Header Ads Widget

Rahul Gandhi : राहुल, संतांच्या पवित्र भूमीत तुझे स्वागत करतांना ........

  प्रिय राहुल,

  आज तु महाराष्ट्राच्या पवित्र आणि पावन भूमीत प्रवेश करणार आहेस.संत महापुरुषांच्या सुधारणावादी कार्याने आणि विवेकी व प्रागतिक विचारधारेने सुपीक बनलेल्या या भूमीत तुझे आम्ही मनापासून स्वागत करतोय.या विशाल ह्दयी भूमीने अनेकांना आधार दिला आहे आणि अनेकांचे भवितव्य घडविले आहे.त्यामुळे भविष्यात तुझ्याही यशाचा श्रीगणेशा महाराष्ट्रातूनच होईल असे आम्हास वाटते.राहुल, साडेतीन हजार किलोमीटरच्या पदयात्रेसाठी तू कन्याकुमारी वरून काश्मीर करिता निघालास आणि एक एक राज्य तुझ्या मागील गर्दीने फुलवित महाराष्ट्रात आलास.महाराष्ट्रातही तुला अशीच अफाट गर्दी मिळेल.महाराष्ट्राची जनता तू काँग्रेसचा आहे म्हणून नाही तर एक लढवय्या,सच्चा आणि ज्याच्या कुटुंबाने देशासाठी फार मोठे बलिदान दिले आहे अशा एका समर्पित कुटुंबातील व्यक्ती म्हणून तुझे स्वागत करणार आहे.पक्ष आणि पक्षभेद बाजूला ठेवून अनेक राजकीय,सामाजिक,सांस्कृतिक संघटना निश्चितपणे तुझे स्वागत करतील यात शंका नाही.तशीही महाराष्ट्राने काँग्रेसला नेहमीच साथ दिलेली आहे.महाराष्ट्राचा सह्याद्री, हिमालयाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याचे चित्र अनेकदा पाहायला मिळालेले आहे.

  आधुनिक महाराष्ट्राच्या उभारणीत सिंहाचा वाटा असलेले पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना तसे आश्वासन दिले होते.आज मात्र काँग्रेसची अवस्था महाराष्ट्रात अतिशय वाईट आहे.४८ मतदार संघातून काँग्रेसचा केवळ एक खासदार आहे. काँग्रेसची ही अवस्था का झाली यावर तुझ्यासहीत महाराष्ट्रातील काँग्रेसच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांनी गांभीर्याने चिंतन आणि मंथन केले पाहिजे.महाराष्ट्र आणि देशातील काँग्रेस संपवण्यासाठी विरोधी पक्षापेक्षा काँग्रेस पक्षातील लोकच जास्त जबाबदार आहे हे तुला कबूल करावेच लागेल.इतकी बिकट अवस्था होऊनही महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते अजूनही सुधरायला तयार नाही.बदलण्याची मानसिकता नाही.तरुण पिढीला स्थान देण्याची इच्छा नाही.आपापल्या गढीवरून खाली उतरायला तयार नाही.गटातटाचे राजकारण थांबविण्याची त्यांची मनिषा नाही.त्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना या गोष्टीची चीड येवून त्याचा परिणाम काँग्रेसची ही दुर्दशा होण्यात झाला.

  राहुल, आता तू कठोरपणे निर्णय घे.तू तुझ्या पक्षाच्या नेत्यांना घराबाहेर पडायला सांग.गाडीच्या खाली उतरुन तुझ्याप्रमाणे जमिनीवर चालायला शिकव.लोकांमधे आपुलकीने मिसळण्याचे प्रशिक्षण दे.महाराष्ट्रामधे अनेक सामाजिक, पुरोगामी चळवळी,त्यांचे नेते,विचारवंत,अभ्यासक,साहित्यीक फार मोठे काम करतात व त्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मोठा फायदा तुमच्या पक्षाला होत आलेला आहे.त्यांना तुमच्याकडून कशाचीही अपेक्षा नसते.पण निदान त्यांच्या कार्याची दखल तरी राज्यातील तुमच्या नेत्यांनी घ्यावी व त्यांना मानसिक बळ द्यावे हे त्यांना सांग.तुझ्या पक्षाचे नेते छोट्यामोठ्या सामाजिक चळवळींना सहकार्य तर करतच नाही,उलट त्यांचे खच्चीकरण करुन त्यांना संपविण्याचा प्रयत्न करतात.त्यामुळे भाजप-आरएसएस च्या माध्यमातून जेव्हा काँग्रेस संपायला लागली तेव्हा या परिवर्तनवादी संघटनांनी शांत बसणे पसंत केले.भाजपमधे मात्र उलट आहे.म्हणून आज त्यांनी तुमची जागा घेतलेली आहे.महाराष्ट्राच्या काँग्रेसचे नेते मात्र आपआपल्या मतदारसंघाला वैयक्तिक जहागीर समजून त्यावर नागासारखे वेटोळ्या मारुन बसले आहेत.त्यांना पाय मोकळे करायला व राज्याचा फेरफटका मारायला सांग.गांधी घराण्याच्या पुण्याईवर आणखी किती दिवस जगणार हा प्रश्न त्यांना तू स्पष्टपणे विचारला पाहिजे.

● हे वाचा – Karanja Lad : आमचे लाडाचे कारंजे ....आधुनिक कारंजा महात्म्य

  प्रिय राहुल, अनागोंदीच्या या भयावह वातावरणात कोणीतरी मोठ्या नेत्याने जोडण्याची भाषा बोलण्याची या देशाला नितांत आवश्यकता होती.कारण तोडणाऱ्यांचे प्रस्थ देशात प्रचंड माजलेले आहे. लिहिणारा,बोलणारा,स्वतंत्रपणे आपले मत मांडणारा भयभीत झाला आहे व त्याला प्रचंड त्रास देणे सुरु आहे. सरकारी यंत्रणांना हाताशी धरून विचार स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्यांचे खच्चीकरण या देशात सुरू आहे.अशा दडपशाहीच्या वातावरणात देश जोडण्यासाठी साडेतीन हजार किलोमीटर पायी चालण्याची तू हिंमत केलीस, त्याबद्दल खरोखर पक्षभेद विसरून प्रत्येकाने तुझे स्वागत करणे गरजेचे आहे.जोडणारा जेव्हा निडरपणे हजारो किलोमीटर पायी चालण्यासाठी आपल्या छातीचा कोट करतो,तेव्हा त्यातून अनेकांना प्रेरणा मिळून तेही लोक जोडण्याच्या मोहिमेमध्ये स्वयंप्रेरणेने सहभागी होत असतात.जगात जोडणारे लोकच अजरामर झाले आहेत.तोडणारे प्रसिध्दी मिळवू शकतात पण नावलौकिक मिळवू शकत नाही.तोडणारे कधीकधी जिंकू शकतात पण जनतेच्या ह्दयात जागा निर्माण करु शकत नाही.तोडणे फार सोपे आहे पण जोडणे ही अवघड कला आहे.ही कला प्रत्येकाला अवगत नाही आणि सध्याच्या काळात तर जोडण्यापेक्षा तोडण्यावरच काही लोकांचा जास्त भर आहे.

  राहुल, तू सध्याच्या काळातील अतिशय दुर्मिळ अशा माणसे जोडण्याच्या यात्रेसाठी हजारो किलोमीटर चालत आहेस ही खरोखर अभिनंदनीय बाब आहे.कारण तोडण्यासाठी फार चालावे लागत नाही,डोके लागत नाही,विचार लागत नाही,दुसऱ्यांच्या भावना समजून घेण्याची गरज भासत नाही.फक्त मेंदू काढून टाकलेली व स्वतःचा विवेक गहाण ठेवलेली एक झुंड लागते.या विवेकहीन आणि मेंदूहीन झुंडीला मग कोणाविरुद्धही पेटवून देऊन तोडण्याची प्रक्रिया राबवणे फार सोपे असते.परंतु जोडण्याची कला शिकणे व शिकविण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात.मेहनत करावी लागते.मेंदूची मशागत करावी लागते आणि प्रत्येक गोष्ट तर्काच्या चाळणीतून गाळून घ्यावी लागते.ते प्रत्येकाला साध्य होत नाही.त्यामुळे तू जोडण्यासाठी निघालास हे काम फार कठीण असले तरी विधायक व विश्वात्मक आहे.या प्रक्रियेतून जोडणारी एक मोठी पिढी निर्माण होईल अशी आशा आहे व ती काळाची गरज आहे.त्याचा उपयोग काँग्रेससाठी नाही तर देशाच्या उज्वल भवितव्यासाठी आपल्याला करायचा आहे.कारण तू भारत जोडण्याच्या मोहिमेवर निघाला आहेस.त्यामुळे आम्ही सर्व तुझ्या या प्रांजळ प्रयत्नात तुझ्या पाठीशी निस्वार्थीपणे उभे आहोत.आम्हाला तुझ्याकडून आणि तुझ्या पक्षाकडून कोणतीही अपेक्षा नाही.फक्त महाराष्ट्रातील तुझ्या पक्षाच्या नेत्यांनी तू गेल्यानंतरही ही मोहीम सातत्याने अशीच सुरु ठेवावी व विविध चळवळींच्या माध्यमातून जोडण्याचे काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे एवढीच या पत्रातून विनंती आहे.तुला या पदयात्रेतून निश्चितच महायश प्राप्त होईल व भारत जोडण्याच्या प्रक्रियेला वेग येईल अशा सदिच्छा देऊन पत्राला विराम देतो.

  तुझा हितचिंतक
  -प्रेमकुमार बोके
  अंजनगाव सुर्जी
  ९५२७९१२७०६
  --------------------

  आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद...!

  - बंडूकुमार धवणे
  संपादक गौरव प्रकाशन
  --------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या