New..
  • तुमची आवडती पुस्तके शोधण्यासाठी येथे क्लिक करा.

बानो बुढी – आमच्या गावातील मायेची गोधडी शिऊन देणारी स्त्री

On: September 11, 2025 2:30 PM
आम्हाला फॉलो करा:
बानो बुढी – आमच्या गावातील मायेची गोधडी शिऊन देणारी स्त्री
बानो बुढी – आमच्या गावातील मायेची गोधडी शिऊन देणारी स्त्री

बानो बुढी – आमच्या गावातील मायेची गोधडी शिऊन देणारी स्त्री

आमच्या छोट्याशा गावात साऱ्या जातीधर्माची लोकं अगदी गुण्यागोविंदाने रहायची.गावात दहावी पर्यंत शाळा.पाच पन्नास कुणबी,पाटलांची,दहा बारा तेल्यांची ,पाच पंचवीस धनगर समाजाची वस्ती गावच्या नदीकाठावर बौद्धवाडा होता.बाकी गावगाडयाची जशीजशी लोकसंख्या वाढत गेली,तसतशी कुटूंबे मोठी झाली.

काही नवीन प्लॉट पडलेल्या आखर पट्टीत शेणामातीची लिपून तर काही पक्की बांधून वस्ती करून रहायला गेली. दोनचार मुस्लिम समाजाची घरं होती. गफारभाई, व त्यांची भावडं पण गावाशी त्यांचा चांगला सलोखा होता. गफफारभाई हातात लोंखडी पाणा खांद्यावर घेऊन गावाला वॉटर सप्लाय म्हणजे नळ सोडायचे काम करायचे.

दुसरा लहान भाऊ तालुक्याच्या बैलबाजारात गुरंढोर, बैलजोड्या विकण्याचा जोड धंदा करायचा. गावात अडल्या नडल्याले चांगली बैलजोडी विकत घेऊन द्यायचा.एक एसटी ड्रॉयव्हर असलेले त्यांचा मुलगा अशफाक आमचा चांगला दोस्त होता. त्याच्या घरी आम्ही गेलो म्हणजे दहावीस कोंबड्या ईकडे तिकडे पळायच्या. आम्ही पिलांसोबत खेळायचो. गावातली बरीच लोकं,लेकरं पैसे घेऊन अंडी विकत घेण्यासाठी त्याच्या घरी यायची. अशफाकला अंडी मागायची. तोही मोठया खुशीनं त्यांना

‘घरपर जावो ना बुढ्ढी देती ना’

आम्ही खुप पोट धरून हासायचो. त्याच्या लक्षात काही गयायचं नाही.पण मनानं अशफाक खुप निर्मळ होता. आमची भांडणं झाली म्हणजे आम्ही त्याले सायकलचा स्पोक म्हणायचो.गावात असलेली ही दोनचार घरं पण तेही कालांतराने सोयऱ्या,धायऱ्याच्या आसऱ्याने पोट भरण्यासाठी कामाधंदयाच्या शोधात घरदार ईकटाक करून ईकडे तिकडे पांगापांग झाली.

बरेच दिवस गावात एकटचं फकीराचं घर होतं. घर कसलं काळी पन्नी आथरून लाकडाच्या ठुन्या उभारून तयार केलेली झोपडीच ती. त्या झोपडीत बानू बुढी रहायची. तीचं खरं नाव म्हणजे शायीस्ताबानो पण एवढं नाव कोणी न घेता साऱ्या गावभर बानो बुढी म्हणूनच तीची ओळख होती. सारा गाव तिले ओळखायचा. तसा तिचा स्वभावच मस्त होता. फाटलेली सलवार, कमीज व डोक्शावर ठिगळ लावलेली ओढणी गयाभोवती लपेटून ती आमच्या घरी यायची.


• नम्र निवेदन
“निर्भीड, नि:पक्ष, निस्पृह पत्रकारितेसाठी तुमचे सहकार्य गरजेचे आहे…”
लोकशाही मूल्यांची जपणूक, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची निष्ठा, आणि समाजजाणिवेची पायाभरणी हेच गौरव प्रकाशनचे ध्येय आहे. निर्भय, नि:पक्ष आणि लोकहितवादी पत्रकारिता हे आमचे बोधवाक्य आम्ही केवळ शब्दापुरते न ठेवता कृतीत उतरवत आहोत.
या सत्यशोधन आणि परिवर्तनाच्या प्रवासात तुमच्या आर्थिक सहकार्याची नितांत गरज आहे. आपले थोडेसे योगदान आमच्या निर्भय पत्रकारितेस बळ देऊ शकते. खालील QR कोड स्कॅन करून आपण आपल्या परीने मोलाचे सहकार्य करू शकता. चला, एकत्र येऊन समाजपरिवर्तनाच्या या वाटचालीत सहभागी होऊया. कारण खरी पत्रकारिता केवळ बातम्या देत नाही, तर भविष्यास आकार देते.
-बंडूकुमार धवणे
संपादक गौरव प्रकाशन

QR 1

आमची आजी शांता बुढी घरातल्या बाया माणसं व लहान लेकराईचे फाटलेले पोतडयात जमा करून ठेवलेले कपडे तर कधी आंगात घालून घालून टाकून देलेली सदरे पायजामे,धोतरं, लुगडं बानु बुढीले वाकई, गोधड्या शिवासाठी उतयणीतून काढून बानो बुढीले द्यायची.

बानु बुढी बरोबर कैचीनं नाही तर पावशीनं कापकुप करून आतमध्ये बारीक कापडाचे तुकडे भरून अशी सुंदर व नक्षीदार गोधडी शिऊन द्यायची की एवढ्या कडाक्याच्या थंडीतही मायेची ऊब त्या गोधडीमधे असायची. शाळेच्या मागं अंधारात व गवत वाढलेल्या सरकारी जागेत तीचं छोटंसं झोपडं होतं.समोर आंग धूवाय साठी कुळाची शेणामातीनं छाकारलेली न्हानी,समोर कुंभाराच्या घरची आणलेली मातीची गाडगी मडकी,एक नांद तुंडूब पाण्यानं शिगोशिग भरलेली,आंग घासायला खापर.

हे वाचा – महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य व ग्रंथसंपदा

बहुधा कपडे धुण्यासाठी वापरलेल्या निरमा साबणानेच आंगही धूवायला तेच साबण असायचं. न्हानीच्या समोरचं दोन मोठमोठी हेटयाची झाडं लावलेली अगदी ताडासारखी उंच वाढलेली.बहुतेक तीच्या झाडाची फुलं अन्य लोकच वेचून नेत तरी बानु बुढीची कुरबुर नसायची.आंनदाने ती होकार द्यायची व स्वता फुलं तोडून द्यायची. सकाळच्या न्याहरीसाठी तळलेल्या मिरच्या व शिळ्या भाकरीसोबत तोंडी लावायला मस्त लागायची. मी तर भल्या पहाटे फुलं तोडण्यासाठी जायचो.

तीच्या आंग धुवायच्या न्हाणीच्या कुळाजोळ खुप मोठा फुलांचा सडा पडलेला असायचा. हत्तीच्या सोंडेच्या रंगी फुलं आई ताव्यावर तिखट मीठ टाकून शिदोरीवर बांधून शेतावर न्यायची. छोट्याशा झोपड्यात राहणाऱ्या बानु बुढीले दोन पोरं होती,तीही गावगाडयाची मिळेल ती मोलमजुरी करणारी. मोठा जुम्माभाई,तर दुसरा शेरू भाई.शेरूचा आणखी एक जोळ धंदा म्हणजे तो पोलिसांचा खबऱ्या होता.

पोलीसाचा खबऱ्या म्हणून साऱ्या गावात,पोलीस स्टेशनात त्याची वयख,पायख गावात घडलेल्या भांडणं तंटयाची माहिती तो एका नया पैशाचा मोबदला न घेता पोलिसांपर्यंत पोहचायचा त्या वेळी टेलिफोन,मोबाईल सुविधा नसल्याने स्वताच्या सायकलने पायडल मारत पोलिस स्टेशनात शेरू स्वता खस्ता खात जायचा.साऱ्या पोलिस स्टेशनात त्याची ओळख पाळख होती.

हे वाचा – स्थूलतेचे दुष्परिणाम जाणा ..!

ही मंडळी जाती धर्माच्या पलीकडे जाऊन आंनदाने गावारहाठीशी एकरूप झालेली होती. गावाच्या संस्कृतीशी त्यांची नाळ जोडलेली असायची.ना मुसलमान ना हिंदू ना बौद्ध.फक्त मानवता ही शिकवण जोपासलेली. घरी अठराविश्व दारिद्र्य तरी बानु बुढीच्या चेहऱ्यावर सदानकदा आनंदी,आनंद दिसायचा.

परिस्थितीनं वाकई सारखी जागोजागी फाटलेली बानु बुढी दुसऱ्यासाठी मात्र सातऱ्या, वाकया गोधडया शिऊन मायेची ऊब द्यायची.त्या मोबदल्यात दोन पैसे,भाकर तुकडा व शियपाकं कोणी देलेलं अन्न बानो बुढी घ्यायची.तेही निमुटपणे व ईमान इतबारे कष्ट करून. कोणी बानो बुढीले सिंगलभर बकरीच्या दुधाचा घटवट चहा पाजायचा व घरातल्या सातऱ्या वाकया शिवून घ्यायचा.

जाडा,भरडा सुई दोरा घरमालकानं दिलेला तीच्या जवळ असायचा. कधीकधी आम्ही याच गोधडया शिकवण्याच्या धाग्यावर पतंगा पण उडवायचो.गोधडया शिवतांना तीच्या हाताची बोटांची चाळण झालेली असायची.तरी पोट भरायासाठी कष्टाचा डोंगर ती उपसायची. सदानकदा ती कामातच व्यस्त दिसायची. तीच्या हातच्या गोधडीची कलाकुसर पाहून गावच्या मोठमोठ्या खटल्यात तीला बोलावणं असायचं.

डाक्टरच्या खटल्यात तर कधी बापुराव बुढयाच्या खटल्यात तर कधी गोविंदराव साधुबुवांच्या खटल्यात ती हमखास दिसायची. काम करता करता गोष्टीही सांगायची. जेवणंखावणं झाली म्हणजे दुपारून दोन,चार बुढया,बाडया कातचुना सुपारी पानाची चंची घेऊन तिच्या जवळ पानाचा देठ तोडून डब्बीतलं बारीकसारीक चिमटीत काढून मस्त एकमेकींच्या हातावर ठेवत आदानप्रदान करायच्या.

● हे वाचा – नागपूरच्या कर्तव्यदक्ष  विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी  बिदरी 

पण एवढ्या दुःखाचा डोंगर समोर उभा असूनही, तीच्या तोंडून आपल्या परिस्थितीची,जाती, धर्मांच्या गोष्टींची पुसटशी कल्पनाही ती कधी घरमालकास कधी बोलून दाखवत नसायची.हाती आलेलं कामं दिवस डुबे पर्यंत निमुटपणे तेही न थकता इमान-इतबारे करायची.

पोटापुरतं कष्टानं कमावणं हाच तीचा खरा धर्म होता.केवढी ही तीच्या मनाची स्थितप्रज्ञ अवस्था म्हणावं?अशा कडाक्याच्या थंडीत आमच्या इथं असणाऱ्या ढोरावासराईचा गोठा सपरीतच रहायचा.एखादं कडाक्याच्या थंडीमुळे गोठलेले वासरूही त्याच्या आईला सोडून सातरीत नाही तं गोधडीत निजायला यायचं.

आम्ही त्याच्या आंगावर मोठ्या मनाने पांघरूण द्यायचो.ही उबदार मायेची उब आमची नसून बानु बुढीच्या शिवलेल्या हातच्या वाकईची असायची.वाकई आणि बानु बुढीचं असं अनोखं व अतुट नातं होतं बानु बुढी म्हणजे आमच्या गावचा चालता बोलता असणारा गादी कारखानाच होता.

पण आता ही बुढी गावात कुठीच दिसत नव्हती.नातेवाईकाच्या आसऱ्याने बहुतेक दुसऱ्या गावी पोट भरायला गेली की गावपांढरीतच मेली हे त्या लहान वयात समजायले मार्ग नव्हता.पण सारा गाव कडाक्याच्या थंडीत उबदार सातऱ्या,वाकया आंगावर घेऊन बानु बुढीची आठवण काढायचा हे मात्र नक्की.

विजय जय्सिंग्पुरे

– विजय जयसिंगपुरे, अमरावती
भ्रमणध्वनी -९८५०४४७६१९


गोधडी शिवण्याच्या व्यवसायातून 200 महिलांना रोजगार, पारंपारिक कला जगभरात नेण्याचा एनजीओंचा प्रयत्न


Bandukumar Dhawane

बंडूकुमार धवणे हे महाराष्ट्रातील पत्रकार असून गौरव प्रकाशन न्यूज या मराठी डिजिटल बातम्या पोर्टलचे संस्थापक व मुख्य संपादक आहेत. 2010 मध्ये त्यांनी या माध्यमाची स्थापना केली असून निःपक्षपाती व विश्वासार्ह वार्तांकनासाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली गौरव प्रकाशन आज लाखो वाचकांपर्यंत पोहोचणारे लोकप्रिय न्यूज पोर्टल आहे.

Join Whatsapp

Join Now

Join Telegram

Join Now

Join Instagram

Join Now