विलासनगर गोडाऊनची विभागीय आयुक्तांकडून पाहणी
अमरावती, दि. 5 : शिक्षक मतदारसंघ निवडणूकीसाठी मतमोजणी केंद्र विलासनगर गोडाऊन येथे राहणार असून, मोजणी केंद्राच्या अनुषंगाने तिथे आवश्यक साधनसामग्री, मनुष्यबळ, सुरक्षितता उपाययोजना आदींची अंमलबजावणी करण्याचे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांनी आज येथे दिले.
शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने या जागेची पाहणी श्री. सिंह यांनी आज केली, त्यावेळी ते बोलत होते. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह अनेक निवडणूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
मा. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतमोजणी केंद्रावर आवश्यक साधनसामग्री, मनुष्यबळ, सुरक्षिततेच्या दृष्टीने करावयाच्या सर्व उपाययोजना, आवश्यक सूचनाफलक आदी सर्व तजवीज ठेवावी. आयोगाच्या सर्व निर्देशांचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी श्री. सिंह यांनी दिले. गोडाऊनच्या सर्व परिसराची श्री. सिंह यांनी पाहणी करून सुरक्षिततेच्या दृष्टीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश दिले.
मतमोजणी तीन डिसेंबरला होणार आहे. या मतमोजणी केंद्रावर दोन हॉलमध्ये मोजणीची सुविधा असेल. एकूण 14 टेबल असतील. जिल्ह्यात 25 मतदान केंद्रे असून, एक डिसेंबरला मतदान होईल.