Saturday, May 16

वऱ्हाडातील पारंपरिक “जेवणार पाटी” आणि लग्नसंस्कार | जुनी लग्न संस्कृती आणि न्हानोरा परंपरा

वऱ्हाडातील पारंपरिक लग्नसमारंभातील जेवणार पाटी, पंगतीचे जेवण आणि न्हानोरा विधी दर्शविणारे दृश्य

‘जेवणार पाटी’ हा वऱ्हाडातील लग्नसमारंभातील एक पारंपरिक विधी होय, पूर्वी वऱ्हाडाला सोन्याची कऱ्हाड असे म्हणत असत. लग्नसमारंभ म्हटला म्हणजे लगनघरी दणदणाट रहायचा. वेगवेगळ्या पाच झाडाच्या फांद्या आणून हिरवागार ताटव दरवाज्याच्या वरच्या बाजूला बांधून शुभ कार्याची मंगलमय सुरुवात करतात. आंब्याची पाने बांधून त्यावर नैवेद्य व पाणी शिंपडून कुलदैवतेची आराधना करतात. यामध्ये मामाचा सहभाग महत्वाचा असतो. हा ताटव मंगलतेचं प्रतिक समजला जातो. लगनघरी बंबाट मज्जा पावणे रावणे कुरोळीणा नटून थटून धमाल उडवून देतात. पूर्वीच्या काळी आठ आठ दिवस पावणे रावणे अगोदरच लगनघरी यायचे.

एकमेकांना धान्य निवडण्यापासून तर लग्न वारासार होईपर्यंत मदत करू लागायचे. प्रसंगी आजूबाजूच्या घरून कोटया मागवून त्या पाण्याने स्वच्छ धुवून धोतराच्या पांढऱ्या शुभ्र कापडाने बांधून भरून ठेवायचे.लगनानंतरही भांडे,चमचे गिल्लास मोजणे,बकेटा, गाद्या मोजून देतांना मोठी गंमत असायची. आमच्या घरी पूर्वी पावण्यांनी लेकराबाकरांनी घर गजबजून जायचं. एकाचा आवाज एकाला यायचा नाही. मस्त दोन्ही हातावर सुंदर मेहंदी रंगविण्यात यायची. त्याचा सुंदर मस्त घमघमाट दरवळायचा. मन प्रसन्न व्हायचं. तो सुगंध अजूनही माझ्या मनात दरवळतो आहे.

झोपलेल्या वऱ्हाडाच्या तोंडावर मेंदीची मिशी काढणे असे मजाकीचे प्रकार चालायचे. आता ही जेवणार पाटी म्हणजे ज्यामध्ये वधू-वराच्या कुटुंबातील मंडळी एकत्रीत मस्त मांडवात पाणी शिंपडून अंथरलेल्या तडवावर बसून जेवणार पाटीची तयारी करतात. यात महिला ही जेवणार पाटी भरतात.नवीन करदोडयाच्या साह्याने ही पाटी व कोरी ज्वारीची धांडे खोपडी करून व्यवस्थित बांधली जातात.

मस्त बाजारातून आणलेल्या कोऱ्या पाटीची व पाच ज्वारीच्या धांडयाची पाच कुळातील वेगवेगळ्या पाच लोकांच्या हाताने पुजा करून त्या पाटीत नैवेद्य म्हणून पाच पोळ्या, दहीभात, वरणभात, वेगवेगळ्या भाज्या ज्यामध्ये अंबाडीची भाजी अग्रस्थानी रहायची.आमटी,खीर,कढी,उडीदाच्या दाळीचे मस्त खमंग वडे,कुरोळया,भजे धान्य मांडतांना दिसतात. नंतर दिवा लावून ही पाटी घोंगडयांनं झाकून घेतात. यात पेटवलेला दिवा नवरा मुलगा वा नवरी मुलगी यांनी बघायचा नसतो. नंतर ही पाटी हळदीच्या निमित्ताने जमलेल्या आप्त परिवार इष्ट मित्र, नातेवाईक , गावकरी यांच्या सोबतीने गावाच्या बाहेर गोठाणावर असलेल्या गाव दैवताजवळ वाजतगाजत नेतात. तेथे पुजा करून नारळ फोडला जातो. याच कारण म्हणजे आमच्या घरी असणाऱ्या या शुभ कार्याला व्यवस्थित पार पडू दे असं देवाला या माध्यमातून साकळं वा आर्जव, विनंती हा प्रकार पूर्वजांनी घालून दिलेला आहे.मस्त गप्पा टप्पा चुलीवरच्या किंवा जमीनीवर खोदलेल्या अळी वरच्या स्वादिष्ट जेवणाचा यथेच्छ आनंद घेतात.

लग्नाच्या आदल्या दिवसी म्हणजे हळदीच्या लग्नाच्या दिवशी, प्रेमाची माणसे आणि नातेवाईक यांच्यासोबत पंगतीला बसून जेवणाची ही खास परंपरा वऱ्हाडात अजूनही अस्तित्वात आहे आहे, जिथे सगळे पावणे,लावणे एकत्रित येऊन हा लग्नसमारंभ आपला समजून शुभ कार्य गुण्यागोविंदाने निभावून नेतात.

न्हानोरा-

लगनघरी यातील महत्त्वाचा भाग म्हणजे न्हानोरा होय. मस्त कुंभाराच्या घरून मातीची गाडगी मडकी सुगळे ,देवकुंडीचे माठ गंगाळ,रांजणं आणून ती अंगणात मांडली जात. जवळचे नातेवाईक नवरा मुलगा किंवा नवरी मुलगी लाकडी पिळयावर बसवून मस्त बाया न्हाऊन, धुवून एकमेकांच्या अंगावर पाणी शिंपडून ओले करतांना पयतांना जी धावपळ व्हायची.नवरा,नवरी पाण्याच्या गुळण्या एकमेकांच्या चेहऱ्यावर मारायची गंमत आम्ही निरखून बघायचो‌.त्याची मजा मंगलकार्यातील लग्नाला नाही. एटायातले सगळे जमा व्हायचे. मस्त बकेटीनं रांजनातल्या थंडगार पाण्याने एकमेकांना ओले करायचे. थंडगार देवकुंडीची स्थापना व्हायची. धान्याची हिरवीगार रोपे तरारून उठायची. मावसा,मावशी टोपी कुऱ्हाड व पदराची गाठ बांधून कुंभाराच्या घरी जाऊन पुजा करून यायचे. हातात हळदीच्या पिवळ्या रंगाचे काकन बांधल्या जायचे.

जेवणार पाटीचे वैशिष्ट्य-

पारंपरिक पंगत:

नंतर नट्टापट्टा सोडून सारे एकत्रीत येऊन कणीक भिजवून भाज्या चिरून भांडी स्वच्छ करून जेवणाच्या तयारीला लागायचे.अळणी खोदायचे, लाकडं पेटवायचे. हा स्वयंपाक करतांना धुपटानं लायशेंबुळ एक होऊन सारा घाम अंगातून पाझरायचा. मस्त रांगोळी काढलेल्या जमिनीवर पाणी शिंपडून पानावर पत्रावळीच्या हिरवागार पानावर बसून जेवणे म्हणजे वेगळा आनंद यायचा.

कौटुंबिक मिलन- जवळचे नातेवाईक आणि मित्रमैत्रिणी त्यानिमित्ताने एकत्र येतात. एकमेकांच्या सुखादुखात सहभागी होतात. गुण्यागोविंदाने हे शुभ कार्य पार पाडतात.

हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा

उन्हाच्या घामाच्या धारा, मस्त गरमागरम वांग्याची किंवा पातोळीची भाजी घटवट घरच्या तुरीच्या दाळीचं निंबर वरण वरतून लिंबू फसकलास बेत असायचा.जीव पाणीपाणी करायचा.साधंसुधं पण झणझणीत स्वादिष्ट जेवण लग्नातील खास जेवणाची मेजवानी असायची. जेवणासोबत गाणी, धमाल-मस्ती आणि गप्पांचा कार्यक्रम.
या कार्यक्रमामुळे लग्नातील आनंदाचे वातावरण अधिकच सुंदर वाटायचे.आणि आपापसातील संबंध दृढ होण्यासाठी खास लग्न समारंभ रहायचे .कोरडा देखावा यामध्ये नसायचा.


लग्नात पंगतीचे जेवण सगळ्यांसोबत ऐसपैस बसून आणि प्रत्येक पदार्थावर ताव मारत जेवण करायचे. फक्त पंगत पद्धतीत. व्यवस्थित वाढलेले पान आणि त्या भोवती शिपडलेले पाणी व पत्रावळीवर विस्तव ठेवून काढलेली अंगारी वेगळीच मज्जा यायची.


जेवणार पाटी हे सगळे कार्यक्रम मस्तपैकी पार पडले आणि त्यानंतर संध्याकाळी उरलंसुरलं मस्त पंगत बसून गप्पाटप्पा पानसुपारीची देवघेव व जमीनीवर तडव टाकून झोपायची व्यवस्था केली जायची.सकाळी झोपेतून उठल्यावर तमरेट घेऊन नदीकाठी जायची मज्जा वेगळी होती. या विषयी कोणाचीही कुरबुर वा तक्रार नसायची.निदान लगनघरी मस्त वातावरण निर्मिती व्हायची.

कापडी मांडवातील लग्न-

त्याकाळी नवऱ्या मुलीच्या दारात मांडव घालून लग्ने व्हायची. हीच लग्नाची खासीयत होती.मुहूर्तमेढ, तोरण बांधण्याच्या कार्यक्रमासाठी आलेल्या बायकांना पानसुपारीचा विळा दिला व अक्षद वाटली जायची. लग्नाच्या जेवणासाठी लग्नघरात जमलेली पाहुणे मंडळी, जवळचे शेजारी,पाजारी किंवा कौटुंबिक मित्र असत. लग्नाच्या दिवशी सकाळी हळदीच्या वेळी, चिवडालाडूचा नाश्ता सर्व पाहुणे मंडळीना दिला जायचा.नाश्त्याचे ताजे पदार्थ द्यायची पद्धत तेव्हा नव्हती. अक्षता पडायच्या अगोदर नवरदेव, त्याची आई, वडील, भाऊ, बहीण यांच्यासाठी रुखवाताचे जेवण करायची पद्धत होती. त्यात भल्यामोठ्या करंज्या, चकल्या, अनारसे, दुधाची खीर आणि लाडू वाढायची मज्जा येई.

तर लग्नाच्या मुख्य जेवणात ताटात पदार्थाची रेलचेल असायची.बाजूला खोबऱ्याची चटणी, ताज्या कैरीचे लोणचं, कोशिंबीर, लिंबू. वांगे-बटाट्याची भाजी, आमटी आणि शेव ,भजे वरणभात मसालेभात वाढला जायचा. त्यानंतर लग्नाचे पक्वान्न म्हणजे जिलेबी किंवा बुंदीचे लाडू रहायचे. जिलेबी किंवा मठ्ठाही ताकाचा थंडगार असायचा दोनतीन वाटया रिचवूनच मनाची शांती व्हायची.आणि शेवटी परत पांढरा भात, त्यावर दही किंवा ताक वाढत.‌ पंगतीला घरची यजमानीण तूप वाढायचा आग्रह करायची.. नवरा-नवरी आग्रहाने पक्वान्ने वाढली जायची.

पाहुणेमंडळींमधील काहीजण पैज किंवा शर्यत लावून पोटभरून पक्वान्ने खायची.‌ अशा‌ पंगतीत माणसं श्लोक म्हणून वातावरण प्रसन्न करायचे. मोठ्या ओसरीत, लांबलचक चटया अंथरून किंवा पाट मांडून पत्रावळीवर किंवा केळीच्या पानांवर पंगती बसवायची मज्जा काही औरच होती .मंडपातील पानांभोवती मस्त रांगोळ्या काढलेल्या असायच्या. दहा-बारा पानांच्यामध्ये बटाट्यात उदबत्त्या खोचल्या जायच्या. त्याचा सुगंध छान दरवळायचा यामध्ये नवरा-नवरीची पंगत महत्वाची असायची. पावणे गावी जातांना त्यांच्या सोबत आस्थेनं शिदोरी देण्याची परंपरा अस्तित्वात होती. यामध्ये प्रेम, जिव्हाळा जिवंत असण्याचं लक्षण समजल्या जायचं.आता काळ बदलला हल्ली या मांडवाऐवजी मंगलकार्यातील भंपकपणा व बडेजाव व हळदीतील धिंगाणा एकाच रंगाची शर्ट, सगळ्याची कापडं महागडी संगित मेजवानी असूनही ती मज्जा येणे नाही हेही तितकच खरं.

विजय जय्सिंग्पुरे

प्रा. विजय जयसिंगपुरे

अमरावती

भ्रमणध्वनी- ९८५०४४७६१९

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.