📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

गावाकडच्या “बाजा”ची आठवण | हरवत चाललेली ग्रामीण परंपरा आणि एकत्र कुटुंबाची कहाणी

On: May 3, 2026 8:53 PM
आम्हाला फॉलो करा:
गावातील अंगणात नारळाच्या दोरीने विणलेल्या पारंपरिक बाजा (खाट) वर झोपलेले कुटुंब, पार्श्वभूमीला चांदण्यांनी भरलेले आकाश
गावातील अंगणात नारळाच्या दोरीने विणलेल्या पारंपरिक बाजा (खाट) वर झोपलेले कुटुंब, पार्श्वभूमीला चांदण्यांनी भरलेले आकाश

आमच्या भल्या मोठ्या अंगणात शेतीचं सामानसुमान, अडगळ,फाटा,वरवंटा,उखळ,जातं तुरीच्या कनोराची पोती काही धान्याच्या मातेराची पोती पडलेली असायची. त्यात विशेष भर म्हणजे या बाजांची असायची. ‌बाज हा प्रकार सर्रास अजूनही खेड्यात बघायला मिळतो. आमचं एकत्र मोठं कुटुंब असल्याने व सभासद संख्या जास्त असल्याने झोपायची चांगलीच पंचाईत होती. पावसाळयात आम्ही माडीवर सातऱ्या वाकया घेऊन निजायला जायचो. एकत्र कुटुंबात तीन आत्या,आबा,आजी दोन काका त्यांच्या बायका लेकरं,बाकरं, भरपूर ढोरंवासरं असं खंडीभर कुटुंब नक्कीच होतं. प्रत्येकाची कामं वाटून देलेली होती. त्यामुळे कुरबुरीला जागा नव्हती. कोणी भांडे घासायचं तर कोणी इंधनफाटा आणायचं तर कोणी जनावरांचा शेणपवटा,झाडझूड करायचं. कोणी बाजारहाट करून ढोरं चारायचं. तर कोणी खटल्यात हप्त्यावारी कामाला असायचं. त्यामुळे व्यवस्थीत कुटुंब चालायचं.

आमच्या मोठ्या अंगणात आम्ही ह्या नारळाच्या दोरीपासून विणलेल्या बाजा एका ओळीनं टाकायचो. काही बाजा उन्हानं काऊर आल्यानं त्या सरक्या करण्यासाठी भलकशी कसरत करा लागायची. एक गात सरकं झालं की दुसरं दात इचकायचं.इकडून तिकडून दाबून बाजलं सरकं करायचं. त्यात उन्हायाच्या दिवसात रात्रीची गरमी वज्जर असायची.काही लोकं घराच्या छतावर वाट ओट्यावर वाट बैलगाड्यांवर निजायची. मच्छरांचं साम्राज्य तेव्हा एवढं नव्हतं. त्यामुळे गार वाऱ्याच्या झुळकीत मस्त झोप यायची. संध्याकाळची जेवणं झाली म्हणजे सातऱ्या टाकून त्यावर मस्त तमरेटानं थंडगार पाणी शिंपडून थंड वातावरणात आकाशातील चांदण्या,बुढीच्या खाटल्याची मजा बघत भुताखेताच्या गोष्टी ऐकत मस्त झोपी जायचं. भुताखेताच्या गोष्टीनं माहयी चांगलीच फाटारायची. म्हणून मी अगदी मधात आबाला बिलगून,कमरेला पायाचा विळखा घालून मस्त निजायचो.एवढी की रातची सू लागली म्हणजे एकटं उठायला जीव भ्यायचा. अंधार बघून जीव दचकायचा. अशावेळी आबा किंवा आजीला कंदिल सोबत घेऊन जाण्याशिवाय पर्याय नसायचा. ह्या बाजा प्रत्येकाच्या अंगणात हमखास असायच्या.

आमच्या गावात मारवाडयाचं किराणा दुकान होतं. त्या दुकानात नारळाची दोरी विस रूपयात किलोभर मिळायची. बाजा विणणे हा ग्रामीण भागातील एक पारंपरिक, मेहनतीची आणि कलात्मक कुसरीचा प्रकार होता. प्रत्येकाला तो जमायचा नाही. प्रामुख्याने सुतळी किंवा नायलॉनच्या दोरीने खाट विणण्यासाठी वापरली जायची.चिचोरी, पाटोडी आणि रुमाली अशा विविध प्रकारांत हया बाजा विणल्या जायच्या. ही कला परंपरा, मेहनत आणि कष्टाची असायची, तसेच आजच्या काळात यातून रोजगाराची उत्तम संधीही निर्माण झाली आहे. पंरतु आता आधुनिक काळात नवनवीन आधुनिक तंत्रज्ञान, फर्निचर,सोफे,दिवान त्यामुळे बाजा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.बाज विणण्याचे मुख्य प्रकार होते.चिचोरी म्हणजे चिंचोक्याच्या आकाराची जाळी असलेली लहान विण.पाटोडी म्हणजे बेसनाच्या पाटोड्यांसारखी मोठी आणि जाड विण असायची.तर रुमाली म्हणजे दाट जाळीदार आणि अत्यंत कलात्मक विण असायची.

बाज विणण्यात विणकामाची वेगळीच वैशिष्ट्ये होती.यात साहित्य म्हणजे प्रामुख्याने मजबूत सुतळी किंवा रंगीत नायलॉन दोरीचा किंवा चौपदरी नऊवारीचा वापर यामध्ये असायचा. खाटेच्या लाकडी चौकटीवर विशिष्ट गाठी मारून ही कलाकुसर बघायला मिळायची. बाज विणणारा गाव कामगाराला गावात विशेष मान होता. ज्यासाठी उत्तम कारागिरी लागायची. ह्या बाजीचा उपयोग म्हणजे विश्रांतीसाठी आरामदायी खाटा, बाळ बाळंतीणीसाठी , तसेच अंगणात साप,विंचु यापासून संरक्षण म्हणून केल्या जायचा. आमच्या गावात धडधाकट सहा फुटाचा शेजव बुढा होता. तो ही कष्टाची,मेहनतीची कामे करायचा. दुरून दुरून त्याला निरूपं असायची. मोठमोठ्या खटल्यातील लोकं बुढया आवर्जून बोलावून न्यायची व त्याबद्दल्यात पायली दोन पायल्या धान्य त्याच्या दुपपटयात बांधायची. ही गावकीची कामे ही मंडळी इमान इतबारे करायची. त्यामध्ये कामचुकारपणा वा स्वार्थी, मतलबीपणा मुळीच नसायचा. तुम्ही जे द्याल ते निमुटपणे स्विकारण्याची अल्पसंतुष्टपणा या कारगिरांमध्ये होता.घरादारातील लोकाचं पोट भरणं बस एवढाच एकमेव मार्ग त्यांच्यापुढे होता.फार मोठी कमाई करून बक्कळ पैसा गोळा करायचा. ही भावना त्यांच्यामध्ये नव्हती. म्हणून तर ही मंडळी निरोगी व आरोग्य संपन्न होती. छलकपट गुण माणसाला आजारी पाडतो. हा गुण त्या लोकांमध्ये नव्हता. आताची लोकं खुप विचित्र आहेत. पैसा,अडका असेल पण भावना मेली आहे. तशी ही लोकं भावनाशून्य नव्हती.

आमच्या घरी शेजव बुढा आला म्हणजे मोठी काठी टेकवत टेकवत यायचा. नारळाच्या दोरीची बंडलं पाण्यात मुरू घालायचा. नंतर त्याला पिळू घालून मस्त बाज विणून त्याला सुंदर आकार द्यायचा. आम्ही ही कला मस्त तासनतास निरखून बघायचो. बाज विणली म्हणजे आई भाकरीचा तुकडा व पाणी फिरवायची.नंतर दुपारून आई शेजव बुढयाला मोठी जाडजूड भाकर व भाजी सोबत कांदा,चटणी द्यायची.कधी चुलीच्या आरावर लालसर खमंग पापड भाजून द्यायची.भुकेनं कासावीस झालेला बुढा अंगणात बसून मस्त हातानं भाकर खायचा. डकाडका तवलीनं पाणी प्यायचा.पाच दहा रूपये गयात असलेल्या दुप्पटयात पैसे कनवटीला बांधायचा. कधी आजी जलमरचा गडवा भरून थंडगार ताक प्यायला द्यायची. इतर वेळी बुढा ढोरं चारायचा. किंवा मुसके, चऱ्हाटे, बकरीच्या अग्गळ्या तयार करायचा. दिवसभराच्या टिनाच्या सपरीत तो काहीना काही कामात गढून गेलेला असायचा.

बुढयाजोळ मोठी हळदीनं झालेली पिवळीसडक काठी व मोठा काळा गुळगुळीत गोटा होता. त्याचा उपयोग नवीन गोऱ्हे उबारून द्यायचा. गोऱ्हे उबारून देणे म्हणजे त्याला बैलाचं स्वरूप देणे. गोऱ्हयांचं अंडकोष काठीवर दगडाने ठेचून त्या गाठी निर्जीव केल्या जायच्या. तेव्हा आताच्या सारखी कैची देणारी पशुवैद्यकीय दवाखाने वगैरे नसायची. त्यामुळे ही गावठी कला कामात यायची. यामध्ये जनावरांना खुप त्रास सोसावा लागायचा. जेणेकरून त्याची प्रजनन क्षमता मरून तो गोऱ्हा शेतीच्या उपयोगात आणल्या जायचा. त्याची मस्ती गळून पडायची. मग तो निमूटपणे शेतीची कामे करायचा. म्हणजे तो बैल म्हटल्या जायचा. त्याबदल्यात त्याला गावातून धान्याचा पुरवठा व्हायचा. ही गावकीची कामे करणारी मंडळी उपाशीतापाशी नसायची.गाव त्यांची आस्थेनं काळजी घ्यायचा. कोणीही उसनंपासनं धान्य देऊन त्यांचं काम भागवायचा. त्यामुळे त्यांना कशाचीही चिंता नसायची‌. मोठमोठ्या खटल्यातील लोकं त्यांची आवभगत करून त्यांना पाहिजे तो पैसा अडका,पसाभर धान्य देऊन त्यांचा वर्षभर सांभाळ करायची. तर कधी त्यांच्या लेकराबाकरांच्या लग्नकार्यात धान्य,पैसाअडका उसनंपासनं करून धावून पडायची.

विजय जय्सिंग्पुरे

अमरावती

भ्रमणध्वनी-९८५०४४७६१९

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now