📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

गावाकडची आठवण ! एक आपुलकीचा पूर…!

On: April 30, 2026 12:32 PM
आम्हाला फॉलो करा:
"गावाकडची आठवण – जांब नदीचा पूर आणि बालपणीच्या आनंददायी क्षणांचा दृश्य"
"जांब नदीचा पूर पाहणारी गावातील मुले आणि पावसाळ्यातील निसर्ग"

धो धो पाऊस कोसळला कि आमच्या जांब नदीचा पूर पाहून डोळ्यांचं पारणं फिटायचं.खरं तर माझ्या गावची जांब नदी जेव्हा दुथडी भरून व्हायची तेव्हा तिचं रूप काही औरच असायचं.पुराचं पाणी खाली मऱ्हळकडे वाहत जायचं.पुराचं पाणी म्हणजे जणू चहाच्या किटल्याच नदीत आणून ओतल्या आहेत असं वाटायचं नि विस्तीर्ण अशी ती जलक्रीडा बघायला खूप आनंद मिळायचा.त्या आनंदाला पारावार राहायचा नाही.पूर बघयाला जाणं ही माझ्यासाठी नाही तर गावातल्या सर्वांनाच एक मोठी पर्वणी असायची.’ पूर आलाय रे ….’ अशी एकदा का आरोळी घुमली कि गावातले शौकीन अर्थात माझ्यासारखे ,सर्वच नदीचा पूर बघायला छत्र्या, घोंगड्या घेऊन जमायचे.किती पाणी आलंय, कोणत्या पट्ट्यात जादा पाऊस झालाय,आणखी हे पाणी खाली कुठपर्यंत जाणार याबद्दलचे अनेक अंदाज जमलेले लोक बांधत. तंबाखू मळता मळता लोकांच्या गप्पा पुराच्या पाण्याच्या आवाजात मिसळून जात असायच्या.आणि आम्ही लोकांच्या या गप्पा अगदी कानात प्राण आणून ऐकत असायचो.हे ऐकताना फार गंमत वाटायची.हे सर्व किती हुशार आहेत असंही वाटायचं.


गावात आमचा चिल्लर पार्टीचा खूप मोठा ग्रुप असायचा.नदीला पूर आलाय हे समजताच आहे त्या अवतारात पुलावरून तर कधी महादेवाच्या देवळामागून पूर बघायला आम्ही सर्वजण जमायचो.पाण्याचा कानठिळ्या बसवणारा मोठा भीतीदायक आवाजही खूप आवडायचा.पाण्यासोबत वाहत आलेले भले मोठे सापही नजरेस पडत असायचे.ते बघून पोटात धस्स व्हायचं पण तरी घरी निघून जावं असं मात्र अजिबातच वाटत नसायचं.उलट पाण्यात पाय किंवा हात घालण्याचा मोह अनावर होत असायचा.अशावेळी गावातले जाणकर लोक आमच्या अंगावर दातओठ खात यायचे.पण त्याचं काहीच वाईट वाटायचं नाही.त्यांचं इतकं बारीक लक्ष असूनही हळूच डोळा चुकवून आम्ही पाय किंवा हात थोडा तरी पाण्यात घालवून मोठं स्वर्गसुख मिळवलेलं असायचं.पण या सुखात विरजण पडायचं ते मोठ्या बहिणीला आमच्याकडे काठी घेऊन येताना बघितल्यावर ! नदीला पूर आलाय नि मी पुर बघायला आलेय हे तिला समजलं की भली मोठी काठी घेऊन इतक्या गर्दीत माझा माग काढत यायचीच.तिला बघून पोटात भीतीनं मोठा गोळा यायचा.खूप भीती वाटायची कारण ती काठी घेऊन पाणी देखाव्यात व्यत्यय आणायला यायची.

मला घरचा रस्ता दाखवायची.जर काठीच्या धाकानं मी ऐकलंच नाही तर आणलेल्या काठीचा पुरेपूर अगदी मन भरेपर्यंत ती वापर करायची.हा वापर माझ्या एकटीवरच नाही तर भावावर देखील व्हायचा.आम्ही दोघं समदुःखी एकमेकांचं सांत्वन करत आणि गपगुमान घरचा रस्ता धरायचो इच्छा नसताना.त्यावेळी आपल्याला मोठी बहीण असल्याचं मनातून दुःखं वाटायचं.ज्यांना ताईसारखी मोठी बहीण नाही त्यांच्याबद्दल प्रचंड हेवा वाटायचा. ताईला मात्र मोठं युद्ध जिंकल्यासारखं वाटायचं.तिचा हा विजयी आनंद फार काळ टिकून देणाऱ्यांपैकी आम्ही नव्हतोच मुळी.घराच्या उंबऱ्याला पाय लावून नि बाईच्या मनभरून शिव्या खाऊन आम्ही पुन्हा पुराकडं आलेलो असायचो.तेव्हा ताईला आमचा प्रचंड राग यायचा.ती पुनःपुन्हा काठी घेऊन यायची नि आम्ही पण हटायचो नाही.अशी ही ताईसाठी कटकट नि आमची गंमत बघणाऱ्यांसाठी मोठं मनोरंजन असायचं.

नदीला पूर आलाय हे समजताच नायकाचा बबन मासे पकडण्यासाठी आतुर असायचा.जेव्हा तो मासे धरायचा तेव्हा आम्हाला खूप मजा वाटायची.त्याच्या मासे पकडण्याच्या कामात त्याचे कुटुंबही त्याला मदत करायचे.चांदीसारखे चमचमणारे मासे बघून भलतंच भारी वाटायचं.कितीतरी वेळ ताटकळत मासे पकडण्याचा तो मजेशीर कार्यक्रम बघायचो.अगदी त्यांनी आम्हाला तिथून हाकलवून देईपर्यंत.बबन कितीतरी मासे पकडून मोठया पातेल्यात घरी घेऊन जायचा.त्यावेळी त्याच्या कुटुंबाचा आनंद ओसंडून वाहत असायचा.बबनने जर थोडे जास्तच मासे पकडलेच तर तो मासे खाणाऱ्या गावातल्या लोकांना कमी पैशांत विकायचा.त्यातले बरेच लोक मासे घेऊन घरी पैसे आणायला जायचे तर ते थेट पुढचा पूर बघायलाच हजर व्हायचे.तोपर्यंत बिचारा बबन पुन्हा मासे पकडण्याच्या नादात मागील वेळचं घेणं चक्क विसरून गेलेला असायचा.इतकंच नाही तर मागच्या वेळी पैसे न देता मासे नेलेल्यांना तो पुन्हा मासे द्यायचा.अर्थात जे लोक बबनकडून पैसे न देता मासे न्यायचे त्या बदल्यात बबनला गहू ,बाजरी किंवा जे काही शक्य आहे ते वर्षभरात देत असायचे.असा हा गावातल्या लोकांचा निःस्वार्थी माया,आपुलकीनं भरलेला व्यवहार चालायचा.पुराच्या पाण्याची पातळी वाढली तर बऱ्याचदा पुलावरून पाणी वाहायचे.तेव्हा खळवाडीतल्या लोकांना गावात यायचे असेल नि गावातल्या लोकांना खळवाडीत जायचे असेल तर खूप मोठी पंचाईत व्हायची.त्यावेळी गावातले काही धाडशी तरुण दोन्ही बाजूच्या इच्छुक लोकांना पुलावरून वाहणाऱ्या भयंकर पाण्यातून माग काढत मोठ्या काळजीनं सोडवायचे.यात त्या तरुणांना खूप समाधान वाटायचं.

कधी नव्हे ते त्यांना असं धाडस दाखवायला मिळायचं.खरं तर त्यांना यावेळी राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत विजय मिळवल्यासारखं वाटायचं.नि बघणाऱ्यांना मोठं कौतुक.त्यातल्या त्यात पुराचा दिवस जर शुक्रवारचा म्हणजे बाजारचा दिवस असला तर बाजारवरून येणाऱ्या लोकांची खूप तारांबळ उडायची.मग भाऊ दादा करत बाजारच्या पिशव्या सावरत लोक पुलावरून यायचे.तिथं असलेले तरुणही कुठलेही आढेवेढे न घेता मोठ्या काळजीनं लोकांना पूल पार करून देत असायचे.कधी कधी तर म्हाताऱ्यांना पाठकुळी देखील बसवून नेले जायचे.हा आहे माझ्या गावाकडच्या माणसाच्या मनातील पुरापेक्षाही धो धो अखंड वाहणारा प्रेमाचा,मायेचा झरा!अशा कितीतरी सुखद आठवणी माझ्या कनकोरी गावानं दिल्या आहेत.आणि जेव्हा असा हा गावाकडचा आठवणीतला पूर आठवतो तेव्हा आपोआप डोळ्यांत पूर कधी साचतो हे कळतही नाही ! अन डोळ्यांच्या कडा तुडुंब भरतात अगदी पुरापेक्षाही जास्त!

Mangal Sangale

डॉ. मंगल सांगळे
लेखिका व कवयित्री
कोषाध्यक्ष मसाप सिन्नर, पत्रकार, संचालिका तरुप्रीत प्रकल्प
मराठी विभाग प्रमुख व राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी, के. व्ही. एन. नाईक महाविद्यालय सिन्नर

📺 Gaurav Prakashan News YouTube

ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि विशेष व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला आजच Subscribe करा.

🔴 Subscribe Now

धन्यवाद! तुमचा एक Subscribe आम्हाला अधिक चांगल्या बातम्या देण्यासाठी प्रेरणा देतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now