आदिवासी उमेदवारांकरिता रेडीमेट होजीअरी गारमेंट व्यवसायासाठी अर्थसहाय्य
- मागणी अर्ज सादर करण्याचे आवाहन
गौरव प्रकाशन अमरावती, (प्रतिनिधी) : धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रांतर्गत केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना सन 2023-24 अंतर्गत आदिवासी पुरुष/महिला समुह व बचतगटांना रेडीमेड होजीअरी गारमेंट करीता अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी नि:शुल्क अर्ज मागविण्यात आले आहे. त्याअनुषंगाने इच्छुक आदिवासी उमेदवारांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रकल्प कार्यालयास अर्ज सादर करावे, असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रिचर्ड यानथन यांनी केले आहे.
या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठीचे अर्ज धारणी, चिखलदरा, अंजनगाव व अचलपूर तालुक्यातील लाभर्थ्यांकरिता प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कार्यालय धारणी या ठिकाणी तसेच नांदगाव खंडेश्वर, भातकुली, अमरावती, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे व दर्यापूर तालुक्यातील लाभार्थ्यांकरीता अपर आयुक्त, आदिवासी विकास अमरावती येथे उपलब्ध आहेत. मोर्शी, वरुड, तिवसा व चांदूर बाजार तालुक्यातील लाभार्थ्यांकरीता धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या उप कार्यालय, मोर्शी येथे अर्ज उपलब्ध आहेत. या योजने संदर्भात अधिक माहिती मिळविण्यासाठी उपरोक्त नमूद कार्यालयातील विकास शाखेशी किंवा दूरध्वनी क्र.07226-224217 वर संपर्क साधावा, असे आवाहन विभागाव्दारे करण्यात आले आहे.
या योजने अंतर्गत संबंधितांकडून प्राप्त झालेल्या अर्जांची शासन निर्णयान्वये जेष्ठतेनुसार संगणीकृत यादी तयार करण्यात येईल. त्यानंतर कागदपत्रे तपासणी करुन पात्र, अपात्र अर्जदाराच्या स्वतंत्र याद्या तयार करण्यात येईल. लाभार्थी निवड करतांना प्रथम दारिद्रय रेषेखालील लाभार्थी. अपंग, विधवा परितक्त्या, निराधार महिला यांना प्राधान्याने योजनेचा लाभ देण्यात येईल, असे प्रकल्प अधिकारी श्री यानथन यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.