ज्या गोष्टींना कुणीही नाकारू शकत नाही, त्या गोष्टींना युनिव्हर्सल ट्रुथ म्हणजे शाश्वत सत्य असे म्हणतात. त्यातीलच एक गोष्ट म्हणजे पहाटेचं स्वप्न…असं म्हटलं जातं की, पहाटेला बघितलेलं स्वप्न खरं ठरत असतं. तर असेल बहुतेक…एकदा अशाच एका पहाटेला गुलाबी बोच-या थंडीत मखमली दुलईमध्ये स्वत:ला टेक अप करून मी स्वप्नांच्या आटपाट नगरीत जावून लँड झालो. आणि… पुढे बघतो तर काय?
तिच्या प्रशस्त घराच्या उंबरठ्यावर ती उभी असताना माझी नजर तिच्यावर पडताच क्षणी तिचा तो निरागस चेहरा, तिचं स्मितहास्य, तिचा शांत व मनमिळाऊ स्वभाव यामुळे माझ्या ह्रदयरुपी कॅमे-याने तिची प्रतिमा टिपून माझ्या मनपटलावर चित्रित केली. तेव्हापासून माझं तिच्यावर प्रेम बसलं आणि स्वप्न माझं फुलणार, असं वाटायला लागलं. माझ्या आयुष्यातील तो एक अनमोल ठेवा आहे. पण हे स्वप्न सत्यात उतरणार काय? याची अनामिक भीती मनात साचलेली. आपलं पहिलं प्रेम कसं व्यक्त करावं हेच कळेना. श्रावणाच्या पहिल्या सरीनं सृष्टीला धुंद करून टाकावं तशीच ती माझ्या जीवनात आली. अगदी हळूवारपणे…तिचं बोलणं, हसणं, दिसणं तिचा तो स्वभाव सारंकाही अगदी मनाला भारावून टाकणारं. तिची आणि माझी कळत नकळत जेव्हा कधी भेट झाली ती अपघातानंच. बघा! आता ती घाबरली असणार. अगं येडू! अपघात म्हणजे एक योगायोग.
मनात उचंबळणा-या विचारांचा अथांग महासागर म्हणजे भावना. प्रत्येकालाच आपल्या भावना कुणाजवळ तरी व्यक्त कराव्याशा वाटतात. व्यक्त केलेल्या भावनेच्या समाधानातूनच जीवनाचं सार कळत असतं. कारण ह्रदयातील या भावनांना आवर घालता येत नाही ना! त्या ओसांडणारच प्रेमाच्या सागरात अन् तिच्या विरहात पण…
- तिला कसे सांगू
- माझं मला कळत नाही
- भावना येतात ओठापर्यंत
- पण शब्दच मिळत नाही
प्रेम केल्यानं होत नाही. ते एकदाच नकळत केव्हा, कधी व कोणत्या परिस्थितीत होतं हे उमजतंच नाही. माझ्या बाबतीतसुद्धा असंच घडलं. मलासुद्धा कळलं नाही की, या मनातील भावनांच्या वेलीवर प्रेमाची कळी कधी उमलली व त्या कळीचं कधी प्रेम फुलात रुपांतर झालं, हे कळलंच नाही. पण एक मात्र निश्चित माझं प्रेम पवित्र व नि:स्वार्थी होतं. आताही आहे आणि पुढेही राहणार. तेही केवळ तिच्यावरच. एकदा तिच्या अप्रत्यक्ष कथनाने माझ्या मनात कंप उसळविला की, ‘मी तिला विसरलो म्हणून. कसं विसरणार बरं!
- तिची आठवण आली नाही
- असं कधीच झालं नाही
- आठवायला विसरावं लागतं
- पण तिला विसरताच आलं नाही
एकदा कुणीही ह्रदयाच्या कारावासात बंदिस्त झाला की, त्याला काढण्यासाठी ह्रदयच चिरावं लागतं. कारण त्याला तेथील वातावरणाची सवय झालेली असते. तो तेथे पूर्णत: एकरुप झालेला असल्याने काढता काढून निघत नसतो. आणि ती म्हणते…अगं येडू! तुझ्याविना दुस-या कुणालाही या वेड्या मनानं स्विकारलं नाही आणि कधी स्विकारणारही नाही. आताही माझ्याकडे तिची एक वस्तू जशीच्या तशी आहे. ती माझ्यापासून दूर होताना हातात हात दिलेला तो स्पर्श आजही मुठीबंद करून ठेवला आहे. प्रतिदिन प्रभातकाळी त्या स्पर्शाचं दर्शन करीत असतो.
मला तिच्याकडून कोणतीच अपेक्षा नव्हती. एवढंच का जेव्हा कधी मी अंतरंगातून मनानं पूर्णत: खचून जाणार तेव्हा केवळ प्रेमानं पाठीवर हात ठेवून ‘तू काही घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’ या दोन शब्दाने धीरगंभीर आधार दिला असता तरी या वेड्या मनाला पुरेसा होता. कारण माणूस एका यशोशिखरावर प्रगतीने तेव्हाच झगमगू शकतो, जेव्हा त्याच्या पाठीशी एक प्रेरणात्मक शक्ती उभी असते. ती शक्ती म्हणजे दुसरी कुणीही नसून आपल्यावर प्रेम करणारी व्यक्ती असते. प्रत्येक दिवशी उगवणारा सूर्य तोच असला तरी दरदिवशी तो वेगळंच महत्त्व घेऊन येतो. अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक दिवशी तिला बघण्यासाठी मनाला लागलेली भावस्पर्शी हुरहुर तर दुसरीकडे ती न दिसल्यामुळे पूर्ण दिवस उदासीनतेत जायचा.
- प्रिये आठवण तुझी येता
- मन माझं उदास होते
- एका क्षणासाठी का होईना
- गालावर अश्रूंचा पूर येते
कधीकधी वाटायचं, तिला सर्व काही सांगून मोकळं व्हावं. मन रितं करून मनाचा भार हलका करावा. अव्यक्त प्रेम तिच्यापुढे व्यक्त करावं पण…
- प्रेम कुणावरही करा
- पण ते सांगायचं नसतं
- नेत्र पल्लवीच्या संकेतानं
- तर ते जाणायचं असतं
नाण्याला दोन बाजू असतात ना! तसंच प्रत्येक गोष्टीलासुद्धा असतात. दुस-या बाजूंनी विचार केल्यास…
- तिला समजावून सांगावं
- अशी ही गोष्टच नव्हती
- न सांगितल्यामुळे तिला समजलं नाही
- एवढीही ती नासमज नव्हती
तत्पूर्वी एक विचार मनात लहर उसळवून गेला की, माझ्या ज्या भावना तिच्याबद्दल आहेत, त्याच भावना तिच्या पण असेल काय? ती माझ्या प्रेमाचा स्वीकार करेल काय? तिला काय वाटतं माझ्याबद्दल हे मला कधी कळणार की नाही? असं किती दिवस माझं प्रेम बंदिस्त राहील? ह्रदयातील या भावना कधीतरी एकदा मोकळ्या कराव्याच लागतील ना!
- समजून घे तू सारं
- मी न सांगता काही
- कदाचित उद्या मला
- ते सांगता येणार नाही
मला माहीत आहे की, माझं तिच्यावर जेवढं प्रेम होतं तेवढंच तिचंसुद्धा माझ्यावर होतं. पण त्या येडूला कळलंच नाही. असं असतानाही माझ्यात अशी कोणती उणीव होती की, ज्यामुळे तिला मला जीवनाच्या अर्ध्या वाटेवरच सोडून जावं लागलं. मी मन मानेल तेथे, स्वतंत्र पक्षाप्रमाणे मनसोक्त विहार करीत होतो. त्याचवेळी ती मोठ्या खुबीने माझ्याभावती प्रेमाचे जाळे विणून मला कैद केलं आणि मग…
- ती माझ्या आयुष्यात आल्यावर
- काहीतरी मिळाल्याचं समाधान वाटलं
- पण मला सोडून गेल्यावर
- सर्वकाही हरविल्याचं दु:ख दाटलं…
निदान ती तिच्या विश्वात परतताना न घाबरता तिच्या मनात जे काही होतं, ते सांगून मोकळं व्हायला हवं होतं. तिचा नकार असता तरी विशेष फरक पडला नसता. कारण ज्याप्रमाणे कुणालाही नापसंत करण्याचं काही कारण नसतं. त्याचप्रमाणे कुणालाही पसंत करण्याचं काही सबब नसतो. हा तर आपापल्या मनाचा प्रश्न असतो.
- शब्दस्पर्शी-सुनील शिरपुरे
- कमळवेल्ली,यवतमाळ
- भ्रमणध्वनी-७०५७१८५४७९
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–