
तळेगाव दशासर : धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातील तळेगाव दशासर परिसर आज दणाणून गेला, कारण हजारो शेतकरी, महिला व युवकांनी माजी आमदार मा. विरेंद्रभाऊ जगताप यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारविरोधात दोन तासांचा ऐतिहासिक चक्काजाम आंदोलन केला. “सरकार जागे व्हा!”, “शेतकऱ्यांना न्याय द्या!”, “कर्जमाफी जाहीर करा!” अशा घोषणांनी औरंगाबाद रोडवर जनआक्रोशाचा लोंढा उसळला.
काँग्रेसचा सरकारला इशारा
माजी आमदार विरेंद्रभाऊ जगताप यांनी आंदोलनादरम्यान सांगितले,“शेतकरी आत्महत्येच्या टोकावर आहे. कर्जमाफी ही त्याची मागणी नाही, ती त्याची गरज आहे. सरकार उद्योगपतींचे कर्ज माफ करतं, पण शेतकऱ्याला मात्र न्याय मिळत नाही. आम्ही शांत बसणार नाही — काँग्रेस रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करणार!” ते पुढे म्हणाले,“शेतकऱ्यांचा घाम सोन्यासारखा मौल्यवान आहे. जर सरकारने त्यांच्या अश्रूंना किंमत दिली नाही, तर जनता आगामी निवडणुकीत याचे उत्तर मतदानातून देईल.”
काँग्रेसच्या प्रमुख मागण्या
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तात्काळ जाहीर करावी, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर आर्थिक मदत वाढवावी, सोयाबीन, कापूस, तुर खरेदीसाठी सरकारी केंद्रे तातडीने सुरू करावीत, विमा कंपन्यांकडून नुकसानभरपाई निश्चित मुदतीत मिळावी, थकबाकी वसुलीवर बंदी आणि वीजबिल माफी लागू करावी.
सिंचन, बियाणे आणि खत अनुदान तत्काळ उपलब्ध करून द्यावे.
आंदोलनात उपस्थित मान्यवर
या भव्य आंदोलनात प्रदेश युवक काँग्रेस महासचिव परीक्षित जगताप, तालुका काँग्रेस अध्यक्ष पंकज वानखडे, निशिकांत जाधव, अमोल होले, जिल्हा बँकेचे संचालक श्रीकांत गावंडे, महिला काँग्रेस अध्यक्षा अनिता मेश्राम, तसेच डॉ. विनोद देशमुख, पुरुषोत्तम उडाके, मयूर दुबे, प्रवीण घुईखेडकर, दिवाकर ठाकरे यांच्यासह हजारो कार्यकर्ते आणि शेतकरी बांधव उपस्थित होते.
पुढील पाऊल
काँग्रेसने जाहीर केले आहे की,“जर सरकारने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी तातडीने जाहीर केली नाही, तर अमरावती जिल्ह्यासह राज्यभर तीव्र आंदोलनाची मालिकाच उभारली जाईल.” हे आंदोलन केवळ सुरुवात असून, “शेतकऱ्यांच्या न्यायासाठी काँग्रेस शेवटपर्यंत लढत राहील,” असा ठाम निर्धार काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला.