आयुष्य जगताना ही आत्मचरीत्रात्मक कादंबरी प्रसिध्द गजलकार तसेच अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त मा.दिलीप पांडरपटटे साहेब अमरावती जिल्हाचे जिल्हाधिकारी श्रीमती पवनीत कौर मॅडम यांचे शुभ हस्ते नुकतीच प्रकाशीत झालेली कादंबरी मला वाचायला मिळाली. तशी माझी आणि लेखकाची ओळख माझे स्वलिखित कलात्मक सुविचार दररोज आणि कविता व लेख हे अधून मधून सोशलमिडीयावर प्रकाशित होत असतात त्यात महाराष्ट्रातील अनेक साहित्यिक लोक माझ्याशी जुळलेले आहेत विशेष म्हणजे बंजारा समाजातील सर्वच कवी,लेखक माझे परिचयाचे झाले आहेत त्यापैकी शिवाजी जाधव हे एक. सर्व प्रथम मी लेखकाला धन्यवाद देतो की, त्यांनी अवघ्या वयाच्या 30 व्या वर्षी त्यांनी त्यांचे आत्मचरीत्रात्मक कादंबरी प्रकाशीत करून त्यांनी त्यांचे जीवनात केलेला संषर्घ व त्यांचे कुटूंबीयांच्या जिवनातील संघर्ष साध्या आणि सोप्या भाषेत कादंबरी स्वरूपात मांडून एक मराठी साहित्य क्षेत्रात पदापर्ण केला आहे. ही बाब खरोखरच अभिनंदनीय आहे.
‘आयुष्य जगताना’ कादंबरी वाचायला घेतली आणि जस वेळ मिळतो तशी ती वाचून काढली. या कादंबरीतील काही प्रसंग वाचताना आकर्षश:अंगावर काटे येतात.अक्षरशत्रु आईवडीलांच्या पोटी आशेचा किरण होऊन जन्माला आलेले शिवाजी जाधव मुळात कर्तव्यकठोर असल्यामुळे त्यांच्या कुटूंबालाच नव्हे तर अवघ्या बंजारा समाजातील नव्या पिढीला प्रेरणादायी दीपस्तंभ ठरले आहेत. त्यांच्या ‘आयुष्य जगताना’ या आत्मचरित्रात मांडलेला संघर्ष अक्षरश: काळजाला भिडतो. जन्मापासून ते शासकीय सेवेत रुजू होईतोपर्यंत भोगलेले भोग त्यांनी आत्मचरित्रात मांडले आहे. एवढंच काय पण, पांढरपेशा समाजातील कुणाही संवेदनशील माणसाच्या मस्तकाला झिणझिण्या आणण्याची ताकद या पुस्तकात आहे.
आपल्या भारत देशाला जागतिक महासत्ता करण्याचे जिथे स्वप्न पाहिले जाते तिथे आजही लोकांना जनावरापेक्षाही हीनपणाने जगावं लागत. दारिद्रयाच्या आणि जातीच्या वरवंट्याखाली रगडून, पिचून, पिळवटून निघालेल्या माणसाला पोटाला दोन घास मिळावेत म्हणून रक्त आटवीत, घाम गाळत केवळ जगण्यासाठी सुध्दा टोकाचा कसा संघर्ष करावा लागतो. हे ‘आयुष्य जगताना’ वाचल्यावर डोळ्यासमोर दिसायला लागत आणि खोल मनात घर करून राहात. मी तर हादरूनच गेलो.
‘आयुष्य जगताना’ हे फक्त एकट्या शिवाजी जाधव यांचे आयुष्य नाही तर ते बंजारा समाजाच्या मळखाऊ, मळलेल्या मातीतून खाच खळग्यातून घोर कष्टाने वाटचाल करीत असलेल्या बंजारा बांधवाचे आयुष्य आहे, त्यांची कथा आहे. बंजारा समाजाचे आराद्य दैवत संत सेवालाल महाराज यांनी गोर बांधवांना एकत्रित आणण्यासाठी खूप मोठे योगदान दिले आहे. भटका पण कष्टाळू समाज असलेल्या काही लोकांची अजूनही भटकंती थांबलेली नाही. तेव्हा भटकणा-यांच्या आयुष्यात उजेड कसा येणार? स्थैर्य कसे मिळणार? मात्र, शिवाजी जाधवांसारखा एखादा युवक मळखाऊ नशीबालाच घडवणारा, घोर अंधाराला चिरणारा उजेड ठरू शकतो.
छोट्या शिवाजी चा सांभाळ करणा-या ताईचा महामारीने, दारीद्रयाने झालेला मृत्यु वाचकाच्या मनाला चाटका लावून जातो. शिवाजीच्या ताईचा मृत्युही अंतर्मुख व्हायला लावतो! अनेकजण परिस्थिती व संकटाशी सामना करताना गोंधळून जातात, हतबल होतात. काहीजण परिस्थितीचा बागुलबुवा करून पळ काढतात. काहीजण तर शेवटचा म्हणजेच टोकाचा मार्गही पत्करतात, आपले जीवन संपवतात. लेखकाने मात्र, संकटात कधीच पाठ फिरवलेली नाही. संकटासोबत दोन हात करून शिवाजीने संकटाची पाठ लोळवल्याच्या अनेक्र घटना, प्रसंग या आत्मचरित्रात वाचायला मिळतात. लेखकाने ‘आयुष्य जगताना’ प्रत्येक संकट व प्रसंगातून चांगला धडा घेऊन दुस-याला सहज गिरवता येईल, असे अनुभव मांडलेले आहेत. यामुळे जीवनाकडे पाहण्याचा लेखकाचा सकारात्मक दृष्टीकोन दुर्मिळातील दुर्मिळ.
लेखकाच्या जीवनातील प्रत्येक संकट व प्रतिकुल परिस्थितीवर मात करताना त्या परिस्थितीनुसार धडा शिकत गेला. वाईट परिस्थिती अनेकजनांवर ओढावते मात्र, त्या परिस्थितीत शिवाजी सारखे ध्येय वेडे युवक रडत न बसता, पुढत न बसता मार्ग काढत पूढे जातात. म्हणूनचं, शिवाजी जाधव यांचे हे आत्मकथन अशा बिकट परिस्थितीतून जाणा-या लोकांनासाठी नक्कीच प्रेरीत करणारे आहे..! संकटावर मात करण्याची ताकद ही स्वत:लाच निर्माण करावी लागते. ही ताकद देणारे हे आत्मकथन आहे.
‘आयुष्य जगताना’ हे आत्मकथन म्हणजे बंजारा तांड्यावर जन्मलेल्या, आपल्या प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करीत यशाच्या शिखरावर विराजमान झालेल्या शिवाजी जाधव नावाच्या एका नवयुवकाची यशोगाथा आहे. मराठी कथा, कविता, कादंबरी, नाटक, प्रवासवर्णने याबरोबरच आत्मचरित्र, आत्मकथन या साहित्य प्रकारानेही मराठी साहित्याला समृद्ध केले आहे.
आत्मकथन लिहिणे म्हणजे एक प्रकारची तारेवरची कसरत असते. लेखकाचे हे एक प्रकारचे आत्मपरीक्षण असते. अंतर्मुख होऊन लेखकाने घेतलेला अंतर्मनाचा ठाव, स्वतःचा शोध असतो. मानवी जीवनाकडे वळून पाहिल्यास असे दिसते की, माणसाला स्वतःच्या बालपणाच्या व ऩंतरच्या काळातील आठवणी कधीतरी येतच असतात. काही कडू असतात तर काही सुखावणाऱ्या असतात. त्या आठवणी इतरांना सांगताना मनुष्य पुन्हा त्या काळात हरवून जातो. संवेदनशील माणसाच्या बाबतीत हा प्रकार अधिक प्रमाणात व वारंवार घडतो. मनुष्य आपल्या गतकाळाचे सिंहावलोकन करुन या आठवणी जिवंत करण्याच्या प्रयत्नातूनच आत्मचरित्र, आत्मकथन जन्माला येते.
स्वातंत्र्योत्तर काळात साहित्यिक, संगितकार, चित्रपट कलावंत, तरुण, राजकीय नेते, प्राध्यापक, नवतरुण, सनदी अधिकारी इत्यादींनी आत्मचरित्रे लिहिलेली पाहायला मिळतात. स्वातंत्र्योत्तर काळात ज्ञानाची कवाडे सर्वांसाठी खूली झाली आणि सर्वसामान्य वर्गातील तरुण वर्ग उच्च शिक्षण घेऊ लागला, नोकऱ्या करु लागला. शिक्षण घेतल्यानंतर आपल्या वाट्याला आलेले खडतर जीणे साहित्यातून मांडू लागला. विशेषतः १९६० नंतर कथा, कविता, कादंबरी, नाटक या साहित्य इ. प्रकारासोबतच दलित आत्मकथनाचे दालन समृद्ध झालेले दिसते. गावकुसाबाहेर राहणाऱ्या उपेक्षित, भटक्या जाती – जमातीतील तरूण लेखकानी साधारणतः तारुण्याच्या उंबरठ्यावर, आयुष्याच्या ऐन उमेदीच्या काळात ही आत्मकथने लिहिलेली दिसून येतात. यात विशेषतः ‘तराळ – अंतराळ’ – शंकरराव खरात, ‘बलुतं’ – दया पवार, ‘उचल्या’ – लक्ष्मण गायकवाड, ‘उपरा’ – लक्ष्मण माने, ‘काट्यावरची पोटं’ – उत्तम बंडू तुपे, ‘आठवणींचे पक्षी’ – प्र. ई. सोनकांबळे, ‘अक्करमाशी’ – शरणकुमार लिंबाळे, ‘कोल्हाट्याचं पोर’ – किरण शांताबाई काळे, ‘बिराड’ – अशोक पवार इत्यादी निवडक आत्मकथनाचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. ही आत्मकथने वाचणीय व वाचकांना अंतर्मुख करणारी आहेत.
नेमका हाच धागा पकडून गोर बंजारा समाजातील काही मान्यवर साहित्यिकांनी सुद्धा खास बंजारा स्टाईलने आपली आत्मकथने लिहिलेली आहेत. यात विशेषतः ‘तांडा’ – आत्माराम राठोड, ‘याडी’- पंजाब चव्हाण, ‘गोठण’- रावजी राठोड, ‘लदेणी’ – नामदेव चव्हाण, ‘वादळवाट’- नामदेव राठोड, ‘अंधारयात्रीचे स्वप्न’ – राजाराम जाधव इत्यादी ही सर्व आत्मकथने वाचणीय व वाचकाला अंतर्मुख करणारी आहेत.
नुकतेच प्रकाशित झालेले लेखक शिवाजी जाधव या़ंच्या ‘आयुष्य जगताना’ या आत्मचरित्रात्मक कादंबरी रुपाने मराठी आत्मकथनाच्या दालनात मोलाची भरच पडेल, यात यत्किंचितही शंका नाही ! लेखकाने आपल्या जीवनप्रवासातील विविध घटना, प्रसंग, क्षण आपल्या या आत्मकथनात मांडलेले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या महसूल खात्यात सेवेत असणाऱ्या लेखकाने यांनी आपल्या जन्मापासून ते शासन सेवेत रुजू होईपर्यंचा संपूर्ण जीवनपट या आत्मकथनात मांडलेला आहे. महसूल खात्यात नोकरीला असून सुद्धा लेखकाला साहित्य लेखनाची असलेली आवड विशेष उल्लेखनीय आहे. आपल्या आईं – वडिलांच्या, आजी – आजोबांच्या व ताईच्या विविध आठवणी या आत्मकथनात मांडलेल्या आहेत.
या कादंबरीतील ‘अर्चना’ नावाच्या एका छोट्या मुलीचा प्रसंग तर वाचकांच्या मनाला भावनिक बनवणारा आहे. हे आत्मकथन म्हणजे बंजारा समाजातील नवतरुणांनाच नव्हे तर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या समस्त नवतरुणांसाठी दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरावे असे आत्मकथन आहे. ध्येयाचा पाठलाग करताना आपले पाय परिस्थितीच्या खडतर रस्त्यावरून चालताना रक्ताळले तरी थांबायचे नाही, आपल्या प्रयत्नांचा प्रवास हा अविरतपणे चालू असला पाहिजे, हा मोलाचा संदेश लेखकाने या आत्मकथनातून नवीन पिढीला दिला आहे. लेखकाने आपले तांड्यावरील प्रारंभिक जीवन, बालपणीचे दिवस, शालेय जीवनातील विविध अनुभव, शिक्षकांनी केलेले संस्कार, बालपणीचे सवंगडी, वस्तीगृहातील विविध क्षण, एम.सी.सी, एन.सी.सी.चे अनुभव, शालेय जीवनात भाकरीच्या शोधार्थ आपल्या आई-वडिलांची झालेली ससेहोलपट, अशा विविध कारुण्यमय आठवणी अगदी सहजपणे वाचकांसमोर मांडलेल्या आहेत.
जीवन हे जसे सुंदर असते तेवढेच ते खडतरही असते. यशस्वी झालो की, सुंदर वाटते, परंतु जीवनात अपयश आले की, हेच जीवन भयानक खडतर वाटू लागते. बिकट परिस्थितीच्या जंगलातून सुद्धा आपल्या जिद्दीच्या, प्रयत्नांच्या जोरावर वाट काढता येते. इच्छा असेल तर आपणास त्यातून मार्ग नक्की सापडतो, हा सुंदर विचार लेखकाने यांनी लिहिलेल्या ‘आयुष्य जगताना’ या आत्मकथनाच्या केंद्रस्थानी आहे.
एखाद्या होतकरू विद्यार्थ्यांला ज्ञानाची भूक काय असते, हे आत्मकथन वाचल्यावर लक्षात आल्यावाचून राहत नाही. ‘असाध्य ते साध्य, करीता सायास कारण अभ्यास तुका म्हणे । ह्या संत तुकारामांच्या अभंगांच्या ओळी याबाबतीत तंतोतंत लागू पडतात. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी पुण्यात आलेल्या लेखकाने पुण्याच्या अनेक आठवणी लालित्यपूर्ण भाषेत सहजपणे आपल्या या आत्मकथनात मांडलेल्या आहेत. आयुष्याला कलाटणी देणारे पुणे, पुण्यातील स्पर्धा परीक्षा केंद्रावरील अॅडमिशनपासून ते स्पर्धा परीक्षेत यशस्वी होईपर्यंतचा संपूर्ण प्रवास लेखकाने अतिशय समर्पक शब्दांत व लालित्यपूर्ण भाषेत मांडलेला आहे. एखाद्या चित्रपटातील पटकथेप्रमाणे एक–एक क्षण वाचकांच्या डोळ्यांसमोर दृग्गोचर करण्यात लेखक कमालीचे यशस्वी झाले आहेत.
स्पर्धा परीक्षा केंद्रावर कमी शुल्कात प्रवेश मिळावा यासाठी केलेली धडपड, तेथे राहण्यासाठी कमी पैशात रुम कशी मिळेल, यासाठी केलेली प्रयत्नांची शिकस्त, एका सायकल दुरुस्तीच्या दुकानातून घासाघीस करून सातशे रुपयाला विकत घेतलेली जुनी सायकल, पुणे विद्यापीठाच्या जयकर लायब्ररीत प्रवेश मिळविण्यासाठी केलेली धडपड, तेथे भेटलेले जीवाला जीव देणारे जीवाभावाचे मित्र, स्वतःला अभ्यासात झोकून देऊन केलेली स्पर्धा परीक्षेची तयारी असे अनेक क्षण, प्रसंग इत्यादी हे सर्व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक युवकांना आपलेच अनुभव वाटावेत यांची प्रचिती आल्यावाचून राहत नाही. आपल्या परिस्थितीचा उगाच बाऊ न करता प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा मात करुन आपण आपल्या ध्येय मंदिरापर्यंतची सहज मजल गाठू शकतो हा सुंदर विचार लेखकाने वाचकांना दिलेला आहे.
पुण्याहून जेव्हा लेखक रत्नागिरीला परीक्षा देण्यासाठी जातात, तेव्हा प्रवासातील केलेली निसर्गवर्णने वाचताना जणू आपण प्रवासवर्णन वाचल्याचा भास व्हावा असे वाटत राहते. आपण निवडलेल्या करिअरच्या क्षेत्राला अनेक पर्याय सुद्धा असणे गरजेचे आहे हा अभिनव विचार लेखक यांनी आपल्या या आत्मकथनात मांडलेला आहे. सध्याच्या युगात करिअरचा विचार करताना केवळ एकच पर्याय असता कामा नये. आपण आपल्या करिअरच्या ‘प्लॅन – ए’ मध्ये अयशस्वी ठरलो तर अपयशाने खचून न जाता ‘प्लॅन – बी’, ‘प्लॅन – सी’ अशा विविध पर्यायांचा सुद्धा आवर्जून विचार केला पाहिजे हा विचार आजच्या स्पर्धेच्या युगात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांसाठी खूप मोलाचा आहे. ध्येय संपणे म्हणजे आयुष्य संपणे नव्हे. खरेतर ध्येय कधीच संपत नाही. ध्येयाला आपणच संपवत असतो. यशाप्रमाणे अपयश सुद्धा पचवता आले पाहिजे. आपल्या प्रामाणिक प्रयत्नांशी आपण ठाम राहायला हवे. लेखकाने यांनी मांडलेले अनेक आदर्शवादी विचार आजच्या नवयुवकांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहेत.
आपल्या जीवनातील अनेक घटना, प्रसंगांची मांडणी लेखकाने अगदी सहजपणे, साध्या व सोप्या भाषेत केली आहे. छोटी छोटी वाक्ये, समर्पक व अर्थपूर्ण वाक्यरचना करताना लेखकाची कुठेही दमछाक उडालेली दिसत नाही. भाषेला कोठे कृतिमतेचा लवलेशही दिसत नाही. अधूनमधून आपल्या आईच्या व ताईच्या तोंडचे बंजारा बोलीभाषेतील संवादाच्या योजनेमुळे ‘आयुष्य जगताना’ या आत्मकथनाच्या भाषेला एक प्रकारचा गोडवा प्राप्त झाला आहे. साधी, सोपी मनाला भिडणारी भाषा, अधून मधून आलेले सुविचार, वाक्प्रचार, म्हणी तसेच वीररस , करुणरस, शांतरस, बिभत्सरस इत्यादी रसांची प्रचिती येते, हे या आत्मकथनाचे आगळेवेगळे वैशिष्ट्य म्हणावे लागेल ! हे आत्मकथन वाचायला सुरुवात केल्यानंतर ते संपूर्ण वाचून झाल्याशिवाय हातातून खाली ठेवून नयू असे वाचकाला वाटत राहते. स्पर्धा परीक्षांच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकणारे हे आत्मकथन स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवकांसाठी, तसेच मराठी साहित्याच्या रसिक वाचकांसाठी व अभ्यासकांसाठी नक्कीच प्रेरक व मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही.
‘आयुष्य जगताना’ पुस्तक वाचण्यासाठी मिळाले. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या नायकाची ओळख या पुस्तकामुळे झाली. मराठी साहित्य क्षेत्रात अशोक पवारचं ‘बिराड’ आणि लक्ष्मण गायकवाड यांचा ‘उचल्या’ ही पुस्तक प्रचंड गाजली तसेच गोर साहित्यात आत्माराम कनीराम राठोड यांच्या‘तांडा’ कादंबरीने प्रचंड धुमाकूळ घातलं त्यानंतर याडीकार पंजाब चव्हाण ची ‘याडी’ आत्मकथनाने तरुण वर्गाला वेड लावलं. रावजी राठोड यांचे ‘गोठन’, नामदेव राठोड याचें ‘वादळवाट’, नामदेव चव्हाण यांचे ‘लदेणी’, राजाराम जाधव यांचे ‘अंधार यात्रीचे स्वप्न’ या तांडयातील दु:ख आणि वेदना मांडणारी पुस्तक अगदी तसचं शिवाजी जाधव यांचे ‘आयुष्य जगताना’ पुस्तकांच आहे.
मराठी साहित्यात अनेक साहित्यिकांनी आपल्या आत्मचरित्रात वेगवेगळे अनुभव कथन केलेले आहे. अगदी त्याच प्रमाणे आयुष्य जगत जगत आलेले अनुभव ‘आयुष्य जगताना’ या पुस्तकरुपाने शिवाजी जाधव यांनी आपला खडतर प्रवास मांडलेला आहे. ध्येयपथावरच्या खडतर प्रवासावेळी त्यांनी घेतलेली गरूडझेप अगदी वाखाणण्याजोगी आहे. एकंदरीत, या रुपाने शुन्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद असलेल्या ख-या नायकाची ओळख होते आणि म्हणूनच हे पुस्तक विद्यापीठामध्ये संदर्भ ग्रंथ म्हणून अभ्यासले गेले पाहिजे असे माझे प्रामाणिक मत आहे.
‘आयुष्य जगताना’ कादंबरी वाचल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली की मराठी साहित्यामध्ये अनेक आत्मचरीत्रात्मक कादंबरी हया वयाचा साठीनंतर लिहीतांना दिसतात. पण ही कादंबरी वाचून असे लक्षात येते की लेखकाने वयाच्या 30 वर्षापर्यंतचे आयुष्य हे आजच्या नव युवकाला प्रेरणा देणारे एक दिपस्तंभच ठरेल. लेखकाचा संघर्षमय जिवन हे आजच्या युगात स्पर्धा परीक्षा तयारी करणा-या, ध्येयाप्रती धडपडणा-या युवकाला नक्कीच एक प्रकारे प्रेरणा आहे. लेखकाचा खडतर जिवनातही आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोण हा या ‘आयुष्य जगताना’ या कादंबरीचा विशेष आहे..!!!
- नाव.शिवाजी रंगराव जाधव
- जन्म दी.02/06/1991
- व्यवसाय ..नोकरी( महसूल सहायक,जिल्हाधिकारी कार्यालय,अमरावती)
- पत्ता.मुक्काम बुट्टी ईजारा पोस्ट लोहरा
- तालुका.पुसद जिल्हा.यवतमाळ 445209
- मो.न.9764538805/9673569595
मी लेखकाला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपणा सर्वांकडून अपेक्षा करतो की ही कांदबरी आपण सर्वांनी एकदा अवश्य वाचावी..
- धन्यवाद…!
- -सुरेश बा.राठोड
- (कलाशिक्षक तथा क्रिएटिव्ह आर्टिस्ट)
- राष्ट्रीय विद्यालय,भिवापूर जिल्हा नागपूर
- 9765950144
- ————–
तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? आम्हास आपल्या परिसरातील बातम्या, लेख अवश्य पाठवा आणि प्रतिनिधी बना ! ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Gaurav Prakashan फेसबुकपेज !
- ——————–
आम्ही तुमच्यासमोर बातम्या, कथा, कविता, वाचनीय लेख अश्या खूप साऱ्या लेखामार्फत भेटत असतो तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा, कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते, तसेच आमचे फेसबुक पेज ही नक्की लाईक करा, गौरव प्रकाशन युट्यूब चॅनेल लाईक Subscribe करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याचबरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद…!
- -बंडूकुमार धवणे
- संपादक गौरव प्रकाशन
- ——————–