आमची लक्ष्मी.!

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

आमची लक्ष्मी..!

अंगणातल्या चिंचेखाली बांधलेली आमची लक्ष्मी दावणीला हिसका देऊन ओरडायला लागली की,मी पटकन दप्तर काढून पुस्तक हातात धरून बसायचो.माझ्यासोबत माझ्या चारही बहिणी बसायच्या.तेवढ्यात इतक्या घाईने आमची आई टीव्ही बंद करायची आणि बाहेरच्या छपरात चुलीजवळ जाऊन बसायची.एका क्षणात सुरू असलेला सगळा दंगा बंद व्हायचा आणि जणू काही या घरात सात पिढ्यापासून कसलाच आवाज नाही अशी शांतता व्हायची.

ही अंगणात चिंचेखाली बांधलेली आमची लाडकी म्हैस.आणि ही दावणीला हिसका देऊन ओरडायला लागली की समजून जायचं आमचे वडील आले.वडिलांना आम्ही सगळेच घाबरायचो.त्यांनी कधी माझ्यावर हात उचलला नाही.पण भिती तेव्हा होती ती आजही आहेच.वडील आले की,बाहेरच्या हौदातलं पाणी घेऊन हात पाय तोंड धु पर्यंत लक्ष्मी अक्षरशः हंबरडा फोडून ओरडत राहायची.मग एका बादलीत पाणी भरून ते लक्ष्मी जवळ जायचे.विशेष म्हणजे त्याच बादलीत पाणी दिलं तरच लक्ष्मी पाणी प्यायची.दुसरी कुठली बादली किंवा घमेलं ठेवलं की ती लाथ मारून सांडायची आणि मान मुरडून उभी राहायची.तिचं ते रूप म्हणजे एका नव्या नवरीने लाडाने रुसावं असंच.कामावरून आल्याबरोबर वडील तिच्याजवळ जायचे.तिच्या मानेवर मान टाकून खूप वेळ तिच्याशी बोलायचे.”ये लक्ष्मी,काही खाल्लं का तू.काय होतंय तुला,घे पाणी पी” असं लाडाने बोलून बादली तिच्यासमोर ठेवायचे तेव्हा लक्ष्मी आधी वडिलांचा हात जिभेने चाटायची आणि मग डोळे झाकून शांतपणे पाणी प्यायची.तिच्या पाणी पिण्याचा एक विशिष्ट आवाज यायचा तो आवाज आजही मी विसरू शकलो नाही.

आमच्या मोठ्या आत्याकडे भाऊबीज ला एकदा वडील कोल्हापूर ला गेले होते तेव्हा आमच्या आत्याच्या दावणीला असणाऱ्या गर्दीत ही एक रेडी होती.काय माहीत पण वडिलांना तिचा आणि तिला वडिलांचा लळा तिथंच एका दिवसात लागला.तिथून वडील निघताना ती ओरडायला लागली.तेव्हा आमची आत्तीच म्हणली.जा घेऊन.दारात असावं जनावरं एखादं.घरात लक्ष्मी नांदते.वडिलांनी ही तिला दावणीची सोडली.गळ्यात लोढणा घालून वडिलांनी तिला सोळा तासांचा प्रवास करून चालवत आणली होती.त्या सोळा तासाच्या प्रवासातच वडिलांनी तिचं बारसं घातलं आणि ही लक्ष्मी आमच्या चिंचेखाली दावणीला आली.
लक्ष्मीला तिच्याजवळ आई,मी किंवा वडील या तिघांना सोडून जवळ कुणी गेलेलं चालत नव्हतं.तशी तिनं तीन बाळंतपणं या चिंचेखाली सुखरूप काढली होती.दुधाची कमी कधी नव्हतीच.पण धार काढायला फक्त वडीलच हवेत बाकी कुणी तिच्या कासेला हात लावायचं धाडस कधी केलं नाही.तिच्या या हट्टामुळे वडिलांना कुठे कधी जाताच आलं नाही.पण लक्ष्मी आमच्या घरातील एक महत्वाची सदस्य झाली होती.आणि आमची सर्वांची लाडकी झालेली होती.ती यासाठी की वडील आले की ती आम्हाला सावध करायची.आणि या कामात तिने कधीही खंड पडू दिला नाही.कदाचित या कारणासाठी लक्ष्मी आमची खूप लाडकी होऊन गेली होती.

देशी बेंदूर म्हणून एक सण येत असतो आमच्या पश्चिम महाराष्ट्रात.या सणाला वडील आमच्या लक्ष्मी ला असं काही नटवायचे की बस्स.तिची शिंगं अशी तलवारीसारखी होती.त्याला लालभडक रंग.अंगारवची केसं सुद्धा वडील अगदी स्टाईल मध्ये कातरायचे.त्या शिंगांना भारीतले असे रंगीबेरंगी गोंडे.पायाची नखे सुद्धा अगदी नेलपेंट ने रंगवावी अशी रंगवायचे.तिला अंघोळ घालताना सुद्धा अखंड एक लाईफबॉय आणि पाच सहा शांपूच्या पुड्या संपून जायच्या.तेव्हा अंगणात सगळीकडे त्या शांपू चा वास दरवळत राहायचा.आणि लक्ष्मी अशी काही थाटात अगदी शांतपणे डोळे मिचकावत उभी राहिलेली असायची.तिला सगळं नटवून झालं की मग मी घरातला आरसा घेऊन तिच्यासमोर धरायचो.तेव्हा जरा मान डावीकडे मग हळूच तशीच उजवीकडे ती आरशात बघायची आणि पाय आपटून जोरात हंबरायची.आणि मग वडील तिच्या जवळ जाऊन “लाडाची ग माझी लक्सा ” असं म्हणून तिच्या दोन्ही शिंगाच्या मध्ये हळूच ओठ टेकवायचे.आणि लक्ष्मी मग वडिलांच्या गालावरून जीभ फिरवून वडिलांचा गाल पार भिजवून टाकायची.वडिलांनाच काय पण आम्हाला सुद्धा कधी त्याचं काहीच वाटलं नाही.उलट मला खूप मनातून वाटायचं की लक्ष्मीने माझा ही गाल तसाच तिच्या जिभेने ओला करावा.मी एकदा दोनदा प्रयत्न केला होता पण तिने काही तो माझा हट्ट पुरवला नव्हता.लक्ष्मीला जसं एवढ्या लाडात नटताना मी पाहिलं. तेवढं नटताना माझ्या आईला सुद्धा आम्ही कधी पाहिलं नव्हतं.

माळावर चरायला सोडलेली लक्ष्मी मला आजही आठवते.तेवढा परिसर सोडून ती कधीच कुठे जात नव्हती.कुणाच्या अंगणातल्या रोपट्याला तिने कधीच तोंड लावलं नाही.कोणतीच बाई आमचं हे खाल्लं म्हणून बोंबलत आमच्या दारात कधी आल्याचं मला आठवत नाही.वडिलांनी दोन बोटे ओठावर टेकवून जोरात शिट्टी मारली की लक्ष्मी जिथे असेल तिथून जोरात धावत यायची.तिच्या त्या धावण्यात सुद्धा एक नजाकत आणि जगातील फार सुंदर संगीत मला कायम दिसायचं.

लक्ष्मी गाभण होती.म्हणजे गरोदर होती.लक्ष्मीला बाळ होणार म्हणून आम्ही रोज तिच्या पोटावरुन हात फिरवून बघायचो.एक दिवस बँकेचे काही लोक आले तेव्हा वडील छपरात लपून बसले आणि त्यांनी आईला वडिलांबद्दल विचारलं तेव्हा,आईने सांगितलं की वडील बाहेरगावी गेलेत दोन दिवसांनी येतील.तेव्हा त्या बँकेच्या लोकांनी तिच्या हातात कसलातरी कागद दिला आणि ते निघून गेले.आम्हाला गप्प घरात बसायला सांगितलं होतं.आणि गंमत म्हणजे लक्ष्मी सुद्धा शांतपणे हे सगळं बघत उभी होती.छपरात लपून बसलेले वडील घरात आले.त्यांनी तो कागद पाहिला आणि त्यांच्या चेहऱ्यावर काळजी जाणवू लागली.आम्ही लहान होतो आम्हाला कळत नव्हतं.पण,बँकेचे घेतलेले जे कर्ज होते त्याचे हफ्ते थकलेले आहेत आणि ते जर भरले नाहीत तर काहीतरी वाईट परिणाम होणार एवढं मात्र आईच्या आणि वडिलांच्या चर्चेतून कळलं.मी हळूच दबकत जवळ जाऊन वडिलांचा हात धरून विचारलं”अण्णा काय झालंय”त्यावर त्यांनी डोळे वटारून माझ्याकडे बघितलं आणि म्हणाले,” काही नाही असल्या भानगडीत लक्ष देऊ नकोस,तुझा तू अभ्यास कर”मी तोंड बारीक करून हातात पुस्तक धरून भिंतीला टेकून बसलो.

रात्रीची जेवणंसुद्धा शांततेत झाली.अण्णा पोटभर जेवले नाहीत.आणि दुसऱ्या दिवशी मंगळवार होता.मला आठवतंय तो दिवस म्हणजे आमच्या कवठेमहांकाळ चा आठवडी बाजार असायचा.जनावरांचा मोठा बाजार भरतो आमच्यात.सकाळचे नऊ वाजले होते.वडील म्हणाले आज एक दिवस शाळा राहू दे.माझ्यासोबत यायचंय तुला.मी मान डोलावली.आणि गप्प झालो.आईच्या डोळ्याचं पाणी थांबत नव्हतं.मला काहीच कळत नव्हतं.वडिलांनी लक्ष्मीला दावणीची सोडली.अंघोळ घातली.आणि उंबऱ्याजवळ आणून उभी केली.आईने लक्ष्मीला हळदी कुंकू लावलं.आणि आई सुद्धा लक्ष्मीच्या गळ्यात पडून हुंदके देऊन रडायला लागली.वडिलांनी ही आईच्या डोक्यावरून हात फिरवत स्वतःचे डोळे टॉवेलने पुसले.आयुष्यात पहिल्यांदाच मी वडिलांना रडताना बघितलं आणि मलाही खूप रडू यायला लागलं.मी रडत रडत विचारलं, ” अण्णा लक्ष्मीला कुठं घेऊन चाललाय, त्यावर वडील माझ्या जवळ आले.माझ्या डोळ्यातलं पाणी पुसत म्हणाले,”लक्ष्मीला बाजारात न्यायचीय.विकायचीय तिला आज.घरात अडचण आहे.बँकेचे हफ्ते थकलेत.नाही भरले तर पोलीस मला नेतील.तुम्ही कुणी रडू नका.शांतपणे लक्ष्मीला बघा.आणि तू पण चल माझ्यासोबत तुला मिसळ चारतो आज.”कायम मिसळ म्हणल्यावर उड्या मारणारा मी पाणावलेल्या डोळ्यानी हुंदकत फक्त एकटक लक्ष्मीकडे पाहत राहिलो.वडिलांनी कधी कासऱ्याला हिसका दिला आणि लक्ष्मी च्या मागे मी कसा चालू लागलो मला काहीच कळलं नाही.बाजारात येईपर्यंत मी पाणावलेल्या डोळ्यांनी लक्ष्मीला बघत होतो.

बाजारात आलो आणि बघितलं सगळीकडे जनावरंच जनावरं. पण त्या सगळ्या गर्दीत आमची लक्ष्मीच देखणी दिसत होती.एका क्षणात दलालांनी वडिलांना घेरलं.आणि ती दलालांची भाषाच वेगळी होती.मला काहीच कळत नव्हतं.अखेर एक गिऱ्हाईक आलं.आणि बघता बघता व्यवहार झाला.वडिलांच्या एका हातात पैसे देत त्या माणसाने वडिलांच्या दुसऱ्या हातातला कासरा हिसकावून घेतला.आणि लक्ष्मीने जोरात हंबरायला सुरवात केली.चार पाच लोकांनी लक्ष्मीला धरली.मागच्या दोन्ही पायाला कासऱ्याने तिढा टाकला.एकाने कासरा जोरात ओढून धरला.आणि लक्ष्मीचे डोळे पांढरे झाले.बेंदराला नटलेली लक्ष्मी मला आठवली आणि मी वडिलांच्या पोटाला गच्च मिठी मारून रडायला सुरवात केली.माझ्या डोक्यावरून हात फिरवत त्यांनी पैसे खिशात घातले.मला बाजूला केलं,अण्णांच्या डोळ्यातलं गरम पाणी माझ्या हातावर पडलं आणि पोटातली आतडी एक झाली आणि गपकन मातीत खाली बसलो.मला तसंच सोडून अण्णा त्या दलालांनी आवळून धरलेल्या आमच्या लक्ष्मी जवळ गेले आणि तिच्या गालावर ओठ ठेवत म्हणाले,”लक्ष्मी नीट राहा गं बाई.” त्यावर लक्ष्मी शांत झाली.तिने हिसके देणं थांबवलं.बहुतेक आईने लेकराची चूक पदरात घ्यावी आणि माफ करून लेकराला आवळून कुशीत घ्यावं असंच काहीसं लक्ष्मीने अण्णांचा हात जिभेने चाटायला सुरवात केली.मी तसाच मातीत बसून हुंदके देत होतो लक्ष्मीने माझ्याकडे बघितलं.हळूहळू पावलं टाकत शांतपणे ती माझ्याजवळ आली. कासरा धरलेल्या माणसाने कासरा ढिला केला.आणि लक्ष्मीने नरड्यातून तोंड वासून फूटभर जीभ बाहेर काढली आणि माझ्या डोक्यावरून,माझ्या गालावरून फिरवू लागली.एखादया आजीने एखाद्या नातवाला जसं मिठीत घेऊन गालाचं मुकं घ्यावं तसं लक्ष्मी करू लागली.पुढच्या दोन गुडघ्यावर ते जनावर बसलं.माझी लक्ष्मी बसली तिला मला मिठीत घेऊन हंबरडा फोडायचा असावा.माझ्या डोळ्यात माती चालली होती डोळ्यावर अंधारी येत होती तिचं जीभ फिरवणं चालूच राहिलं.मग वडिलांनी तिच्या पाठीवर हात फिरवला तेव्हा झटकन लक्ष्मी बाजूला झाली.आणि कुणी हिसका द्यायच्या आत ती तिच्या नव्या मालकाबरोबर हळूहळू चालू लागली.मी उभा राहिलो.वडिलांनी माझ्या खांद्यावर हात ठेवत जवळ ओढून घेतलं.आम्ही लक्ष्मीकडे पाहत राहिलो.लक्ष्मी पुन्हा पुन्हा मागे वळून बघत होती तसा आमच्या दोघांचाही हंबरडा वाढत राहिला.

गर्दीतून लक्ष्मी नजरेच्या आड झाली.पुन्हा लक्ष्मी दिसणार नाही या भावनेने पोटातली आतडी एक झाली होती.मी वडिलांच्या खिशातला पेन हातात घेतला.आणि हुंदके देत म्हणलं “अण्णा तुमची ती फोन नंबरची डायरी द्या जरा.”वडिलांनी खिशातली डायरी माझ्या हातात दिली.मी डाव्या हातात ती डायरी धरली आणि शेवटच्या कोऱ्या पानावर पेन ठेवलं आणि कवितेच्या ओळी लिहिल्या गेल्या,
“हा कोणता बाजार भरलेला आहे
मुक्या जनावरांचा व्यवहार आहे
सुभाषराव तुमच्या सुखासाठी पहा
ही लक्ष्मीसुद्धा तिच्या मुक्या भावना विकते आहे.”
दुसऱ्याच्या दावणीला ती जगेल कशी आनंदात
सुभाषराव ती मरून जाईल तुमच्या आठवणीत
तिला बोलता आलं असतं तर
ती म्हणाली असती काहीतरी
अगदी तसंच तुमची आई बोलायची
असलंच काहीतरी”
मला पुढचं लिहिता येणं शक्य नव्हतं.मी ती डायरी सुभाषरावांच्या हातात दिली. सुभाषराव म्हणजेच माझे वडील.त्यांचं नाव लिहून मी माझा त्यांच्यावरचा राग आणि लक्ष्मीवरचं प्रेम कवितेत व्यक्त केलं. वडिलांनी त्या ओळी वाचल्या.मला वाटलं त्यांचं नाव अस कवितेत लिहिलेलं बघून ते मला रागावतील.पण वडील ढसाढसा रडायला लागले. माझा हात घट्ट धरला आणि म्हणले चल पळ.”लक्ष्मीला जाऊ द्यायची नाही.”या वाक्याने पोटातली गोळा झालेली आतडी ढिली झाली.पायात बळ आलं.आणि मीच वडिलांना ओढत ओढत पळू लागलो.या टोकापासून त्या टोकापर्यंत सगळा बाजार पायाने तुडवत धावत होतो.लक्ष्मीला चौघेजण धरून एका टेम्पोत चढवताना दिसले.मी जोरात ओरडलो ” ओ थांबा.”सगळ्यांच्या नजरा आमच्याकडे गेल्या.लक्ष्मी एकटक पाहत आमच्याकडे बघतच राहिली.धापा टाकत वडील आणि मी जवळ गेलो.कसलाही विचार न करता वडिलांनी वरच्या खिशातले सगळे पैसे काढले त्या माणसाच्या हातात दिले.आणि म्हणाले, ” नाही विकायची माझी लक्ष्मी.म्हातारी होऊन माझ्या दारात मरून पडू दे.हा व्यवहार रद्द समजा.” वडिलांचं वाक्य संपायच्या आतच मी त्या माणसाच्या हातून कासरा ओढला आणि माझ्या हातात घेतला.आणि मी चालू लागलो.वडिलांनी पैसे दिले आणि ते माझ्या आणि लक्ष्मीच्या मागून चालू लागले.

लक्ष्मी एका सुरात हंबरत होती.मला तर ती कुठलंतरी आनंदाचं गाणंच गुणगुणत असल्यागत वाटत होती.वडील म्हणाले “नितीन मिसळ खाऊया का.”मी म्हणलं नको अण्णा मिसळ फिसळ मला.चला घरी आई वाट बघत असेल.तेव्हा मी,लक्ष्मी आणि अण्णा उड्या मारत घराची वाट आनंदाने तुडवत राहिलो.

–  नितीन सुभाष चंदनशिवे
मु.पो.कवठेमहांकाळ.
जिल्हा सांगली.
7020909521

*(आपल्या दावणीला मुकी जनावरं असतील किंवा नसतील पण त्यांची वेदना जर तुम्हाला कळत असेल तर या 7020909521 नंबरवर जरूर कॉल करून कळवा.आणि ही लक्ष्मी सर्वापर्यंत प्रामाणिकपणे पोहचवा.)

*आपल्याला जर ही कथा आवडली असेल तर आपण व्हाट्सअप वर ही सर्वाना शेअर करू शकता.