आमचे कवी मित्र यांनी भेट दिलेला त्यांचा नुकताच प्रसिद्ध झालेला आणि सोशल मीडियावर सध्या चर्चेत असलेला त्यांचा.. “भूक छळते तेव्हा…” हा कवितासंग्रह मिळाला मी वाचूनही काढला पण त्यावर लिहिण्यासाठी थोडा वेळ लागला त्या बद्दल क्षमस्व. “भूक छळते तेव्हा… ” हा कवींचा पहिलाच संग्रह आहे नावातच संग्रहाचा सारांश आहे. सर्वांनाच पोट असते सगळ्यांच्याच पोट भरण्याच्या व्यथा असतात हे मुखपृष्ठ आणि संग्रहाच्या नावावरुन सहज दिसून येते.नावाला साजेसं मुखपृष्ठ आकर्षक ठरते हे खास वैशिष्ट्य मला दिसते.
सदरचा संग्रह ज्यांनी जग दाखवलं अंगा-खांद्यावर मुलांना मोठं केलं त्या दैवत आई आणि वडील यांना अर्पण केला ही संग्रहाची खास बाब म्हणण्यापेक्षा उत्तम कर्तव्य कवीने पार पाडले आहे.आता संग्रहाला सुरुवात केली तर समुद्रातील पहिलीच रचना “भूक छळते तेव्हा…” पूर्वपारंपार चालत आलेली गरीबी ही कवींना शापित वाटते ते त्यांचं जीवन फक्त जगण्या पुरतं हे सांगताना कवी म्हणतात…
- रसातळात गाडले गेलेले
- पिढ्यानपिढ्यांचे शापित देह
- करतात केविलवाणी धडपड
- वेदनेला ब्रम्हगाठ बांधून
- कोंडलेल्या असंख्य श्वासांनी
- आवंढा गिळत
- तुडवित राहतात वाटा
- जीव चिमटीत पकडून
- उदरनिर्वाहाचं साधनच
- हिसकावून घेतल्यानंतर…
या रचनेत कवी सौम्य भाषेत समाज व्यवस्थेला जबाबदार धरत असल्याचे जाणवते. दुसऱ्या कवितेत ‘साक्षीदार’ कवी घराचे घरपण व्यक्त करतात. घर कसे उभे राहते आणि घर या शब्दाचा नेमका अर्थ सांगताना कवी म्हणतात…
- माझ्या मातीतल्या बापाने
- मातीचेच बांधले घर
- काळजाच्या करून विटा
- त्याने एक एक रचले थर…
घराचा डोलारा उभा करण्यासाठी बाप नावाच्या व्यक्तीला किती कष्ट सहन करावे लागतात ते आजच्या पिढीने समजून घ्यावे असे वाटते. याच कवितेत कवी पुढे म्हणतात…
- घर म्हणजे फक्त
- नसतात भिंती चार
- अनेक घडामोडींचे
- ते असते साक्षीदार…
घर हे केवळ भिंतींचे नसते,तर त्या घराला भाव-भावना,नातेसंबंध,प्रेम, इतिहास हे सर्व मिळून घर होत असते. तसा संसार तर उघड्यावर ही असतो त्यात नात्यांना एकमेकांत ओवलेले असते, एकमेकांत जीव गुंतलेला असतो पण श्रीमंतीतही भांड्याला भांडं लागून दोन तोंडे विरुद्ध असतील तर ते घर होत नाही फक्त भिंती असतात या कवितेतून हिच भावना उद्धृत होते. पुढील ‘देऊळ’ या कवितेत कवी म्हणतात…
- माय बापाने बांधले
- देवळावाणी घर
- येईल कशी माह्या घराला
- इंद्रपुरीची सर…
भल्या पहाटे आई उठून सडा, सारवण करुन घर मंदिराप्रमाणे ठेवत असे या रचनेतून ग्रामीण कल्पना आणि जीवन अभ्यासता येईल अशीच ही कविता आहे. ‘उसतोडीला जाताना…’ या रचनेत कवी म्हणतात…
- वयोवृद्ध माता पित्याचे
- लागतात डोळे झुरु
- ऊस तोडाया जाण्याची
- होता लगबग सुरू…
सदर रचनेत उसतोड कामगार आणि त्यांचे कुटुंबीय यांचे विदारक चित्र मांडले आहे. घरातील तरुण ऊस तोडीला गेल्यावर वृद्धांची होणारी परवड कवीने छान मांडली आहे.त्यापुढची कविता ‘कष्टाचा हंगाम’ या कवितेत साखर कारखाना आणि ऊसतोड मजुरांच्या संबंधित चित्रण करताना कवी म्हणतात…
- माळरानी जिकडे तिकडे
- कोप्यांनी फुलतो मळा
- रणात उतरते टोळी
- वेदनेचा घोटून गळा…
- याच कवितेत पुढचे कडवे स्फुरण देणारे आहे.
- घामेघूम होतो जीव
- काबाडकष्ट करून
- छाती फुटूस्तोर राबतो
- साठ वर्षांचा तरुण…
‘कोयता’ ही रचनापण मनभावन आहे. ऊस टोळ म्हणजे नक्की काय हे कवीने उत्तमरित्या मांडले आहे. सदर कविता मला उत्तम वाचणीय वाटली पोरं-सोरं पण शाळेच्याआधी कष्ट वाटून घेतात त्यात ऊसतोड पत्नीचं मत छान मांडलेले आहे ते असे…
- राबराबून सुवासिनीला
- मिळेना फुटका मणी
- लाख मोलाचा दागिना
- कष्टत असतो धनी…
- या शिवाय दुसरं काय हवे!!
- ‘कष्टकरी’ या रचनेत हलाखीचे जीवन काय असते ते कवी योग्य पध्दतीने मांडताना दिसतात…
- असतो कोपीत पडून कोणी
- आजाराने ग्रासल्यावर
- वैद्याकडे टाळतो जाणे
- छदाम जवळ नसल्यावर…
‘दास’ ही रचना मन पिळवटून टाकणारी आहे. सदर रचनेत बाप म्हणणाऱ्याचे दुःख काय असते ते समर्थपणे मांडलेले दिसून येते.’इमानी बाप’ या रचनेतील पहिलीच चारोळी मनाचा ठाव घेते.
- कणा कणावर साखरेच्या
- सांडले बापाचे रक्त
- दिसेल तुम्हाला त्यात
- डोळे उघडून बघा फक्त…
‘बळी’ या रचनेत अवसान घातकी पाऊस आणि शेतकरी बळीराजाची परवड सुंदररित्या मांडली आहे.’साकडे ‘ या कवितेत कर्जबाजारी शेतकऱ्याची व्यथा मांडली आहे. त्याची मानसिकता मांडताना कवी म्हणतात…
- काळजीने रातभर
- जीव जळतो वातीचा
- कष्टाळू माझ्या बापासाठी
- जीव तुटतो मातीचा…
पुढे ‘होरपळ’ या रचनेत फिरस्त्याचे जिणे कसे वाट्याला येते ते छान मांडले आहे. कवी म्हणतात नेहमीच्या दुष्काळाने बापावर जरा जास्तच माया केली आणि घरदार सोडावं लागले. ‘आम्ही भटके’ या रचनेत भटके जीवन कवी उद्धृत करतात हे वर्णन केले आहे तेव्हा उचल्या,अक्करमाशी कोल्हाट्याचं पोर अशी भटकंती जीवनावरील आत्मचरित्र नक्कीच डोळ्यांसमोरुन नकळत तरळून जातात.
‘डफडं’ ही कविता अगदीच बालमनावर घाव कोरणारी आहे जिथं लग्न असेल तिथं पोरसवदा वयात भूक भागवायला गेले की कसे तिरस्कारणीय अनुभव येतात ते सांगितले आहे. त्याचबरोबर त्या प्रसंगाचा कवींच्या मनावर खोल परिणाम झाल्याचे दिसून येते…
- रित्या हाताने भूक तेव्हा
- तशीच मागे फिरायची
- मुर्दाडांच्या वस्तीत त्या
- पुन्हा नाही शिरायची…
‘भाकर’ ही रचना संग्रहाला साजेशी किंवा यावरुनच संग्रहाला नाव दिल्याचे जाणवते “भूक छळते तेव्हा…” भाकरीचं महत्त्व काय असते ते त्यालाच माहीत असते ज्याची भाकर भुकेपासून दूर पळत असते.
- वणवण सारे भाकरीसाठी
- उन्हात रोज तळायचो
- कोरडी भाकर मिटक्या मारीत
- अश्रूंसोबत गिळायचो …
या पेक्षा दारिद्र्य ते काय असणार? ‘बुळगं’ या रचनेत गरीबाघरचा सण कशा पद्धतीने साजरा केला जातो त्यासाठी काय काय उपद्व्याप करावे लागतात. वेळप्रसंगी मणी-मंगळसूत्र गहाण ठेवावे लागतात हे दाखवून दिले आहे. रीन काढून सण साजरे केले जातात हे मांडण्याचा प्रयत्न दिसून येतो. ‘भूक’ या रचनेत तान्हुल्याला घेऊन दारोदार भिक मागणारी स्त्री आणि त्याचे चित्रण मनाला भिडते.’संघर्ष करायला शिक’ ही रचना मला विशेष आवडली त्याचं कारण सदर रचना माझ्या पठडीतील आहे. हलकासा विद्रोह त्यातून दिसून येतो.
‘परोपकारी माय’ आणि ‘परोपकारी बाप’ या दोन रचनांतून आईबापांनी जी शिकवण शिकणाऱ्या मुलांना द्यायला हवी ती या रचनांतून मांडले आहे.’माणुसकी तू जप’ या रचनेत बदलते जीवन आणि पूर्वीचे जीवन छान साकारले आहे. बदल ही प्रक्रिया चालू असताना माणसाच्या भावना काय असतात ते उत्तम मांडले आहे. सदर संग्रहात ‘जात’ ही कविता माझ्या मनाला भावणारी आहे मी विद्रोही परिवर्तनवादी विचारांचा असल्याने ही कविता मला विशेष आकर्षित करते सदर रचनेत विवेकी विद्रोह दिसतो तो असा…
- फुशारकी मारणारे
- नामी लावती शक्कल
- पाजे ज्ञान तोच ज्याला
- नसे काडीची अक्कल…
- यातून उलट्या घड्यावर पाणी असं वाटतं पुढील कडव्यात ते लिहितात…
- शोधूनही सापडेना
- बघावया साधा एक
- होत चालली दुर्मिळ
- जात माणसाची नेक…
याच कवितेत ते जातीयवादी पाखंडी लोकांना वडिलांनी हेरले होते आणि त्यांच्यापासून ते कसे चार हात दूर राहिले असे कवीने सुचविलेले दिसते. ‘नवा सूर्य’ ही पण रचना वाचनीय आहे त्यात कवी बापाचा स्वाभिमान उत्कृष्टरित्या मांडताना म्हणतात.
- आयुष्यात पडलेले
- बाप खड्डे बुजवतो
- रोज एक नवा सूर्य
- काळजात रुजवतो…
- लाचारीने कुणापुढे
- नाही झुकवली मान
- माह्या गरीब बापाचा
- मला वाटे अभिमान…
शेवटची रचना ‘दगाबाज’ ही नवतरुणांनी अवश्य समजून घ्यावी अशी आहे. बाप म्हणजे काय ? आणि बाप नसल्यावर काय होते,काय वाटते याचं अप्रतिम वर्णन केले आहे. बाप आणि मुलांचं नातं कसं असतं हे समजून येते.
सदरचा संग्रह मातीतला आहे, काळ्या आईची सेवा करणाऱ्यांचा आहे त्यांचे जिवन, भावविश्व,दारिद्र्य, कष्ट,भटकंती यातून केलेला जीवन प्रवास शब्दाशब्दातून व्यक्त होतोय. खऱ्या अर्थाने ग्रामीण जीवन म्हणजे काय याचा अभ्यास करायचा असेल तर जोडीला हा संग्रह असायलाच हवा असे मला वाटते. सदरचा संग्रह वाचताना मला हे खंडकाव्य वाचतो आहे असे वाटले कारण सुरवातीपासून रचना वाचल्या की लिंक न तुटता दुसरी त्याच ताकदीने आशय घेऊन हजर होते. काही रचना वाचताना मन गलबलून येते.
संग्रहाला साजेसे मुखपृष्ठ आकर्षक आहे ते संग्रहात वाचायला काय मिळणार हे पटकन सांगून जाते. रचना सुटसुटीत, बोलीभाषेत,चारोळी स्वरूपात,दशाक्षरी,अष्टाक्षरी वगैरे आहेत मांडणी उत्तम सुटसुटीत,अक्षर टाईप सहज वाचता येईल असे आहे. तांत्रिक बाबी कागद उत्तम आहे अक्षर मांडणी आणि टाईप यांना शंभर टक्के मार्क्स. सदर संग्रहाला सुपरिचित ज्येष्ठ साहित्यिक आमच्या मित्र परिवारातील अवघड शब्दांचे आगार असणाऱ्या आम्हा मित्र परिवारातील सर्वाच्या मार्गदर्शक डॉ.नयनचंद्र (ताई) सरस्वते यांची दिर्घ आणि यथोचित यथार्थ विवेचन करणारी प्रस्ताविका लाभली आहे. त्यांचा आशीर्वाद असल्याने संग्रहाला यश मिळत आहे हे दिसून येते पुढेही मिळणार हे नक्की.त्याचबरोबर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा शुभ संदेश आहे हे एक प्रकारे संग्रहास ग्रामीण पाठबळच मिळाले आहे. संग्रहाच्या सुरुवातीला…
- मोळ्या वाहता वाहता
- अंगभर घाम फुटे
- काटा टोचता पायाला
- काळजात कळ उठे !
- ही चारोळी संग्रह वाचल्यावर सार्थ ठरते.
-राजू वाघमारे
- ज्येष्ठ समीक्षक
- ——————————-
- संग्रह -भूक छळते तेव्हा…
- कवी- संदीप राठोड
- ९९२२६६३५९५
- प्रकाशक – श्यामकुमार पठाडे
- अक्षर जुळणी- संजय पठाडे
- मुद्रित शोधन- प्रा. विजय लोंढे
- मुद्रक- सोनाली प्रिंटर्स
- मुखपृष्ठ रेखाटने- शीतलकुमार गोरे
- मूल्य- रुपये १५०/-
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
-बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–