Wednesday, December 3

मेळघाटातील घुंगरू बाजार; परंपरेचा थाट, नात्यांचा उत्सव आणि माणुसकीचा सोहळा!

“मेळघाटातील घुंगरू बाजारात गोंड समाजाचे पारंपरिक नृत्य करताना आदिवासी पुरुष व महिला”

अमरावती : जिल्ह्यातील अतिदुर्गम मेळघाट भागात दरवर्षी दिवाळीनंतर एक अनोखा बाजार भरतो. हा बाजार केवळ खरेदी-विक्रीचं ठिकाण नाही, तर प्रेम, परंपरा आणि संस्कृतीचा जिवंत मेळा आहे. स्थानिक गोंड आणि आदिवासी समाज या बाजाराला प्रेमानं “घुंगरू बाजार” किंवा “थाट्या बाजार” म्हणून ओळखतात.

दिवाळीनंतरच्या पहिल्या आठवडी बुधवारी हरिसाल, धारणी, सेमाडोह, कोल्हा आदी भागांमध्ये हा बाजार भरतो. पांढरा सदरा, धोतर, कवड्यांची माळ, आणि डोक्यावर पक्ष्यांच्या पिसांनी सजविलेली पगडी परिधान केलेली गोंड मंडळी ढोलकीच्या तालावर आणि घुंगरांच्या नादात नाचत बाजारात फिरतात. बांबूपासून तयार केलेल्या बासऱ्यांचे सूर आणि म्हशीच्या शिंगापासून तयार केलेल्या फुंक्यांचे आवाज संपूर्ण बाजारभर घुमत राहतात. या नादात मिसळलेली रंगीबेरंगी माणसं मेळघाटाच्या संस्कृतीचं जिवंत दर्शन घडवतात.

या दिवशी लोक वर्षभरातील शेतीमाल विक्रीतून मिळालेल्या उत्पन्नातून कडधान्ये, नवे कपडे, शृंगारसामग्री, घरगुती वस्तू अशी आवश्यक खरेदी करतात. महागड्या वस्तू नसल्या तरी लोकांच्या चेहऱ्यावर समाधान झळकतं. व्यापारी सुद्धा या समाजाला परवडतील अशा वस्तू घेऊन येतात. त्यामुळे घुंगरू बाजार हा केवळ आर्थिक व्यवहाराचा नव्हे, तर आनंद आणि समाधानाचा दिवस ठरतो.

या बाजारात विवाहयोग्य तरुण-तरुणींचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो. नटूनथटून आलेली ही तरुण मंडळी एकमेकांना भेटतात, बोलतात आणि अनेकदा याच घुंगरू बाजारातून विवाह जुळतात. निसर्गाच्या साक्षीने जुळलेली ही नाती म्हणजे या बाजाराचं खास वैशिष्ट्य. परंपरेचा आणि प्रेमाचा असा संगम इतरत्र दुर्मिळच पाहायला मिळतो.

विकासापासून कोसो दूर असलेल्या मेळघाटाने आपली संस्कृती, बोलीभाषा आणि लोकपरंपरा आजही जपून ठेवली आहे. घुंगरू बाजार हे त्या संस्कृतीचं प्रतीक आहे. या समाजातील लोकांनी भौतिक सुखांची ओढ न धरता निसर्गाशी नाळ जपली आहे. विपरीत परिस्थितीतही जीवन आनंदात कसं जगायचं, हे हे लोक नकळत शिकवून जातात.

स्थानिक वऱ्हाडी साहित्यिक आबासाहेब कडू सांगतात, “घुंगरू बाजार हा फक्त एक बाजार नाही, तर नात्यांचा सोहळा आहे. माणसाने माणसाशी भेटायला, बोलायला, एकत्र हसायला हेच निमित्त आहे.” आजच्या आभासी जगात जिथं नात्यांमधली ऊब हरवत चालली आहे, तिथं मेळघाटातील घुंगरू बाजार हा माणुसकीचा खरा उत्सव ठरतो.

Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणेबंडूकुमार धवणे – संपादक, गौरव प्रकाशन, अमरावती. 2007 पासून पत्रकारिता, साहित्य प्रकाशन, कथा, कविता, कादंबरी आणि ग्रामीण-शहरी घडामोडींवर लेखन. www.gauravprakashan.com चे संस्थापक व संपादक.