- जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांचा पाठपुरावा
अमरावती : निम्न पेढी प्रकल्पांतर्गत पुनर्वसितांचे प्रलंबित अनुदान मिळण्यासाठी जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. पुनर्वसितांसाठीचे निर्धारित अनुदान तत्काळ मिळणार असून, त्यामुळे अनेक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत निम्न पेढी प्रकल्पात भातकुली तालुक्यातील प्रकल्पबाधित अळणगाव, कुंड खुर्द, कुंड सर्जापूर, गोपगव्हाण व हातुर्णा येथील बेघर प्रकल्पग्रस्तांसाठी भूखंडवाटप करण्यात आले आहे. त्यांचे काळ्या मातीतील पायवा बांधकामाकरिता प्रत्येक कुटूंबासाठीता एक लक्ष रूपये याप्रमाणे रू.४९ लक्ष सानुग्रह अनुदान देण्याचे निर्देश नियामक मंडळाला देण्यात आले आहेत. निम्न पेढी प्रकल्पबाधितांना प्रलंबित अनुदानाची मागणी लक्षात घेऊन जलसंपदा राज्यमंत्री श्री. कडू यांनी पाठपुरावा केला. त्यानुसार अनुदानाचा मार्ग मोकळा झाला.
त्याचप्रमाणे, अचलपूर तालुक्यातील वासनी मध्यम प्रकल्प या योजनेतंर्गत पुनर्वसनामध्ये प्रस्तावित नविन गावांना ६ ते ७ फुट खोलीपर्यंत काळी माती असल्यामुळे पायवा बांधकामाचा अतिरिक्त खर्च म्हणून प्रति खातेदार रू एक लक्ष या प्रमाणे ७.१४ कोटी रकमेचे सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णयही झाला आहे. या निर्णयामुळे लवकरच प्रकल्पग्रस्तांना अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अकोट (अकोला) येतील शहापूर बृहत लघु प्रकल्पाच्या द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार अडीचशे कोटी रुपये किंमतीच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे.
—–