा काळ व ती माणसे आज घडीला संपलेली आहेत.बोकाळलेल्या भ्रष्टाचारातून ‘इमान’ विकून जगणाऱ्या माणसांची संख्या जास्त झालेली आहे.पण या पार्श्वभूमीवर कवीचा बाप दीड दमडीसाठी कुणाचाही मिंधा राहिला नाही याचा कवीला अभिमान वाटतो.
अवघे आयुष्य कोणाची
त्याने केली नाही निंदा
दीड दमडीसाठी नाही
झाला कुणाचा मिंधा…
असा इमानी व संघर्षातील बाप मुलालाही उत्तम संस्कारातून संघर्षशील बनवितो.आज टिकायचं असेल तर सतत संघर्षशील राहावेच लागते तसेच इमानदारीला कधी कीड लागू नये हे संस्कार करताना बाप खबरदारी घेतो. जीवाचे रान करून लेकराला शिकविण्याचे काम प्रत्येक बाप करतो पण शिकून साहेब झालेल्या मुलांनी जन्मदाते व गावगाड्याकडे वळून पाहिले पाहिजे अशी माफक अपेक्षाही कवितेतून व्यक्त झालेली आहे या पार्श्वभूमीवर कवी म्हणतो-
अक्षर चार शिकल्यावरती
विसरू नको रे गाव
अभिमानाने मातीचा तू
टिळा कपाळी लाव…
या अभिमानासोबतच ‘नव्या पिढीचा सूर्य’ ही कविताही तांड्यातील पोरांच्या मनात नवी आशा व उमेद पेरणारी आहे. वाटेल त्या परिस्थितीत बेभरोशाच्या जगातही सदैव माणुसकी जपली पाहिजे कारण यापेक्षा मोठा धर्मच असू शकत नाही आणि तो मुलाला बापाकडूनच वारस हक्काने मिळालेला असतो आणि मुलानेही अखेरच्या श्वासापर्यंत जपावा अशी अपेक्षा कवी करतो. कुणबी बापाचं वर्णन करताना तो पुढे म्हणतो, कुणबी खऱ्या अर्थाने वारकरीच आहे. तो कष्टाच्या भरोशावर स्वतःच्याच शेतात शक्ती आणि भक्तीचा मेळ बसवून शेतातच पंढरपूर उभे करू शकतो. म्हणून माती अन् मातीवर जगणाऱ्यांना दान देण्याची दानत फक्त बापच दाखवू शकतो याचा कवीला सार्थ अभिमान आहे.बाप कळतो केव्हा तर बाप झालो तेव्हा. म्हणून कवी म्हणतो-
बाप कळणार नाही आहे विषय सखोल
बाप लौकिक घराचा रत्न आहे अनमोल
हा कवितासंग्रह बापाच्या कष्टाचा गाभा आहे.कष्ट आणि इमान या गुणांच्या भोवती हा कवितासंग्रह फिरताना दिसतो. बाप पूर्णार्थाने भाविक आहे पण त्याची भक्ती,भक्त रोहिदासासारखी दिसून येते.कामात ‘धाम’ मानणाऱ्यांमधला कवीचा बाप आहे. बाप म्हणतो की कष्ट करण्याची तयारी असेल तर चंद्रभागेत स्नानाला जाण्याची गरज नाही तर घामात न्हावून निघणाऱ्या बापाला कष्टातच चारीधाम करण्याचे भाग्य लाभते. अशा बापाला स्वतः च्या चामड्याचे जोडे करून जरी त्याच्या पायात घातले तरी त्याचे उपकार कधीही फिटणार नाहीत हे म्हणताना… ‘बाप माझा देव’ असे कवी नमूद करतो.तेव्हा कवीची बापावरची निष्ठा स्पष्ट होते. भुकेला पायखुटी घालून वेदनेसोबत पुरे छत्तीस गुणांनीसी जुळून घेणारा व भुकेशी दोन हात करणारा बाप भुकेलाच हरवायला निघालेला आपल्याला दिसतो.
जुळवून घेतले बापाने वेदनेशी छत्तीस गुण
व
घालून भुकेला पायखुटी आटवीत होता रक्त
ही कविता हृदयातून द्रवणाऱ्या दुःखांचे समीकरण मांडत असली तरी खंबीर जगण्याला जे आत्मविश्वासाचे भांडवल लागते ते हृदयाहृदयात पेरण्याचं काम ती करते. निर्धाराने जगण्यासाठी,पुढील पिढीसाठी धोपट मार्ग निर्माण करण्याचे कामसुद्धा ती करताना दिसते. अशीच कविता परिवर्तनाकडे बोट दाखवत असते आणि म्हणून संघर्ष जेथे असतो तेथे सातत्याची गरज असते.संघर्षाला सातत्याचा अभाव असेल तरच भूक छळते पण ज्या तांड्याला कष्टाचं सातत्य लाभलं आहे त्याचा संघर्षही थांबलेला दिसतो व थांबल्याशिवाय राहत नाही याचेही समर्पक विज्ञान कवी प्रस्तुत संग्रहातून प्रांजळपणे मांडताना दिसतो म्हणून सर्जनांचे संवर्धन करणाऱ्या कवितेला भावनेच्या पटलावर स्वतः अस्तित्व निर्माण करता येते त्यातलीच ही संदीप राठोड यांची कविता आहे.
कवी कितीही समस्येच्या विळख्यात गुरफटलेला असला तरी विरंगुळा म्हणून आपल्या लहानपणाकडे पाहतोच. कवी संदीप राठोड हे ‘भेट’, ‘रानमेवा’ सारख्या कवितेतून स्वतःच्या बालपणाच्या आठवणींकडे वळून पाहतात. मला तर या काव्यप्रांतातील हे वाळवंटातले ओयासिस वाटते व वाचकाच्या बालमनाला रंजक करण्याचा प्रयत्न वाटतो.
कविता ही रसाळ असावी तरच ती वाचकाला भावते. या संग्रहाचा विचार केला तर करूण व शांत रसाची कवीने पेरणी केलेली दिसते पण दुःखाचे डोंगर पेलतानाही मनाचा अक्रस्थाळेपणा डोके वर काढताना दिसत नाही. हे येथे महत्त्वाचे वाटते.शिवाय आणखी एक गुणवैशिष्ट्य असे की आपल्या भोवतालच्या जगण्याला दुटप्पीपणा सक्षमपणे मांडायचा असेल व नकळत जगण्यातलं व्यंग बाहेर काढायचं असेल तर उपहासाइतके धारदार शस्त्र कोणतेच नाही आणि कवीने नेमके या शास्त्राचा उपयोग अनेक कवितेत सहज व चपखल केलेला दिसतो,जसे-
नित्य नियमित धावून येतो
दुष्काळ कृपाळू मोठा…
किंवा
काळजामध्ये बहरत राहते
वेदनेचे अरण्य दाट…
किंवा
दुष्काळ मात्र गावोगावी
ऐटीत मिरवत राहतो…
किंवा
माह्या बापावर दुष्काळाने
जरा जास्तच केली माया…
या सर्व निसर्ग प्रकोपाला अनुसरून आलेल्या भावना आहेत. तरीपण ज्याच्यावर आपण पूर्ण विश्वास ठेवतो तेथेच आपल्याला धोका बसत असेल तर अशा भावना प्रकट होणे साहजिकच आहे. संग्रहाची काव्यात्मक बांधणी करताना कवीने यमक अलंकाराचा वापर केलेला असला तरी सोबत चेतनागुणोत्ति अलंकारही हजेरी लावताना दिसतो, जसे-
तरणाबांड उभा ऊस
डोळे टवकारून पाहतो..
किंवा
शरमेन मान खाली घालून
एकेक ढग गेला निघून…
सोबत म्हणी,वाक्प्रचारांचा वापरही आशयाच्या दृष्टीने सुंदरपणे करून घेतला आहे आणि हे सर्व कवीला जमायलाच हवं. कारण यातच त्याच्या काव्याचं सौंदर्य उजागर होत असतं.
ज्या घटकांसाठी कवी स्वतःची लेखणी झिजवीत आहे, त्यांच्याकडून काही अपेक्षाही ठेवतो. त्याला वाटते बदल्यात काळानुसार तांड्यानेही स्वतः ही बदल घडवावा, शिक्षणाची कास धरावी,व्यसनाधीनतेला थारा देऊ नये.गरिबी व दारिद्र्यातून आपल्या मुलांना वर काढावे.दारिद्र्यात जगण्याचा तोच तो एकसुरीपणा संपवला पाहिजे या आणि अशा तांड्यातल्या अनेक समस्यांना कायमची मूठमाती मिळावी हीच ‘भूक छळते तेव्हा…’ लेखनामागील भूमिका दिसते.
कवीने कष्टाचा संदर्भ तांड्याशी जोडला हे शतप्रतिशत खरे असले तरी गुन्हा, डफडं,भूक, पोटाची आग सारख्या कविता जर तांड्याचा संदर्भ घेऊन आल्या असतील तर मी त्या मतांशी सहमत नाही.तांडा नेहमीच कष्टाला स्वीकारतो,याचनेला नाही.घामा दामावर विश्वास ठेवणारा हा समाज असल्याने कर्मरेषेला बदलण्याची ताकद तो स्वतः ठेवतो.त्यामुळे नवं जग निर्माण करण्याची, दिशा देण्याची व छळणाऱ्या भुकेलाही शांत करण्याची हिम्मत ठेवूनच तो सदैव जगतो. अशा गोर समाजाचे नेतृत्व करणारा कवीचा बाप तांड्यालाच परिवर्तनाच्या दिशेने नेणारा दिशादर्शक ठरू पाहतो.
कवीला घडविणाऱ्या मायबापावर कवीची अपार निष्ठा असल्याने हे त्यांचे पहिले पुष्प त्यांच्याच चरणी अर्पण केले आहे.जन्मदात्याचे ऋण फेडण्याचा हा अल्पसा प्रयत्न केला आहे असेच दिसते. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नयनचंद्र सरस्वते यांची प्रस्तावना,प्रसिद्ध कवी चंद्रकांत वानखेडे यांची बळ देणारी पाठराखण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंसारख्या सर्वदूर ख्यातकीर्त असणाऱ्यांचा आशीर्वाद या संग्रहास लाभल्याने ते अधिकच महत्त्वपूर्ण ठरते.
समीक्षक- रतन आडे
पुस्तक- भूक छळते तेव्हा…
कवी- संदीप राठोड
प्रकाशन- पारनेर साहित्य साधना मंच
पृष्ठ संख्या- ११२
मूल्य- १५० रु
ReplyForward |